स्थापना वर्ष 1874. ‘ज्ञानादेव तु कैवल्यम’ असा संदेश देत पंढरपूरकरांना ज्ञानामृत वाटणारी ही पाणपोई चंद्रभागातटी आहे. कोणे एके काळी चंद्रभागेच्या वाळवंटात खरंच वाळू होती. लोक फिरत फिरत वाळवंटात जायचे. तिथं मिळणारा चिवडा खायचे. पोरेटोरे नदीच्या पाण्यात व वाळूत मनसोक्त हुंदडायची. कालौघात वाळू संपली, बारमाही वाहणारे झुळझुळ पाणी थांबले. परंतु किनाऱ्याहून हे सर्व पाहणारी नगर वाचन मंदिराची इमारत आजही उभी आहे.
आध्यात्मिक नगरातली वाचन मंदिर
‘नेटिव्ह जनरल लायब्ररी’ हे या नगरवाचन मंदिराचं पूर्वीचं नाव होतं. या लायब्ररीची स्थापना तत्कालीन न्यायाधीश लालशंकर उमियाशंकर त्रिवेदी यांनी केली. ग्रंथालयाची सुरुवात शेजारी असलेल्या तत्कालीन व्हिक्टोरिया जुबिली हायस्कूलच्या (आजचे लोकमान्य विद्यालय) एका प्रशस्त खोलीत झाली होती. त्यानंतर पाच मे 1917 रोजी या संस्थेने सांप्रतची जागा खरेदी केली. त्याच जागेवर संस्थेची आजची दुमजली देखणी दगडी इमारत उभी आहे. जुन्या पद्धतीने बांधलेली ही दगडी इमारत हे पंढरपूरचे एक भूषण आहे.
24 ऑक्टोबर 1932 रोजी पंडित मदन मोहन मालवीय यांच्या हस्ते लायब्ररीच्या या नूतन इमारतीचे उद्घाटन झाले. त्यावेळी या लायब्ररीचं ‘नेटिव्ह जनरल लायब्ररी’ हे पूर्वीचे नाव बदलून ‘पंढरपूर नगरवाचन मंदिर’ असं नामकरण करण्यात आलं.
35 हजाराहून जास्त ग्रंथसंपदा
सध्या या संस्थेत ललित, वैचारिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, धार्मिक, बालसाहित्य अशा विविध विषयांवरची ग्रंथसंपदा आहे. त्याची संख्या 35 हजाराच्या आसपास आहे. नगर वाचन मंदिराच्या आवारात पूर्वी वसंत व्याख्यानमाला आयोजित केली जायची. ही व्याख्यानमाला उन्हाळ्यात घेतली जायची. 1937 पासून सलग पाच वर्षे ही व्याख्यानमाला सुरळीत चालली. प्रतिवर्षी पंधरा ते वीस नामवंत व्यक्तींची अभ्यासपूर्ण भाषणे या व्याख्यानमाले अंतर्गत व्हायची. या व्याख्यानमालेत बोलण्यासाठी त्याकाळी श्री म. माटे, महामहोपाद्याय, दत्तो वामन पोद्दार, ना. ग. गोरे, एस एम जोशी, बाळशास्त्री हरिदास, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे मान्यवर आले होते. त्याकाळी ही व्याख्यानमाला आणि ही संस्था महाराष्ट्रात सर्वदूर गाजली होती.
धाडसी विषय आणि वक्ते
व्याख्यानमाले अंतर्गत गाजलेल्या काही व्याख्यानांमध्ये शकुंतलाबाई परांजपे यांनी ‘संतती नियमन’ या विषयावर व्याख्यान दिले. त्याकाळी पंढरपूर सारख्या धार्मिक अधिष्ठान असणाऱ्या ठिकाणी या विषयावर बोलणं खूपच धाडसाचं होतं. पण तरीही नगर वाचन मंदिरातर्फे हा पुढाकार घेण्यात आला. सुप्रसिद्ध नट शाहू मोडक हे धर्माने ख्रिश्चन होते तरी ते श्रीकृष्णाची भूमिका करीत. त्याचंही व्याख्यान आयोजित केलं होतं. या व्याख्यानासाठी त्यांना बंदिस्त गाडीतून आणण्यात आलं होतं. जवळच्या बंदिस्त पुरंदरे थिएटरमध्ये कडक बंदोबस्तात त्यांची तीन व्याख्याने झाली. गावात निवास केल्यास त्यांच्या सुरक्षिततेला धोका होता. म्हणून त्यांची निवास व्यवस्था डॉक्टर बिडारी यांच्या मिशनरी हॉस्पिटलमध्ये करण्यात आली होती. संस्थेच्या आधारस्तंभांपैकी एक, स्वातंत्र्यसैनिक देशभक्त कै. बाबुरावजी जोशी हे चांगले वक्ते म्हणून त्या काळात महाराष्ट्रभर ओळखले जायचे. दुसऱ्या महायुद्धा दरम्यान हिटलरने नॉर्वे जिंकला. त्यामुळे ब्रिटिशांचा मनसुबा धुळीस मिळाला. या विषयावर त्यांनी ‘नॉर्वेची मशीद गळ्यात पडली’ या मथळ्याने केलेल्या एका भाषणामुळे दुसऱ्या महायुद्धकाळात या व्याख्यानमालेवर बंदी आली. युद्ध संपल्यावर 1943 साली ‘नवभारत व्याख्यानमाला’ या नावाने या उपक्रमाचे पुनरुज्जीवन करण्यात आले. यालाच पुढे पुणे विद्यापीठाने ‘बहिष्कार शिक्षण मंडळ’ म्हणून मान्यता दिली होती.
अभिरूप लोकसभा
या व्याख्यानमालेसारखाच अभिरूप लोकसभेचा एक आगळावेगळा कार्यक्रम देखील इथं सादर केला जायचा. महत्वाचे स्थानिक, राज्य, केंद्र व आंतरराष्ट्रीय पातळीवरील विषयांवर या लोकसभेत मांडून त्यावर चर्चा केली जायची. त्यातून लोकांचे प्रबोधन केले जायचे. या अभिरूप लोकसभेच्या उपक्रमाची सुरुवात प्रारंभ 1946 साली झाली. पहिल्याच अभिरूप लोकसभेचे सभापतीपद हे तत्कालीन न्यायाधीश जानोरकर यांना दिले होते. यावेळी ‘दोन बायकांचा कायदा’ हा प्रस्ताव चर्चेसाठी घेण्यात आला होता. त्यावेळी तत्कालीन आमदार बाबुराव जोशी, भगवान शास्त्री धारूरकर, भाऊसाहेब काणे, येडकर वकील आदी वक्त्यांनी या कायद्याच्या प्रस्तावावर झालेल्या चर्चेत भाग घेतला होता.
सुप्रसिद्ध लेखकांकडून ग्रंथालयाचा वापर
या संस्थेत असलेल्या ग्रंथ संग्रहाचा वापर अनेक दिग्गजांनी केला आहे. सुप्रसिद्ध मराठी लेखक द. मा. मिरासदार, पु वि बुवा, राजा मंगळवेढेकर, माजी आमदार पांडूतात्या डिंगरे यांच्या भावविश्वाचा हे ग्रंथालय एक अविभाज्य घटक होते. या सर्वांनी वेळोवेळी या ग्रंथालयाचा अत्यंत कृतज्ञतापूर्ण उल्लेख केलेला आहे. तात्यासाहेब डिंगरे यांनी सांगितलेली एक आठवण याप्रसंगी आठवते आहे. तात्यांना वाचनाचा अत्यंतिक नाद होता. ते नगर वाचन मंदिराला आपले दूसरे घर मानत. एके दिवशी संध्याकाळी या ग्रंथालयाच्या दुसऱ्या मजल्यावर एका कोपऱ्यात तात्यांची वाचन समाधी लागली. कर्मचाऱ्यांना ते वरती वाचत बसले आहेत ते कळले नाही. ग्रंथालयाची वेळ संपल्यावर सर्व कर्मचाऱ्यांनी लायब्ररी बंद केली व ते आपापल्या घरी गेले. सकाळपर्यंत तात्यांना ग्रंथालयात कैद होऊन राहावे लागले. अर्थात त्याबद्दल तात्यांची कसलीच तक्रार नव्हती.
पुराच्या पाण्यात ग्रंथसंपदेचं नुकसान
महाराष्ट्रातील पहिले ग्रंथालय परिषदेचे राज्यव्यापी अधिवेशन याच नगर वाचन मंदिरात भरविले गेले. परिषदेचे उदघाटन प्रख्यात साहित्यिक काकासाहेब कालेलकर यांनी केले तर अधिवेशनाचे अध्यक्षस्थान संतकवी दासगणू महाराज यांनी भूषविले.
1956 साली पंढरपुरात प्रलयंकारी असा पूर आला. संस्थेची इमारत नदीकाठी असल्याने अर्थातच इमारत ग्रंथ संग्रहालय व तेथील सर्व कागदपत्रांचे अपरिमित नुकसान झाले. दुर्दैवाने ऐतिहासिक महत्त्वाचे असे अनेक कागद या पुरात नष्ट झाले. या आपत्तीतून सावरायला संस्थेला बराच अवधी लागला.
नव्या बदलांना सामोरे
आज एकंदरीत वाचन संस्कृती व ग्रंथालय संस्कृती काहीशी अडचणीत आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे खूप मोठे आव्हान आज आपल्यासमोर उभे आहे. हा माध्यम बदल स्वीकारत त्यानुसार ग्रंथालयांच्या स्वरूपात काल सुसंगत बदल घडवण्याचे खूप मोठे आव्हान या संस्थेसमोर आहे. पुरानंतर आलेली ही दुसरी मोठी आपत्ती आहे. या आपत्तीचे संधीत रूपांतर करण्यासाठी विद्यमान नियामक मंडळ प्रयत्नशील आहे. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन ही ज्ञानगंगा अशीच वाहत राहील अशी आशा करूया.
7 Comments
खुप छान माहिती… वाचन संस्कृती वाढायला या लेखाची मदत व्हावी
कै. पां. तु.उत्पात अनेक वर्षे या संस्थेचे चेअरमन होते.संस्था व्यवस्थित चालावी त्यातील कर्मचाऱ्यांचे पगार वेळच्या वेळीं व्हावे म्हणून अनेक उपक्रम राबविले.जसे की,चांगल्या चित्रपटांचे खेळ करमुक्त दराने शालेय विद्यार्थ्यांना दाखवून आलेल्या उत्पन्नातून पगार केले आहेत.
लेख खूपच सुंदर आणि माहितीपूर्ण आहे.सदरची संस्था चालविण्यात अनेकांचे योगदान आहे.
अनेकानेक धन्यवाद ,नगरवाचन मंदिर ..ची दुर्मिळ माहिती सचित्र दिलेबद्दल ….”मंदिर”…..सार्थ नांव व लौकीक…..
छान माहितपूर्ण लेख
लेखनाच्या ओघवत्या शैलीमुळे इतिहासाचा समग्र पट डोळ्यांसमोर उभा राहिला .. बढ़िया
अतिशय उपयुक्त माहिती पूर्ण लेख.
vachanalayache june nav mahiti zale .
khup chhan mahiti 👌