महाराष्ट्रातील जैवविविधता

Maharashtra biodiversity : महाराष्ट्र राज्य भारताच्या पश्चिम आणि मध्य भागात स्थित आहे. अरबी समुद्राच्या 720 किमी लांबीच्या किनाऱ्यासोबतच सह्याद्री आणि सातपुडा पर्वतरांगांनी नैसर्गिकदृष्ट्या मजबूत असं आपलं राज्य आहे. राज्यामध्ये पश्चिम घाट, दख्खनचे पठार आणि पश्चिम किनारा असे तीन महत्त्वपूर्ण जैव-भौगोलिक क्षेत्र आहेत. पश्चिम घाट स्थानिक प्रजातींचे पालनपोषण करतात.

आपल्या भारतासारखी जैवविविधता संपूर्ण जगात कुठेच नाही. आपल्याकडे बर्फाच्छादित हिमालय आहे, सह्याद्री आहे, वाळवंट आहेत, वेगवेगळ्या प्रकारची जंगले आहेत. प्रत्येक राज्याची स्वतःची खासियत आहे.

महाराष्ट्र राज्य भारताच्या पश्चिम आणि मध्य भागात स्थित आहे. अरबी समुद्राच्या 720 किमी लांबीच्या किनाऱ्यासोबतच सह्याद्री आणि सातपुडा पर्वतरांगांनी नैसर्गिकदृष्ट्या मजबूत असं आपलं राज्य आहे. राज्यामध्ये पश्चिम घाट, दख्खनचे पठार आणि पश्चिम किनारा असे तीन महत्त्वपूर्ण जैव-भौगोलिक क्षेत्र आहेत. पश्चिम घाट स्थानिक प्रजातींचे पालनपोषण करतात. दख्खनचे पठार विस्तीर्ण पर्वत रांगा आणि गवताळ प्रदेशाचे वैभव टिकवून आहे. तर समुद्रकिनाऱ्याच्या परिसरात तिवर, खारफुटी आणि दलदलीची जंगलं आहे.

राज्यात वानर, माकड, जंगली डुक्कर, वाघ, बिबट्या, गौर, अस्वल, सांबर, चौशिंगा, चितळ, भुंकणारे हरण, उंदीर हरण, सिव्हेट, कोल्हा,  लांडगा, जंगली मांजर या प्राण्यांच्या प्रजाती आहेत. सरडे, विंचू आणि साप या सरपटणाऱ्या प्राण्यांच्याही अनेक जाती महाराष्ट्रात आहेत. राज्याच्या 720 किमी सागरी किनारपट्टीवर विविध प्रकारचे मासे आणि समुद्री प्राणी आढळतात.

या अश्या अनेक प्राणी / पक्ष्यांची विविधता आपल्याकडे असली तरी आपण आपल्या खास अश्या राज्य प्राणी / पक्ष्यांची ओळख करून घेऊ.

राज्य फुलपाखरू ब्ल्यू मॉरमॉन

ब्ल्यू मॉरमॉन फुलपाखरू

आधी महाराष्ट्रांमधेच फक्त राज्य प्राणी, राज्य पक्षी, राज्य फुल आणि राज्य झाड नोंदवले गेले होते. मात्र 2015 मध्ये ब्लू मॉरमॉन हे फुलपाखरू आपले राज्य फुलपाखरू म्हणून निवडले गेलं. असे राज्य फुलपाखरू निवडण्याचा पहिला मान महाराष्ट्राला मिळाला आहे. हे ब्ल्यू मॉरमॉन फुलपाखरू आकाराने बरेच मोठे असते. भारतात सर्वात मोठं फुलपाखरू बर्डवींग आहे. त्यानंतर ब्ल्यू मॉरमॉन फुलपाखरूचं नाव नोंदवलं आहे. जवळपास 12 ते 15 सें.मी. एवढा पंखांचा विस्तार आहे. या फुलपाखराचा मुख्य रंग काळा असला तरी वरच्या आणि खालच्या पंखांमध्ये आकाशी निळ्या रंगाची झळाळी असते. पंखाच्या सुरूवातीला गडद लाल रंगाचा ठिपका असतो. धड आणि पोट हे काळ्या रंगाचे असते. उडण्याच्या विशिष्ट सवयीमुळे हे फुलपाखरू पटकन नजरेत येते. एकदा का मातीवर बसून ते क्षार शोषायला लागले की, ते सहसा विचलीत होत नाही. मग आपण त्यांच्या अगदी जवळ गेलो तरी त्यांना काही फरक पडत नाही.

राज्य मासा सिल्व्हर पापलेट

पापलेट मासा

अगदी  गेल्या वर्षीच सप्टेंबर 2023 मध्ये सिल्व्हर पापलेटला राज्य मासा म्हणून दर्जा मिळाला. सिल्व्हर पापलेटला स्थानिक पातळीवर पापलेट किंवा सरंगा या नावानेही ओळखले जाते. राज्यातून सर्वात जास्त निर्यात पापलेट या माशाची केली जाते. उत्तम बांधा, घट्ट आणि चवदार मांस ह्यामुळे हा मासा विशेष लोकप्रिय झाला आहे. हे मासे किनारपट्टीजवळील समुद्रात विशेषतः चिखलाचा समुद्रतळ असलेल्या ठिकाणी आढळतात.

खवय्यांना भावणारा पापलेट हा सर्वार्थाने लोकप्रिय मासा आहे. मात्र, ग्लोबल वॉर्मिंग, सागरी प्रदूषण आणि हवामानातील बदलांचा मत्स्यसंपदेवर मोठा परिणाम होत आहे. काही दशकांपासून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील पापलेट व्यापारात बदल होत आहेत. त्याचप्रमाणे, मासेमारीच्या बदलत्या पद्धतीचाही परिणाम होत आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासून पापलेट माशाला ‘राज्य मासा’ म्हणून अधिकृत दर्जा मिळावा यासाठी मागणी केली जात होती. अनेक मच्छिमार संस्थांनी मत्स्य व्यवसाय मंत्र्यांकडे यासंबंधित मागणी केली होती. राज्यात सिल्व्हर पापलेटच्या उत्पादनात होत असणारी घट ही चिंताजनक आहे. त्यामुळं या प्रजातीचे जतन करण्याच्या दृष्टीने मच्छिमार संघटनांनी ही मागणी उचलून धरली होती. या माशाला अधिकृत राज्य माशाचा दर्जा मिळाल्यानंतर या प्रजातीच्या अधिवासाचे संरक्षण होण्यास मदत मिळेल, अशी भावना मच्छिमारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

 राज्य प्राणी शेकरू

राज्य प्राणी शेकरू

शेकरू हा महाराष्ट्र राज्याचा ‘राज्य प्राणी’ आहे. शेकरू ही एक मोठ्या आकाराची खार असून तिला उडणारी खार किंवा झाडावरची खार असेही म्हणतात. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर या संस्थेने शेकरू या प्राण्याचा समावेश ‘कमी धोका’  जाती यामध्ये केला आहे. परंतु, जंगलतोडीमुळे शेकरूचे मर्यादित असलेले अधिवास कमी होत असल्याने शेकरूंची संख्याही कमी होत आहे.

खास शेकरूच्या संवर्धनासाठी महाराष्ट्रातील भीमाशंकर हे अभयारण्य संरक्षित करण्यात आले आहे. याशिवाय दाजीपूर, राधानगरी, माथेरान, फणसाड इथेही ही मोठी खार आपल्याला बघायला मिळू शकते. शेकरूची डोक्यापासून शेपटीपर्यंतची लांबी 25 – 50 सेंमी असते. शेपटी जवळजवळ धडाइतकीच किंवा किंचित लांब असते. त्याचं वजन 1.5 – 2 किलोग्रॅम असते. मादी आकाराने आणि वजनाने नरापेक्षा लहान असते. शेकरूच्या रंगात पांढुरका, पिवळसर करडा, फिकट तपकिरी, मातकट लाल, गडद अंजिरी, गडद लाल किंवा काळा अशा विविध रंगांच्या छटा दिसून येतात. पोटाखालचा भाग आणि पुढचे पाय सहसा पिवळसर करड्या रंगाचे असतात. डोके फिकट तपकिरी किंवा तपकिरी असते. मात्र दोन्ही कानांच्यामध्ये एक विशिष्ट पांढरा भाग असतो. उपजातीप्रमाणे या भागाच्या रंगांमध्ये विविधता आढळून येते.

एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जाण्यासाठी तो सहा मीटरपर्यंत लांब उडी मारू शकतो. यासाठी त्याला उडणारी खार असं म्हणतात. संकटात असताना संरक्षणासाठी शेकरू पळून जाण्याऐवजी हालचाल न करता झाडाच्या बुंध्याला घट्ट पकडून राहतो.

सामान्यत: शेकरू एकट्याने किंवा जोडीने राहतो.  मोठ्या शिकारी प्राण्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी ते बारीक फांद्यांवर घरटे बांधतात. उन्हाळ्यात पानगळीच्या वनांमध्ये झाडांची पाने गळून गेली, की त्यांची घरटी दिसू लागतात.

राज्य पक्षी हरियाल

राज्य पक्षी हरियाल

हरियाल हा कबूतरवंशीय पक्षी असून तो महाराष्ट्राचा ‘राज्यपक्षी’ आहे. याला हिरवा होला, हरोळी, यलो फुटेड् ग्रीन पिजन किंवा पिवळ्या पायाची हरोळी या नावांनीही संबोधले जाते. हरियाल भारतात सर्वत्र आढळतो. हा कबुतरासारखा दिसणार पक्षी आहे. याचा मुख्य रंग हिरवागार असतो. त्याच्या शरीरावर जांभळ्या, निळ्या रंगाचं मिश्रण असते. तर मान, छाती, पोट हे पिवळ्या रंगाचे असते. हरियालला पोपटासारखे उलटे लटकून फळे खाता येतात. हरियाल पक्षी पूर्णपणे वृक्षवासी आहेत. ते सदाहरित वने, पानझडी वने इत्यादी ठिकाणी निवास करतात. वड, पिंपळ यांसारख्या वृक्षांवर तसेच अधूनमधून शहरांतील बागांमध्येही ते दिसून येतात. ते क्वचित जोडीने, तर बहुधा थव्याने वावरतात. पूर्वी अगदी गावांमध्ये सुद्धा हरियाल पक्षी दिसायचा. आता मात्र, दाट जंगलामध्येच हा पक्षी पाहायला मिळतो.

राज्य पुष्प ताम्हण

राज्यपुष्प ताम्हण

ताम्हण हे महाराष्ट्राचे राज्यपुष्प! ते जारूळ किंवा बोंडारा या नावांनीदेखील ओळखले जाते. त्याचे शास्त्रीय नाव ‘लॅजिस्ट्रोमिया’ (Lagerstroemia) असे आहे.  त्याला तामण, बोंडारा, मोठा बोंडारा, बोंद्रा, बुंद्रा अशी इतर नावं आहेत. हे मेंदीच्या कुळातील मध्यम आकाराचं झाड आहे. आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया या खंडांतील जंगलांच्या सर्व प्रकारांत हे झाड पाहायला मिळते.

पश्चिम महाराष्ट्रातील पानगळीच्या जंगलात, कोकणात नदीनाल्याच्या काठाने व विदर्भातही सगळीकडे हे झाड पाहायला मिळते. सध्या मुंबई आणि उपनगरांमध्ये ही झाडे रस्त्यांच्या कडेला लावलेली दिसतात.

ही फुले नाजूक मुलायम असतात. खालून वर टोकाकडे उमलत जातात. फुलोरा फांद्याच्या टोकाला येतो. एक फुल 5-7 सेमी आकाराचे असते. त्याला झालरीसारख्या पाकळ्या असतात. एखाद्या फुलांच्या गुच्छेसारखी या फुलांची रचना असते. पाकळ्यांचा रंग जांभळा, लव्हेंडर असतो. तर काही ठिकाणी गुलाबी किंवा फिकट गुलाबी रंगांची फुले असणारे सुद्धा ताम्हण झाडं पाहायला मिळतात.

या फुलांच्या पाकळ्या काहिशा चुरगळलेल्या व क्रेप कागदासारख्या दिसतात, म्हणून त्याला इंग्रजीत क्रेप फ्लॉवर असेही म्हणतात. फळे गोलाकार व चपटी असून त्यांत चपट्या व गोलाकार बिया असतात. उन्हाने तडकून त्यातील बिया दूरवर पसरतात. टरफल झाडाच्या फांद्यांवर तसेच चिकटून राहते.

उन्हाळ्याच्या कडक उन्हात, जेव्हा जीव नकोसा होतो. अशा सीझनमध्ये सगळीकडे ताम्हण फुलांचा बहर पाहायला मिळतो. अगदी मे महिन्यामध्ये फुलणाऱ्या या फुलांमुळे मनाला प्रसन्नता मिळते. या झाडावर फुलपाखरं, पक्षी, मधमाशा, खूप साऱ्या किटकांचा अधिवास आढळून येतो. एक चांगली जैवविविधता या झाडावर जपली जात असल्याने, या झाडाच्या फुलाला राज्य फुलाचा मान मिळाला आहे.)

 राज्य वृक्ष आंबा

महाराष्ट्राचा राज्य वृक्ष आंबा आहे व भारताचं राष्ट्रीय फळ देखील आंबा आहे. हा वृक्ष महाराष्ट्राच्या सर्वच भागात आढळून येतो. आंबा हा एक सदाहरित वृक्ष असून, भारतात अनेक भागांमध्ये त्याची खास लागवड केली जाते. आंब्याच्या आपल्याकडे अनेक जाती आहेत. त्यात सर्वात प्रसिद्ध हापूस, पायरी, लंगडा, केसर, चौसा, तोतापुरी, नीलम, बंगनपल्ली जाती आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यात या विविध प्रकारच्या आंब्याची लागवड केली जाते.

सर्व जगभरातून आपल्या भारतीय आंब्याला मागणी असते आणि त्यात खासकरून आपल्या देवगड आणि रत्नागिरीच्या हापूस आंब्याला.

आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर जैवविविधता आहे. या सगळ्या जाती / प्रजाती आपल्याला बघणं काही शक्य नाही, मात्र आपले हे राज्य प्राणी, पक्षी, फुलपाखरी, मासे, फुल आणि झाडं आपण नक्कीच बघितले पाहिजे.

1 Comment

  • Makarand Joshi

    माहितीपूर्ण आणि रंजक लेख

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

One Response

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Pandharpur Wari : वर्षातून चारदा होणाऱ्या वाऱ्या हे पंढरपुरचे वैशिष्ट्य. शिवाय महिन्याच्या एकादशीला येणारे भाविक वेगळेच. वर्षभराचा विचार केला तर
Chandrabhagechya Tiri : संक्रांतीच्या आदल्या दिवसाला ‘भोगी’ म्हणतात. रुक्मिणीमाता हे लक्ष्मीचे स्वरूप आहे, असे समजून पंढरपुरात हा सण साजरा होतो.
Maha Kumbh mela: प्रयागराज महाकुंभमेळाव्यामध्ये आयटीयूएस मरीन कंपनीकडून 1 एम्पिबियस बोट तैनात करण्यात येणार आहे.

विधानसभा फॅक्टोइड

मुंबई – औद्योगिक प्रयोजनासाठी एनए सनद आवश्यक नाही; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश