भारताच्या पोटात पाकिस्तान न बनण्याची गोष्ट…

देशाच्या स्वातंत्र्यानंतर काश्मीर आजही धगधगत आहे. एवढ्या वर्षात काश्मीरचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. एवढ्यात सुटण्याची चिन्हंही नाहीत. या परिस्थितीत हैदराबादमध्ये वेळीच लष्करी कारवाई झाली नसती तर, निझामाला स्वतंत्र राष्ट्र मिळालं असतं किंवा हैदराबाद पाकिस्तानचा भाग झाला असता.

“मेरी सल्तनत अब खत्म हो चुकी हैं, हथियार डाल दो!”

17 सप्टेंबर 1948 या दिवशी हैदराबादच्या रेडिओवरून सातवा निजाम मीर उस्मान अली खाननं ही घोषणा केली. भारत देशात ‘हैदराबाद संस्थान’ विलीन झालं. देशाच्या स्वातंत्र्यानंतरही 13 महिने आणि 13 दिवस हैदराबाद संस्थानच्या ‘मुक्ती’चा रक्तरंजित लढा चालला. भारत सरकारनं केलेली लष्करी कारवाई आणि संस्थानातल्या स्वातंत्र्यसैनिकांचा लढा, यामुळं जगातला सर्वात श्रीमंत आणि बलाढ्य संस्थानिक निजाम भारताला शरण आला. या मुक्तिसंग्रमाची कहाणी मोठी संघर्षमय आहे.

भारताच्या पोटातला कॅन्सर

देशाच्या स्वातंत्र्यानंतर काश्मीर आजही धगधगत आहे. एवढ्या वर्षात काश्मीरचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. एवढ्यात सुटण्याची चिन्हंही नाहीत. या परिस्थितीत हैदराबादमध्ये वेळीच लष्करी कारवाई झाली नसती तर, निझामाला स्वतंत्र राष्ट्र मिळालं असतं किंवा हैदराबाद पाकिस्तानचा भाग झाला असता. या दोन्ही शक्यतांची कल्पनाही करणं कठीण आहे. सरदार पटेलांनी हैदराबादचा मुद्दा म्हणजे भारताच्या पोटातला कॅन्सर असल्याचं म्हटलं होतं. ज्याचं वेळीच ऑपरेशन झालं आणि भारत वाचला.

हैद्राबादचं अधिष्ठान

हैदराबाद संस्थानात एकूण 16 जिल्हे होते. त्यातल्या मराठी भाषिक 5 जिल्ह्यांना मराठवाडा नाव म्हटलं जायचं. निजाम संस्थानचं स्वतःचं सैन्य होतं. रेल्वे होती. स्वतःचं चलन होतं. त्यातली काही नाणी चांदीची होती. स्वतंत्र डाक यंत्रणा होती. संस्थानातल्या 10 जहागिदारांकडून मिळणारं वार्षिक उत्पन्न त्यावेळी 2 कोटींच्या घरात होतं. एवढ्या बलाढ्य संस्थानाला भारतानं झुकवलं.

स्वतंत्र राष्ट्रासाठी प्रयत्न

15 ऑगस्ट 1947 ला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून भारत स्वतंत्र झाल्यानंतर हैदराबादच्या निझामानं भारतात येण्यास नकार दिला. हैदराबाद संस्थाननं मोहम्मद अली जिन्नासोबत बोलणी करून पाकिस्तानात जाण्याची तयारी दाखवली होती. त्याला भारतानं विरोध करताच हैदराबाद संस्थानाला स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा मिळवण्यासाठी निझामानं प्रयत्न केले. निझामाचे वकिल संयुक्त राष्ट्र संघापर्यंत पोहोचले. भारतानं आपली भूमी बळकावण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हणत, भारत हा एक आक्रमणकारी देश असल्याचा आरोप निझामानं संयुक्त राष्ट्र संघात केला.

भेदरलेली जनता

कल्पना करा, भारत ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आहे. शेकडो वेगवेगळ्या संस्थानिकांमध्ये, भाषांमध्ये, प्रांतांध्ये विभागलेला भूभाग एक अखंड आणि प्रचंड देश म्हणून उदयाला आला. सगळीकडे स्वातंत्र्याचा आनंद आहे. जनता मोकळ्या हवेत श्वास घेतीय. आणि त्याच वेळी याच देशाच्या मधोमध एक असा प्रांत आहे जो अजूनही पारतंत्र्यात आहे. तिथली जनता रोज मरणयातना भोगत आहे. जेव्हा सगळा देश अभिमानानं तिरंगा फडकवत होता, तेव्हा या भागात तिरंगा हातात घेणं गुन्हा होता. या अत्याचारातून मुक्ती मिळवण्याचे प्रयत्न देशाच्या स्वातंत्र्यानंतही सुरू होते आणि त्यादरम्यान इथल्या जनतेला पाकिस्तानात जोडलं जाण्याची भीती निर्माण झाली होती.

निझामाच्या रसदीवर पोसलेले रझाकार

हैदराबाद संस्थानानं रझाकार नावाची लष्करी संघटना उभारली होती. तिचा प्रमुख होता कासिम रिझवी. अलिगड मुस्लीम वि‌द्यापीठातून कायद्याचा पदवीधर. मूळचा लातूरजवळच्या पाखर सांगवीचा रहिवाशी. भारताच्या मध्यभागी पाकिस्तान तयार करण्याचे रिझवीचे मनसुबे होते. त्याला साथ होती ‘मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन’ संघटनेच्या बहादूर यार जंगची. आपला आणि या रझाकारांचा काहीही संबंध नाही असं सातवा निजाम भारत सरकारला सांगत होता. प्रत्यक्षात, रझाकारांच्या सर्व कारवायांना आणि अत्याचाराला निझामाचा पाठिंबा होता. रिझवीच्या रझाकारांना पोसण्याचं काम निजाम करत होता. त्यांच्यासाठीचा खर्च आणि आधुनिक शस्त्र हे निझामाने पुरवले. संस्थानातल्या जनतेवर अत्याचार करवले. मुक्तीसाठी लढणाऱ्यांना चिरडून टाकलं. निजामानं आपला एजंट लंडनला पाठवून पोर्तुगीज आणि ऑस्ट्रेलियाकडून जवळपास 25 कोटी रुपयांची शस्त्रं विकत घेतली. पाकिस्ताननंही म्यानमारमार्गे काही शस्त्रे निझामाच्या सैन्यासाठी पाठवली होती.

स्वतंत्र मुस्लीम राष्ट्राचं स्वप्न

दिल्लीच्या लाल किल्ल्यावर निजामाचा झेंडा फडकवण्याचं स्वप्न रिझवीनं मीर उस्मान अली खानला दाखवलं होतं. बंगालच्या उपसागराचं पाणी निजामाच्या पायावर आणून घालतो, म्हणजे तो प्रदेशही निजाम संस्थानात आणतो असं रिझवी सांगायचा. या सगळ्यानं निजामाला गुदगुल्या व्हायच्या. याच मंडळींच्या जीवावर निजाम स्वतंत्र मुस्लीम राष्ट्राची स्वप्न पाहू लागला होता. दुसरीकडे रिझवीचा झुकाव मात्र पाकिस्तानाकडे होता.

स्वायत्त देशात खुलेआम कत्तली आणि अत्याचार

29 नोव्हेंबर 1947 रोजी लॉर्ड माउंटबॅटन यांनी हैदराबादचा निजाम आणि भारत सरकारमध्ये ‘जैसे थे’ करार केला. हैदराबाद संस्थान भारताच्या अधिपत्याखाली पण स्वायत्त देश असेल (Autonomus Dominion nation under India) अशी तरतूद त्यात होती. याचा फायदा घेत निजामाचं सैन्य आणि विशेषतः रझाकारांनी उन्माद केला. 1945 ते 1948 पर्यंत हैदराबाद संस्थानात अत्याचारानं परिसीमा गाठली होती. खुलेआम कत्तली, अत्याचार, लूट, बलात्कार हे रोजचंच झालं होतं.

दिल्लीतून सावध पावलं

हैदराबाद संस्थानात अत्याचाराचा जोर वाढला असून हे संस्थान खालसा करावं यासाठी दिल्लीत दबाव वाढत होता. सरदार पटेलही यासाठी अनुकूल होते. त्यांनी अनेकदा लष्करी कारवाईचे संकेतही दिले होते. पण प्रत्यक्ष कारवाईबाबत संभ्रम होता. कारण, निजाम आधीच संयुक्त राष्ट्र संघात जाऊन आला होता. भारतानं हैदराबादवर थेट लष्करी बळाचा वापर केला असता तर हा मुद्दा आंतरराष्ट्रीय झाला असता आणि निजामानं त्याचा पुरेपुर फायदा घेतला असता.

पटेलांचा सर्जिकल स्ट्राईक

11 सप्टेंबर 1948 ला मुहम्मद अली जिनाचा मृत्यू झाला. आणि हीच संधी भारत सरकारनं साधली. तत्कालिन गृहमंत्री वल्लभभाई पटेलांनी हैदराबाद संस्थानवर चाल करण्याचे आदेश दिले. हैदराबादच्या चारही बाजूनं सैन्य घुसवण्याचं नियोजन केलं गेलं. आजच्या भाषेत त्याला सर्जिकल स्ट्राईक म्हणू शकतो. भारतीय लष्कराच्या एकूण चार तुकड्या औरंगाबाद, सोलापूर, विजयवाडा आणि बीदरमार्गे हैदराबादच्या दिशेनं निघाल्या. या कारवाईला नाव दिलं गेलं ‘ऑपरेशन पोलो’. पुढं हा विषय आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चिला गेल्यानंतर हा आपला अंतर्गत मुद्दा असल्याचं सांगत ही लष्करी कारवाई नाही तर ‘पोलीस अॅक्शन’ होती असं स्पष्टीकरण भारत सरकारनं दिलं.

रझाकारांनी पेरलेल्या सुरुंगात शीख सैनिक शहीद

सोलापूरहून हैदराबादला जाणाऱ्या भारतीय बटालियनचे नेतृत्व करत होते, मेजर जनरल जे. एन. चौधरी. सोलापूरच्या दयानंद महवि‌द्यालयाच्या मैदानावर भारतीय लष्कराचा कॅम्प लागला होता. 13 सप्टेंबरला सकाळी है सैन्य सोलापूरहून निघालं. ही माहिती रझाकारांना कळाली. वाटेत नळदुर्गच्या पूर्वेला असलेल्या एका पुलावर रझाकारांनी सुरुंग पेरले. हा पूल उडवून देण्याचा त्यांचा मानस होता. पण एका शीख सैनिकानं हा बॉम्ब निकामी केला आणि पूल वाचला. भारतीय सैन्य वायू वेगानं हैदराबादच्या दिशेनं निघालं. पुढे जळकोटला वीटभ‌ट्टीवर सैन्याचा रझाकारांशी सामना झाला. तिथे रझाकारांना धूळ चारत मजल दरमजल करत सैन्य पुढे उमरगामार्गे हैदराबादेत पोहोचलं.

‘इस गधे को यहां से हकाल दो’

जे. एन. चौधरींच्या नेतृत्वात हैदाराबादच्या फतेह मैदानावर (आताचं लाल बहा‌दुर शास्त्री मैदान) भारतीय सैन्य पोहोचलं. तिकडे निजाम, कासिम रिझवी आणि निझामाचा लष्करप्रमुख जनरल अल इदूसची बैठक पार पडली. भारतीय सैन्य हैदराबादेत पोहोचलं तरीही रिझवी मागे हटण्यास तयार नव्हता. या बैठकीत त्यानं भारतासोबत युद्धाची भाषा केली. निजामानं लष्करप्रमुख इदूसला विचारलं, आपण भारताचा मुकाबला करू शकतो का? सहाजिकच इदूसनं नाही असं उत्तर दिलं. त्यावर चिडलेल्या रिझवीनं निजामासमोरच त्याला सुनावलं, ‘इस गधे को यहां से हकाल दो’

रेडिओवरून निजामानं पसरवल्या अफवा

मेजर जनरल जे. एन. चौधरी निजामाच्या भेटीला गेले. तेव्हा रेडिओवरून निजामाची फतेह होत असल्याच्या बातम्या दिल्या जात होत्या. तेव्हा चौधरींनी निजामाला सुनावलं, तुमचे रेडिओ काहीही सांगत असले तरी वास्तव हे आहे की, तुम्हाला चारही बाजूने भारतीय लष्करानं घेरलं आहे. तुम्हाला शरण जाण्याशिवाय पर्याय नाही. संस्थानात जीवितहानी टाळण्यासाठी निजामाला रेडिओवरून घोषणा करण्यास सांगितलं गेलं. तेव्हा अटक टाळण्यासाठी निजामानं रेडिओवरून संस्थानातल्या जनतेला आणि सैन्याला उ‌द्देशून घोषणा केली, ‘मेरी सल्तनत अब खत्म हो चुकी हैं। हथियार डाल दो’

औपचारिक शरणागती

त्यानंतर लष्करी शिष्टाचाराप्रमाणे निजामाचा लष्करप्रमुख इदूस आणि भारतीय लष्कराचे प्रतिनिधी म्हणून मेजर जनरल जे. एन. चौधरींमध्ये फतेह मैदानावर सैन्य शरणागतीची प्रक्रिया पार पडली. चौधरींनी निजामाच्या सैन्याकडून अभिवादन स्वीकारलं. चौधरींनी खिशातून सिगारेट काढली, ती इदूसनं पेटवली. त्यानंतर दोघांनी हस्तांदोलन केलं आणि निझाम सैन्याची औपचारिक शरणागती पार पडली. काही काळानं भारतीय सैन्य चारही बाजूनं हैदराबादेत आलं आणि शहराचा ताबा घेतला. भारतीय लष्कराच्या चार तुकड्‌यांपैकी सर्वात आधी हैदराबादला पोहोचलेले जे. एन. म्हणजेच जयंत नाथ चौधरी हे बंगाली अधिकारी हैदराबादचे मिलिट्री गव्हर्नर झाले. पुढे ते देशाचे लष्करप्रमुख झाले. त्यांना प‌द्मविभूषण पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं.

गावागावात मुक्तीचा लढा

हैदराबाद मुक्तीसंग्रमाचा लढा भारतीय स्वातंत्र्यलढ्‌यासारखा नव्हता. तो अधिक गुंतागुंतीचा होता. संस्थानातल्या गावागावात मुक्तीसाठी लढा दिला गेला. प्रत्येक सर्वसामान्य माणसानं रझाकारांचा प्रतिकार केला. त्याबदल्यात अनन्वित अत्याचार सहन केले. प्रसंगी बलिदानही दिलं. पण मुक्त होण्याचं, भारत देशात येण्याचं स्वप्न पाहणं सोडलं नाही. अतिशय साधी माणसं या लढ्‌यात प्रचंड बलाढ्य निझामाविरोधात उभी ठाकली होती.

गांधींचा सशस्त्र लढ्‌याला पाठिंबा

रझाकारांनी संस्थानातल्या नागरिकांवर केलेले प्रचंड हिंस्र अत्याचार, कत्तली पाहून महात्मा गांधींनीही हैदराबादच्या मुक्तीसाठी सशस्त्र लढ्‌याला पाठिंबा दिला होता. मराठवाड्‌याच्या खेड्यापाड्यात मुक्तिसंग्रामातल्या बलिदानाच्या कहाण्या आहेत. या स्वातंत्र्यसैनिकांना ना फार ओळख मिळाली, ना वलय मिळालं. पण अनेक गावांमध्ये उभी असलेली हुतात्मा स्मारकं आजही या बलिदानाची साक्ष देत आहेत.

हैदराबाद संस्थानाला, मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी लढलेल्या, बलिदान दिलेल्या सर्व ज्ञान-अज्ञान स्वातंत्र्यवीरांना शतशः नमन!

मुक्तीसंग्राम दिन चिरायू होवो !

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Pandharpur Wari : वर्षातून चारदा होणाऱ्या वाऱ्या हे पंढरपुरचे वैशिष्ट्य. शिवाय महिन्याच्या एकादशीला येणारे भाविक वेगळेच. वर्षभराचा विचार केला तर
Chandrabhagechya Tiri : संक्रांतीच्या आदल्या दिवसाला ‘भोगी’ म्हणतात. रुक्मिणीमाता हे लक्ष्मीचे स्वरूप आहे, असे समजून पंढरपुरात हा सण साजरा होतो.
Maha Kumbh mela: प्रयागराज महाकुंभमेळाव्यामध्ये आयटीयूएस मरीन कंपनीकडून 1 एम्पिबियस बोट तैनात करण्यात येणार आहे.

विधानसभा फॅक्टोइड

मुंबई – औद्योगिक प्रयोजनासाठी एनए सनद आवश्यक नाही; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश