उत्तरप्रदेशमधील प्रयागराज येथे महाकुंभमेळा या आध्यात्मिक उत्सवाला सुरुवात होत आहे. पौष पौर्णिमा म्हणजे येत्या 13 जानेवारीपासून या महाकुंभमेळाव्याला सुरुवात होणार आहे. जवळपास 400 दशलक्ष भाविक या महाकुंभमेळाव्यासाठी उपस्थित राहणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. या महाकुंभ मेळाव्यात भाविकांच्या सुरक्षेसाठी उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने आवश्यक त्या यंत्रसामुग्रीसाठी महाराष्ट्रातील आयटीयूएस मरीन कंपनीशी करार केला आहे.
आयटीयूएस पुरवणार एम्पिबियस आणि रॉकेट बोटी
प्रयागराज महाकुंभमेळाव्यामध्ये आयटीयूएस मरीन कंपनीकडून 1 एम्पिबियस बोट तैनात करण्यात येणार आहे. ही एम्पिबियस बोट 36 फूटाची असून ती जमिनीवर आणि पाण्यात अशी दोन्ही ठिकाणीही चालते. या बोटींचा वापर हा महाकुंभमेळाव्यामध्ये व्हीआयपी पाहुण्यासाठी केला जाणार आहे. या बोटी प्रयागराजमध्ये दाखल झाल्या असून त्याचं प्रशिक्षण सुरू आहे.
एम्पिबियस बोटीसोबत सुरक्षेसाठी आणि टेहळणीसाठी चार रॉकेट बोटी प्रयागराजमध्ये पाठवल्या आहेत. या सोहळ्यादरम्यान गंगा नदीच्या काठावर आयोजित कार्यक्रमावेळी गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी, सर्व हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी साधारण 10 ते 25 रेस्क्यू बोटी आणि बचावपथक सुध्दा पाठवण्यात येणार असल्याची माहिती आयटीयूएस मरीनचे सीईओ अमित वाघ यांनी ‘श्रेष्ठ महाराष्ट्र’ला दिली.
महाकुंभमेळाव्यात सेवा करण्याची सर्वोत्तम संधी
प्रयागराज येथील महाकुंभमेळाव्यात महत्त्वाची जबाबदारी मिळाल्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो. आय टी यू एस मरीनमध्ये आम्ही जागतिक दर्जाच्या बचाव व समुद्री सामुग्री उपलब्ध करुन देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतो. कुंभमेळा 2025 दरम्यान उत्तर प्रदेश एटीएससोबत काम करणं ही आमच्या कौशल्याची परिक्षा आहे, अशी प्रतिक्रिया आयटीयूएस मरीन कंपनीच्या प्रवक्तांनी माध्यमांना दिली आहे.
आयटीयूएस मरीन कंपनी
आयटीयूएस मरीन ही महाराष्ट्रातली समुद्री सुरक्षा आणि उपाययोजना पुरवठादार कंपनी आहे. या कंपनीच्या माध्यमातून विविध बचावकार्यासाठी साहाय्य केलं जातं.
एम्पिबियस बोटी आणि आपत्ती व्यवस्थापन यामध्ये ही कंपनी अग्रेसर आहे. देशभरातील महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये यशस्वी योगदान देण्याचा अनुभव असलेल्या कंपनीची ओळख नाविन्यपूर्ण दृष्टिकोन, कौशल्यपूर्ण कर्मचारी आणि मजबूत उपकरणे यासाठी ओळखली जाते.