हजारो वारकरी वेगवेगळ्या यात्रेच्या निमित्ताने पंढरपुरात एकत्र येत असतात. हे जे सामाजिक अभिसरण आपल्याला पाहायला मिळते याचा प्रत्यय पंढरपूरच्या खाद्यसंस्कृतीत काल्याच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतो. कुठल्याही मोठ्या वारीची सांगता ही गोपाळकाल्याने होते. “गोपाळकाला गोड झाला, गोपाळांनी गोड केला” असे म्हणत यात्रेला आलेले वारकरी एकत्र येतात. यात्रेच्या सांगतेचा महाप्रसाद म्हणून हा काला केला जातो.
ज्वारीचा काला
या भागात ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यामुळे ज्वारीचा उपयोग वेगवेगळ्या स्वरूपात केला जातो. मग भाकरी असो वा लाह्या. लाह्या दह्यात भिजवतात त्यात हिरव्या मिरचीचा ठेचा, साखर, कोथिंबीर, डाळींबाचे दाणे, पेरूच्या फोडी, सफरचंद, हिंग, मीठ इत्यादी गोष्टी घालून त्याचा काला केला जातो. हा काला प्रसाद स्वरुपात एकमेकांना वाटला जातो.
पंढरपूरचा पांडुरंग म्हणजे श्रीविष्णूचे कृष्ण स्वरूप व त्याच्या सोबत वस्तीसाठी गोळा होणारे वारकरी म्हणजे त्याचे गोपजन. श्रीकृष्णाला ही हा अशाच पद्धतीचा काला आवडत असे. या इतिहासाचे वर्तमानात पडणारे पडसाद म्हणजे हा काला होय. “जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता” ही कृतार्थतेची भावना या काल्यात मिसळलेली असते.
पंढरपूरातील खाद्यसंस्कृती
पंढरपूरमध्ये गवळी समाज खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यांची स्वतःची अशी खाद्य संस्कृती व खाद्य परंपरा आहे. चलची – गुळवणी, खिचडा, आंबील भात हे त्यांचे हटके पदार्थ.
सर्वसाधारणपणे गवळी समाज म्हणजे गोपालक समाज. यांचे सर्व कार्यक्रम हे यांच्या गोपालक म्हणून असलेल्या कर्तव्यांचा निर्वाह केल्यानंतरच होतात. म्हणजे दिवसभर गाई चारणे, त्यांना पाणी पाजून घरी आणणं त्यांच्या धारा वगैरे काढणं यासगळ्या दिनचर्यनंतर संध्याकाळच्या वेळेत हे सर्व गोपालक निवांत असतात. स्वतःच्या मालकीच्या काही म्हशी असलेले अनेक गवळी पंढरपुरात आहेत. त्यामुळे दूध दुभत्याची ही रेलचेल आहे. म्हणून अनेक पदार्थामध्ये दुधाचा वापर केला जातो. आत्यंतिक गोडाला उतारा म्हणून ‘मठ्ठा’ येथे आवर्जून केला जातो. अशारितीने गोपालक हे कृष्णभक्त म्हणून क्षेत्राच्या इतिहासाशी एका वेगळ्या प्रकारे जोडले जातात.
ताकपिठ्या विठोबा
पंढरपुरात एकंदरीत चार मोठ्या यात्रा होतात आषाढी, कार्तिकी, माघी व चैत्री. या चारही यात्रेच्या वेळी लक्षावधी लोक पंढरपुरात येतात. एकादशी हा या यात्रांमधला महत्त्वाचा दिवस असतो. एका दिवसात श्री विठ्ठल सगळ्याचं भाविकांना दर्शन देऊ शकणार नाहीत. यासाठी दर्शनाचे श्रेय व पूण्य मिळवण्याच्या इतर व्यवस्था ही निर्माण केल्या आहेत. जसं की, चंद्रभागा स्नान, कळसाचे दर्शन, नगरप्रदक्षिणा आणि ताकपिठ्या विठोबाचे दर्शन.
विठ्ठलाच्या मुख्य देवळाजवळ एक ताकपिठ्या विठोबाचे मंदिर आहे. ज्या लोकांना मुख्य देवालयात दर्शन मिळत नाही ते भाविक ताकपिठ्या विठोबाचे दर्शन घेतात.
ताकपिठ्या विठोबा नावामागची आख्यायिका
विठोबाचे ताकपिठ्या हे नाव कुठून आलं? हा साधासोपा प्रश्न आपल्याला पडला असेल. कारण ताक आणि पिठी हे सरळ सरळ खाद्यसंस्कृतीशी निगडीत असे शब्द आहेत. तर जोंधळाच्या लाह्या पंढरपूरकडे लोकप्रिय आहेत. यांचं पीठ उत्तम होतं. अशी आख्यायिका आहे की राधाबाई नावाच्या पैठण निवासी पांडुरंगाच्या भक्त पांडुरंगाच्या प्रेमापोटी पंढरपूरला येऊन राहिल्या होत्या. त्या रोज देवाला जोंधळ्याची पिठी ताकात घोळवून नैवेद्य म्हणून दाखवत असत आणि हा प्रसाद विठोबाला फार आवडत असे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे राधाबाई काही काळ देवळात जाऊ शकल्या नाहीत. पण पांडुरंगाला ताक आणि पीठ खायची सवय लागलेली. त्याला काही करमेना. तो बालरूप घेऊन राधाबाई यांच्याकडे आला आणि राधाबाईनीही प्रेमाने त्याला पीठ ताकात कालवून दिले. बरेच दिवस हा दिनक्रम चालू राहिला. कालांतराने राधाबाईंची तब्येत बरी झाली. पांडुरंग म्हणू लागले मला आता देवळात परत जाऊ दे. हे ऐकल्यावर राधाबाई म्हणाल्या ‘मला आता तुझ्याकडे रोज येणं होईल, असं वाटत नाही. त्यामुळे तू आपला इथेच थांब मी तुला रोज ताक-पीठ देईन.’ विठोबाला काही या ताकपीठाचा आणि राधाबाईच्या प्रेमाचा लोभ सुटेना. त्यामुळे तो अजूनही येथेच नांदतो आहे अशी ही श्रद्धा आहे.
लाह्यांचे पीठ व ताक हे एकत्र कालवून त्यात मीठ, कोथिंबीर ,जिरे पावडर हे मिसळून खाल्ल्यास पौष्टिक व रुचकर आणि करायला सोपे. थोड्याशा सामुग्रीत आणि कमी पैशात इतका पौष्टिक आहार कुठे मिळणार?
तात्पर्य देवाला भावला तो राधाबाईंचा भाव आणि या अशा भावनांचाच देव भुकेला असतो. नाही का ?
आता पुढच्या वेळेला पंढरपूरला याल त्यावेळी इथल्या गर्दीला पाहून बिचकु नका. पांडुरंगाचे पदस्पर्श दर्शन झाले नाही तर चंद्रभागा स्नान, कळसाचे दर्शन, नगर प्रदक्षिणा किंवा ताकपिठ्या विठोबाचे दर्शन घ्यायचे. यातला एक किंवा हे सगळेच पर्याय निवडायचे आणि मोकळे व्हायचे.
6 Comments
छानच
सुरस लेख
माहितीपुर्ण लेख
खूप छान माहिती
Very nice & informetive
छान माहिती