दुधी भोपळ्याचा रस प्यायल्यावर विषबाधा झाली अशी बातमी वाचल्याचं अनेकांना आठवत असेल. दुधी भोपळ्यासारख्या निरुपद्रवी वाटणाऱ्या भाजीमध्ये विषारी घटक असतात का? असले तर ते माणूस आजारी पडेल किंवा मरेल इतके परिणामकारक असतात का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने समोर आले. यासंबंधीची शास्त्रीय माहिती सुसंगत प्रकारे मांडण्याचा हा प्रयत्न.
दुधीमध्ये कडूपणा येतो कुठून?
गावाकडे, विशेषत: कोकणात, घरच्या वेलभाज्या – काकडी, दुधी, शिराळी इत्यादी – वाढत असताना त्याला गुरांनी तोंड लावले, ओरबाडले तर तो वेल कडू होतो, अशी समजूत आहे. त्यात नक्कीच तथ्य आहे. कारण या वेलभाज्यांमध्ये नैसर्गिकरीत्या तयार होणारे कडू द्रव्य – कुकुर्बिटासीन Cucurbitacin असते आणि हे Cucurbitaceae कुळातील या सर्व वेलभाज्यांचे स्वसंरक्षणाचे एक नैसर्गिक साधन आहे. या कुळात काकडी, शिराळी, दोडकी, पडवळ, दुधीभोपळा, लाल भोपळा, कारली, कलिंगड, झुकिनी इत्यादी अनेक वेलभाज्यांचा समावेश होतो. या वनस्पतींना शारीरिक इजा झाली (उदा. प्राण्यांनी चावले, ओरबाडले, खाल्ले) तर त्याला प्रतिकार म्हणून कुकुर्बिटासीन हे द्रव्य या वनस्पतींच्या पानांमध्ये, मुळांमध्ये तयार होते आणि संपूर्ण वनस्पतीमध्ये पसरते. त्या कडू चवीमुळे शाकाहारी प्राणी लांब राहतात आणि वनस्पतींचे स्वसंरक्षण होते. साधारण अशीच प्रक्रिया पाण्याचा ताण पडल्यामुळे किंवा इतर एखाद्या कारणामुळे त्या वेलीची वाढ खुरटली तर त्यामुळे येणाऱ्या ताणामुळेही होऊ शकते. हे झाले संपूर्ण वेल किंवा पाने कडू होण्याविषयी. परंतु या वेलभाज्यांची फळे कडू होण्याचे कारण मात्र अगदी वेगळे आहे.
झेनिया इफेक्ट
हे कारण Cucurbitaceae कुळातील वेलभाज्यांशी संबंधित असलेल्या, बागेच्या आजूबाजूला वाढणाऱ्या इतर रानटी वनस्पतींशी संबंधित आहे. सहज आठवणारे उदाहरण म्हणजे दिवाळीत नरकासुर म्हणून पायाने फोडतात त्या, अत्यंत कडू चव असलेल्या कारीट या फळाची वेल. तीदेखील याच Cucurbitaceae कुळातील आहे. इतरही अनेक वनस्पती आहेत. या प्रकारच्या रानटी वनस्पतींचे परागकण जर मुद्दाम लागवड केलेल्या वेलभाज्यांच्या मादी फुलांवर पडले आणि त्यांचे पर-परागीभवन (Cross pollination) झाले, तर या वेलभाज्यांची फळे (पाने नव्हे) कडू होऊ शकतात. या इतर वनस्पती रानटी असल्यामुळे त्यांचे स्वसंरक्षणाचे नैसर्गिक साधन असलेले कडू द्रव्य Cucurbitacin तयार करण्याची क्षमता टिकून असते. माणसाने मुद्दाम लागवड करून संगोपन केलेल्या वनस्पतींमध्ये ही नैसर्गिक क्षमता नष्टप्राय झालेली असते. परंतु जेव्हा असे पर-परागीभवन होते, तेव्हा रानटी वनस्पतीचा कडू द्रव्य तयार करण्याचा गुणधर्म त्याचा प्रभाव दाखवतो आणि त्यामुळे ते फळ कडू होते. परागकणातील म्हणजेच त्या रानटी वनस्पतींमध्ये असलेल्या पुल्लिंगी जनुकांशी संबंधित असलेली जनुके परागीभवन झालेल्या फळाच्या गुणधर्मांवर तात्पुरता – म्हणजेच केवळ त्या फळात कडूपणा निर्माण करण्याचा प्रभाव टाकतात परंतु त्यांचा तो प्रभाव त्या फळात नंतर तयार होणाऱ्या बियांमध्ये मात्र राहत नाही. म्हणजेच, त्या बियांपासून लागवड केलेल्या वेलींची फळे कडू नसतात.
या विलक्षण प्रकाराला Xenia (झेनिया) किंवा Xenia effect असे म्हणतात. म्हणजेच परागकणातील विशिष्ट जनुकांचे त्या फळाच्या गुणधर्मावर होणारे पण बियांवर न होणारे परिणाम. याची अनेक उदाहरणे आहेत. त्यापैकी वेलभाज्यांची फळे कडू होणे हे एक उदाहरण आहे. त्या व्यतिरिक्त आणखी काही उदाहरणे – मक्यामध्ये एकाच कणसात विविध रंगांचे दाणे निर्माण होणे हेदेखील याच झेनिया इफेक्टमुळे होते. परंतु तिथे कडू चवीचा काहीच संबंध नसतो. ज्वारीमध्ये दाण्यांमधील स्टार्चचे प्रमाण झेनियामुळे कमी-जास्त होऊ शकते. झेनियाची प्रक्रिया होत असणाऱ्या वनस्पतींची इतर उदाहरणे म्हणजे टोमॅटो, ब्लूबेरी अशी अनेक सांगता येतील. आता तर जैवतंत्रज्ञान शाखेमध्ये झेनिया या गुणधर्माचा वापर, आपल्याला हवे ते जनुक एखाद्या पिकाच्या जनुकांमध्ये टाकण्यासाठी उपयुक्त पद्धत म्हणूनदेखील केला जातो!
कुकुर्बिटासीनचा कडूपणा
कुकुर्बिटासीन खरंच विषारी म्हणावे इतके त्रासदायक असते का? तर हो, कारण जर ते चुकून खाल्ले गेले तर त्याचे अनेक दुष्परिणाम दिसून येतात. यात अगदी साध्या म्हणजे गरगरणे, अपचन या लक्षणांपासून मळमळ, वांत्या होणे, केस गळणे इत्यादींचा समावेश होतो. पण जे जे काही कडू लागते ते ते म्हणजे विषारी असे म्हणायचे का? तर तसं नाही म्हणता येणार. कारले कडू असते पण विषारी नसते. पण मग दुधी कडू असेल तर काय करायचे?
कुकुर्बिटासीनची चव कडू लागते आणि काही लोकांना त्याची ॲलर्जी असू शकते. तसेच प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीनुसार तिच्या शरीरावर होणारे कुकुर्बिटासीनचे परिणाम वेगवेगळे असू शकतात. म्हणजेच, काही लोकांना सौम्य तर काहींवर तीव्र परिणाम होऊ शकतात. त्यामुळे एकच नियम सर्वांना लागू करता येत नाही. तसेच, कुकुर्बिटासीनमध्येही वेगवेगळे प्रकार असतात आणि त्यांचा विषारी प्रभाव कमी – जास्त आणि वेगवेगळ्या प्रकारचा असतो. पण यामध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे, कुकुर्बिटासीन चुकून खाल्लं गेलं तर त्यावर निश्चित असा काही औषध उपचार किंवा antidote (उतारा) उपलब्ध नाही.
काय काळजी घ्यायची?
शक्यतो दुधी खाण्याअगोदर त्याची किंचित चव तपासून घ्यावी. जर दुधी कडू असेल तर तो वापरू नये. ज्यांना त्याची जास्त ॲलर्जी असेल त्यांनी तो दुधी खाणं शक्यतो टाळावं. जर का चुकून कधी असा कडू दुधी खाल्ला गेला तर घाबरून जायची गरज नाही. कारण यामध्ये cucurbitacin चा विषारीपणा हा त्याचे किती प्रमाणात सेवन केले याच्यावर अवलंबून असतो. म्हणजेच जितकी कमी मात्रा तितका विषारीपणा कमी. कडवट चव आहे का हे फक्त खात्री करून बघण्यासाठी जेवढी मात्रा शरीरात जाईल, ती नक्कीच विषारी ठरत नाही. पण कडू लागत असूनही बळेच खात गेलो किंवा रस पीत गेलो, तर मात्र विषारी परिणाम होऊ शकतात.
हे टाळता येईल का?
आता यापुढे असाही प्रश्न पडतो की हे सगळे मुळातच टाळता नाही का येणार? तर त्याचं उत्तर सकारात्मक आहे. होय हे सगळं टाळता येईल. पण त्यासाठी वेलवर्गीय भाज्यांची लागवड करतानाच तशी काळजी घ्यावी लागेल. ज्या परिसरात वेलवर्गीय रानटी वनस्पती असतील तिकडे या वेलभाज्यांची लागवड करु नये. पण हे असं करणं सहजशक्य नाही.
एक मूलभूत प्रश्न
एक मूलभूत प्रश्न असाही उभा राहतो की ज्या वनस्पती माणसाला थेटपणे उपयुक्त नाहीत, त्यांना जगण्याचाही अधिकार नाही का? स्वसंरक्षण म्हणून कडू पदार्थ बनवण्याचा अधिकार नाही का? शिवाय जैव-विविधतेचे काय?
जैव-विविधता किंवा एकाच कुळातील अथवा प्रजातीमधील विविध प्रकारचे सजीव एकाच वेळी, एकाच ठिकाणी अस्तित्वात असणे ही खरंतर निसर्गाने निर्माण केलेली अति-उत्तम संपत्ती आहे. हे सर्व सजीव एकमेकांना पूरक असल्यामुळे, त्या विविधतेमुळे सर्वच सजीव दीर्घकाळ टिकून राहायला मदत होते. त्या दृष्टीने पाहिले तर माणसाने शेती करताना खरंतर फक्त स्वत:ला उपयुक्त असलेल्या वनस्पतींचचं संगोपन केलं आहे. उपयुक्त नसलेल्या वनस्पती नामशेष करत अशा वनस्पतींवर प्रचंड अन्याय केला आहे, नाही का?
कुकुर्बिटासीनचे औषधी गुणधर्म
असं असलं तरी त्याच माणसाने “नास्ति मूलम् अनौषधम्” म्हणत त्याच कडू विषारी कुकुर्बिटासीनचे अनेकविध औषधी उपयोगदेखील शोधून काढले आहेत. होय, आश्चर्य वाटेल पण त्यात कर्करोग-रोधक, यकृत-रक्षक, मधुमेह-रोधक, जळजळ-रोधक असे अनेक गुणधर्म आणि औषधी उपयोग आहेत. अर्थात याचा अर्थ असा अजिबात नाही की, या रोगांवर घरगुती उपाय म्हणून कडू दुधीचा रस प्यावा. नाही, तसे तर अजिबात करू नका. नाहीतर आपल्याला म्हणावे लागेल, “दुधी नको, पण कडूपणा आवर!”
विशेष सूचना:
दुधी भोपळा किंवा तत्सम भाज्या विषारी ठरण्यामागे अनेक शक्यता आहेत. त्यापैकी पाहिली नैसर्गिक कारणांमुळे, दुसरी पिकावर काहीतरी विषारी रासायनिक कीटकनाशक वापरले असल्यामुळे आणि तिसरी सालमोनेला (Salmonella) सारख्या जिवाणूंची वाढ होऊन त्यातून अन्न विषबाधा (Food poisoning) होणे. यांपैकी फक्त पहिल्या शक्यतेचा उहापोह या लेखात केला आहे. लेखातील विधाने विविध स्रोतांमधून शास्त्रीय माहिती मिळवून त्या आधारे केलेली आहेत. परंतु त्या विधानांना वैद्यकीय सल्ला मानू नये.
5 Comments
उत्तम लेख. सर्वसमावेशक माहिती आणि वैज्ञानिक लेखनात लालित्य!
मस्त , आवडला लेख
कडू भोपळ्याचा रस पिऊन आदेश बांदेकर सिरियस झाले होते. त्यामुळे भोपळा खाताना चव घेऊनच खायचा की नाही, ते ठरवले जाते. या लेखामुळे कडूपणाची शास्त्रीय करणे कळली.
उत्तम लेख
वाचनीय शैली.
XCELLENT & deep studies about MILK and vegetables.