सुमारे 300 वर्ष जुनी गोष्ट असेल.. स्थळ अलिबाग.. मुंबईकरांचं तसं परिचयाचं ठिकाण. अलिबाग शहर आणि कुलाबा किल्ल्याला जोडणारा वाळूचा टापू तेव्हाही ओहोटीला उघडा पडत असे.. किल्ल्यात सरखेल कान्होजी आंग्रेंच्या नेतृत्वाखाली मराठा नौदलानं मोर्चेबांधणी केलेली होती. तर किनाऱ्यावर ब्रिटिश अन पोर्तुगीजांनी विजोड पण संधीसाधू युती करून आपले संयुक्त पायदळ-घोडदळ कान्होजींच्या आरमाराचा समूळ नाश करण्यासाठी तैनात केले होते.. समुद्राच्या बाजूने ब्रिटिश जहाजे आग ओकत होती.. पण या युरोपियन शत्रूंनी किल्ल्यावर केलेला पहिला हल्ला मराठयांनी सहज परतवला होता.. बुरुजांवर सज्ज मराठा सैनिकांनी त्यांच्या हत्यारांच्या टप्प्यात टोपीकर-फिरंगी येताच गोफण, बंदूका, तोफा वापरून त्यांना भाजून काढले होते. जखमी झालेले आक्रमक कसेबसे त्यांच्या तळाच्या दिशेनं परतत होते. थंडीचे दिवस आणि सूर्यनारायण आता मावळतीच्या दिशेने कलू लागला होता. ब्रिटिश गव्हर्नर आणि फिरंगी व्हाइसरॉयच्या मनात उद्या आपली फौज कोणती रणनीती वापरून पुढे न्यायची आणि निर्णायक हल्ला करायचा हा विचार बहुतेक चालला असावा.. अशावेळी अचानकपणे आक्रमक फौजांना चकित करणारा आणि त्यांच्यावर निर्णायक वार करून या हल्ल्याचे कंबरडे मोडणारा निर्णय सरखेल कान्होजी आंग्रेंनी घेतला.
बलाढ्य युरोपियन मरीन फोर्सेसना चारवली धूळ
ब्रिटिश आणि पोर्तुगीज सैन्यात काही सुसूत्रता असलेली व्यूहरचना दिसत नव्हती, याचा फायदा घेऊन किल्ल्यातून मराठा घोडदळाच्या एका तुकडीने कूच केले. वादळाच्या वेगाने या घोडदळाने किनाऱ्यावर तैनात शत्रूवर चाल केली आणि लांडगेतोड सुरु केली.. आपल्या प्रगत तोफखान्याचा वापर करण्याची संधीही युरोपियनांना मिळाली नाही.. बाकदार समशेरी घेतलेले मराठे जेव्हा वीजेसारखे शत्रूवर कोसळत तेव्हा शत्रूकडे फारशी संधी उरत नसे. या हल्ल्याचा अपेक्षित तोच परिणाम झाला. ब्रिटिश-पोर्तुगीज युतीचे मनोबल आणि ऐक्य दोन्ही या हल्ल्याने नष्ट केले. थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या आज्ञेने तिथं मदतीस आलेल्या पिलाजी जाधवरावांच्या तुकडीनेही पराक्रम गाजवला.. दोन बलाढ्य युरोपियन मरीन फोर्सेसच्या युतीला मराठा आरमाराच्या सेनानीने धूळ चारली होती. आज तीनशे वर्षांनीही मराठ्यांच्या आरमारी परंपरेच्या दृष्टीने हा ऐतिहासिक क्षण आहे. ज्या मंदिराचा सुवर्ण कळस सरखेल कान्होजी आंग्रेंनी घडवला, त्याचा पाया रचला छत्रपती शिवाजी महाराजांनी. त्यांना आधुनिक भारतीय नौदलाचे जनक म्हंटले जाते ते अगदी यथार्थ आहे.
बोरीवलीत एक हजार वर्षांपूर्वीच्या सागरी युद्धाची वीरगळ
पण समुद्री प्रवास, व्यापार आणि युद्धे भारतीयांसाठी नवीन होती अशातला भाग नाही. पण अजूनही स्पष्ट न झालेल्या काही कारणाने भारतीयांनी या विद्येकडे मध्ययुगात दुर्लक्ष केले होते असे दिसते. मुंबईत बोरिवली पश्चिमेला एकसर नावाच्या ठिकाणी नाविक युद्धाची गाथा सांगणारी वीरगळ आहे. वीरगळ म्हणजे लढायांमध्ये वीरगती प्राप्त झालेल्या योद्ध्यांच्या स्मरणशिळा… एकसरची वीरगळ खास, कारण हजार वर्षांपूर्वी मुंबईजवळच झालेल्या सागरी युद्धाचा प्रसंग यात कोरलेला दिसतो. काही संशोधक याला शिलाहार-यादवकालीन युद्धाचा साक्षीदार मानतात .. तर डॉक्टर पंडितांच्या मते नक्की कोणत्या लढाईचा हा प्रसंग आहे याबद्दल अचूक पुरावा उपलब्ध नाही. टॉलेमीच्या पेरिप्लस ऑफ एरिथ्रियन सी नावाच्या 2000 वर्षे जुन्या पुस्तकात सोपारा, सेमुल्ल, मंदगोरा, बालपटन, मेलिझिगारा, बायझंटियम अशी नावे दिलेल्या कोकणातील बंदरांचे उल्लेख आहेत. मुंबईला त्याने हेप्टनेशिया म्हंटले असावे.
ठाणे ते एडन (येमेन) जलवाहतूक
या जुन्या वर्णनांमध्ये मका, भात, लोणी, कापूस साखर इत्यादी आफ्रिकेस निर्यात होत असे अशा नोंदी आहेत. विरार जवळच्या आगाशी बंदरात एकेकाळी 500 टन वजनाची जहाजे बांधली जात असेही ऐतिहासिक उल्लेख आहेत. ही जहाजे अगदी युरोपपर्यंत प्रवास करायला सक्षम होती असे गॅझेट नोंदी सांगतात.. इब्न बतूता स्वतः कोकणात आलेला नसावा पण त्याने ठाणे ते एडन जलवाहतूक होत असे म्हंटले आहे. मग ही नाविक परंपरा कशी लुप्त झाली? स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात तसं समुद्रबंदीच्या बेडीने भारतीयांना जखडून टाकले का?
शिवछत्रपतींची आरमारी जहाज बांधणी आणि पोर्तुगीजांची मोर्चेबांधणी
कोणास ठाऊक पण छत्रपती शिवरायांनी स्वराज्य बांधणी सुरु केली तेव्हा सह्याद्रीच्या पश्चिमेला असलेल्या कोकण किनाऱ्यावर इंग्लिश, डच, पोर्तुगीज, सिद्दी अशा बलाढ्य शत्रूंचे वर्चस्व होते. त्यांच्यावर प्रभुत्व मिळवून व्यापार सुरक्षित करायचा असेल तर मराठ्यांचे स्वतःचे आरमार उभे करावेच लागणार होते. वसईच्या खाडीत दुर्गाडीजवळ आणि धरमतर जवळ भोगवती नदीच्या किनारी पेणजवळ शिवरायांनी पहिली आरमारी जहाजे बांधून घेतली. रुई लेंटव व्हिएगश आणि त्याचा मुलगा फर्नाव व्हिएगश यांच्याकडून २० संगमेश्वरी पद्धतीच्या लढाऊ नौका बांधून घ्यायला सुरुवात केली होती. पुढं व्हिएगश पितापुत्रांना पोर्तुगीज अधिकाऱ्यांनी परत नेण्यात यश मिळवले. पण तोवर स्थानिक कारागिरांनी नौका बांधणीच्या कामात बरेच कौशल्य मिळवले होते. 19 July 1659 अंतोनियो द मेलो द काशत्रू या वसईच्या कॅप्टनने हा तपशील गोव्याच्या व्हाइसरॉय ला पत्राद्वारे कळवले असे दिसते. पोर्तुगीजांच्या वसई-गोवा पत्रव्यवहारात या मराठा गलबतांना खाडीतून बाहेर पडू देऊ नये आणि हल्ला करावा असाही विचार झाल्याचे दिसते. कारण उल्हास नदीच्या मुखाशी उत्तरेला वसईचा किल्ला होता. पण शिवरायांची एकंदर ताकद आणि सिद्दीला शह देण्यासाठी हे आरमार घडवायचेच हा निर्धार पाहता पोर्तुगीजांनी हा बेत रद्द केला. इंग्लिशांच्या 15 ऑगस्ट 1674 च्या कागदपत्रात या आरमाराचा दर्जा अगदी हीन आहे, या नौका हलक्या आणि क्षुद्र आहेत, इंग्लिश फ्रिगेट्स समोर टिकणार नाहीत अशी घमेंड दिसते. पुढं 1679 मध्ये हीच ‘हीन गलबते’ वापरून मराठ्यांनी भर पावसाळ्यात सुसज्ज इंग्लिश आरमाराच्या नाकावर टिच्चून खांदेरी बांधून काढला आणि त्यावरील अनेक आक्रमणे परतवली. शेवटी मराठ्यांचे खांदेरीवरील स्वामित्व त्यांना मान्य करावे लागले.
हे ही वाचा : https://shreshthmaharashtra.com/photo_gallery/shreshth-maharashtra-navy-day/
मराठ्यांचे सागरी परवाने
“आरमार म्हणजे स्वतंत्र एक राज्यांगच आहे. जसे ज्यास अश्वबल त्याची पृथ्वी प्रजा आहे, तद्वतच. ज्याच्याजवळ आरमार त्याचा समुद्र. याकरता आरमार अवश्यमेव करावे”
या शब्दांत शिवरायांनी त्यांचा संकल्प स्पष्ट केला आहे. शिवपूर्व काळात पोर्तुगीजांच्या 40-50 वसाहती हिंदी महासागराच्या विविध भागांत पसरल्या होत्या. पोर्तुगीज राजा स्वतःला हिंदी महासागराचा स्वामी म्हणवत असे आणि भरपूर रक्कम घेऊन काही मर्यादित जहाजांना समुद्र भ्रमंतीचे परवाने म्हणजे कार्ताझ दिले जात असत. शिवाय इंग्लिश, डच, फ्रेंच, जंजिरेकर सिद्दी अशा सत्तांचा ताप होताच. ही परिस्थिती शिवरायांच्या द्रष्टेपणाने बदलली आणि पुढे सरखेल कान्होजी आंग्रेंच्या काळात इतर कोणाचे परवाने न घेता मराठे स्वतःचा कौल जहाजांना देऊ लागले. फक्त वसईतून मराठ्यांनी 7 लक्षांचा महसूल मिळवला.
आरमाराच्या साथीला जलदुर्ग
आरमारी ताकद उभी करायची तर फक्त गलबते गुराबे बांधणे पुरेसे नव्हे तर उत्तम बंदरे आणि किनारपट्टीला सुरक्षा पुरवणारे दुर्ग बांधणेही गरजेचे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या पाच जलदुर्गांपैकी सगळ्यात विशाल आणि मजबूत किल्ला म्हणजे सिंधुदुर्ग. एक कोटी होन खर्च करून महाराजांनी हा किल्ला बांधून घेतला. हिरोजी इंदुलकरांची रचना असलेल्या या दुर्गाच्या बांधकामात 500 पाथरवट, 200 लोहार, 100 पोर्तुगीज कारागीर आणि 3000 मजूर यांनी जवळपास 3 वर्षांत किल्ल्याचे बांधकाम पूर्ण केले.
“आमचे लक्ष सिंधुदुर्गी स्थिरावले असे हे बरे जाणणे. अवघे काम चखोट करणे. माणसे नवी आहेती त्यास सांभाळोन इत्येकांचा उपेग करून घेणे. पाया भला रुंद घेणे. खाली अवघा कातळ तरी वर थोर इमारत. तस्माद दो बाजूंस दो हात जागा सोडून तट उभारला इतकी रुंदी घेणे, तट कोठे रुंद तर कोठे जाग जागा अरुंद येणेप्रमाणे धरावा लागतो. अनुकूल दिसेल त्याप्रमाणे करणे” – या शब्दांत छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या माणसांना दिशा दाखवतात.
महाराज आग्र्यात तरी सिंधुदुर्गाचे काम पूर्ण
1671 च्या सुमारासचे इंग्लिश दस्तऐवज असे सांगतात की, शिवरायांनी किल्ल्यांच्या देखरेखीसाठी पावणेदोन लाख होनांच्या रकमेची तरतूद केली होती. त्यापैकी दहा हजार होन सिंधुदुर्ग किल्ल्यासाठी होते. इतिहास म्हणजे फक्त तारखांची जंत्री आणि तहाची कलमे घोकण्याचा कंटाळवाणा विषय अशी आपल्यापैकी बहुतेक लोकांची धारणा असते. त्याचा आजच्या जीवनाशी काहीच संबंध नाही आणि उगाचच निरुपयोगी माहिती डोक्यात कोंबून परीक्षेत ओकण्याचा हा विषय असावा या पद्धतीने तो बहुसंख्य शाळांमध्ये शिकवला जातो. पण इतिहास आपल्याला सांगत असतो की आपण आजवर कोणती वाट चालून इथं पोहोचलो, या वाटेवर काय चुका केल्या, कोणत्या गोष्टी चांगल्या प्रकारे केल्या. आता सिंधुदुर्गाचे पहा ना, किल्ला बांधायला सुरुवात झाली नोव्हेंबर 1664 मध्ये आणि किल्ला पूर्ण झाला 1667 च्या सुमारास. 29 मार्च 1667 रोजी छत्रपती शिवाजी महाराज सिंधुदुर्ग पाहण्यासाठी इथं आले. या तारखा आपल्याला काय सांगतात बरं? या मधील काळात पुरंदरचा तह झाला होता आणि छत्रपती शिवाजी महाराज आग्ऱ्याला जाऊन अडकले होते. तरीही ठरलेल्या नियोजनाप्रमाणेच सिंधुदुर्ग बांधणी सुरु राहिली आणि वेळेवर पूर्णत्वालाही गेली. मराठ्यांच्या स्वराज्यातील शासन आणि शिवरायांच्या पदरी असलेल्या लोकांची अढळ निष्ठा हे पाहून लक्षात येते. “
सिंधुदुर्गाची महती
चौऱ्याऐंशी बंदरात हा जंजिरा अठरा टोपीकरांचे उरावर शिवलंका अजिंक्य जागा निर्माण केला. सिंधुदुर्ग जंजिरा जगी अस्मानी तारा. जैसे मंदिराचे मंडन श्री तुलसी वृंदावन, तैसा महाराजांचे राज्याचा भूषणप्रद अलंकार चतुर्दश महारत्नांपैकी पंधरावे रत्न महाराजांस प्राप्त झाले.” चित्रगुप्ताच्या बखरीत सिंधुदुर्गाची महती अशी सांगितली आहे.
वाढती आरमारी ताकद
पद्मदुर्ग आणि कुलाबा या दोन ठिकाणी मराठा जलदुर्ग बांधणीतील वैशिष्ट्ये दिसतात. कुलाब्याला दगडी शिळा एकावर एक रचून चुना न वापरता बांधकाम केले आहे. तर पद्मदुर्ग किल्ल्यावर इतके मजबूत चुनेकाम आहे की लाटांच्या तडाख्याने दगड झिजले तरी चुना तसाच आहे. ही आरमारी ताकद वाढत गेली. जहाजे बांधण्यासाठी सागवानाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली. युरोपियन पद्धतीच्या तोफा ओतण्याचे प्रयत्न झाले. ते जमले नाही तर कान्होजी तुळाजी यांच्या काळात युरोपियन जहाजे जिंकून त्यावरील उत्कृष्ट तोफा मराठे हस्तगत करत आणि आपल्या जहाजांवर तैनात करत. वेंगुर्ल्याच्या लढाईत खवासखानाला पराभूत करत असताना मराठ्यांनी रॉकेट्स (टिपू सुलतानाच्या कैक वर्षे आधी) आणि मस्केट, कार्बाईन (घोडदळासाठीची छोटी बंदूक) सारखी हत्यारे वापरली असं डच कागदपत्रे सांगतात.
सहाशे वर्षांनी मराठ्यांनी दर्यावदी परंपरा केली जीवंत
सरखेल कान्होजी आंग्रे आरमारी व्यूहरचनेचे गुरु. 1704 मध्ये त्यांनी एकही गोळा न डागता फक्त काही गलबते पेणच्या खाडीतून पुढं तैनात करून मुंबई बंदराची नाकेबंदी केली होती. चार्ल्स बून सारख्या इंग्लिश अधिकाऱ्यांनी मराठा नौदल नष्ट करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण त्यांची हार होत राहिली. 1718 साली खांदेरीचा हल्ला विफल झाला. 1718 आणि 1720 साली घेरिया म्हणजेच विजयदुर्गावरील इंग्लिश आक्रमकांचा रुद्राजी अनंत नामक उत्कृष्ट किल्लेदाराच्या नेतृत्वाखाली दारुण पराभव केला गेला. मराठ्यांकडे आता 150 ते 300 टनी गुराबे, त्याहून मोठी 25 ते 40 तोफा आणि 400 माणसे असलेली पाल नावाची जहाजे होती. पुन्हा एकदा मोखा सारख्या बंदरांशी व्यापार सुरु झाला. चोल सम्राटांची दर्यावर्दी परंपरा सहा शतकांनंतर मराठ्यांनी पुन्हा जीवित केली.
समुद्राच्या तळाशी संरक्षक भिंत
हा आपल्याला ठाऊक असलेला इतिहास आहे. परंतु अजून बरेच संशोधन करायला वाव आहे. विजयदुर्ग किल्ल्याजवळ समुद्राच्या तळाशी संरक्षक भिंत असल्याचे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीच्या संशोधनात आढळलं. या शिवकालीन भिंतीला धडकून शत्रूची कैक जहाजे रसातळाला गेली. कमांडर विजय गुपचुप आणि डॉ शील त्रिपाठी यांनी या अनोख्या भिंतीबद्दल संशोधन केले आहे. या ठिकाणी दगडी नांगर, हत्यार म्हणून वापरल्या जाणाऱ्या लोखंडी बेचक्या आणि काही मातीची भांडी असे अवशेष नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीच्या संशोधनात इथं सापडले आहेत. आजही इथं आंग्रेकालीन जहाज बांधणीसाठीची गोदी पाहता येते.
सामरिक महत्त्व
संगमेश्वर जवळ निढळेवाडी गावात आजही शिवरायांनी निवडलेल्या जहाज बांधणी कारागीरांच्या पुढच्या पिढ्या आहेत. त्यांच्या कौशल्याला उचित सन्मान देऊन जर एखादे शिवकालीन गलबत गुराब शिबाड पुन्हा बांधून काढले, त्यावर संग्रहालय केले तर नुसते पुतळे बांधण्यापेक्षा ते चांगले स्मारक ठरेल. समुद्राचे सामरिक महत्व मराठ्यांनी ओळखले. याबाबतीत स्वतःला आत्मनिर्भर करण्याचे प्रयत्नही झाले. आजही भारतीय नौदलासाठी ही दोन सूत्रे महत्वाची आहेत.
संदर्भ –
History of Konkan – Rev Alexander Kyd Nairne
Maratha Navy – Dr Sachin Pendse
A History Of The Maratha Navy And Merchantships- Dr. B K Apte
1 Comment
विजयदुर्ग किल्ल्याच्या बाहेर समुद्राखाली असलेली रचना ही मानवनिर्मित भिंत नाही. ती निसर्गनिर्मित डाईक नावाची रचना आहे.
एन आय ओ च्या संशोधनात त्रुटी आहेत.