14 वी विधानसभा येत्या नोव्हेंबर महिन्यात विसर्जित होत आहे. आपल्याला माहीत आहेच की, विधानसभेची पावसाळी, हिवाळी, उन्हाळी आणि अर्थ ही मुख्य अधिवेशनं होतात. या अधिवेशनांमध्ये आपल्या आमदारानं नेमकं काय काम केलं? हे आपल्या सर्वांनाच जाणून घ्यायचं असतं. या निवडणुकीत तुमचं मत देताना तुमच्या आमदाराची सभागृहातील कामगिरीही तपासा.यासाठीच ‘संपर्क’ने केलेल्या या अभ्यासाची आम्ही विशेष मालिका घेऊन आलो आहोत ‘श्रेष्ठ विधानसभा’.
सर्वाधिक प्रश्न मुंबादेवीचे अमीन पटेल यांचे
सन 2019 ते 2024 या पंचवार्षिक काळात विधिमंडळाची एकूण 12 अधिवेशनं पार पडली. गेल्या विधानसभेच्या तुलनेत कोविडचा परिणाम म्हणून या विधानसभेत आरोग्यविषयक प्रश्नांमध्ये वाढ झाली आहे. यासह महिलांविषयक प्रश्नांत दुपटीने वाढ, तर बालकांवरील प्रश्नांत निम्म्याहून अधिक घट झाली आहे. अल्पसंख्य समाजाविषयी मात्र केवळ नऊ प्रश्न गेल्या पाच वर्षात विचारण्यात आले आहेत. या अधिवेशनांत राज्यातील आमदारांनी 5,921 प्रश्न सभागृहात मांडले. मुंबादेवी येथील काँग्रेस आमदार अमीन पटेल यांनी सर्वाधिक 656 प्रश्न मांडत अव्वल स्थान पटकावले.
कोविडमुळं 3 अधिवेशनं रद्द
2019 ते 2024 या काळात विधीमंडळाच्या 12 अधिवेशनांमध्ये 131 दिवस कामकाज झाले. या दरम्यान उपस्थित केल्या गेलेल्या तारांकित प्रश्न व लक्षवेधी सूचनांचे विश्लेषण आम्ही केलं. 14 व्या विधानसभेत कोविडमुळे तीन अधिवेशनं रद्द केली गेली. 2024 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशात प्रश्नोतरांचा तास रहित केला गेला. यामुळे या विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्याची संधी मागील विधानसभेच्या तुलनेत आमदारांना कमी मिळाली.
अर्ध्या लोकसंख्येकडं दुर्लक्ष
विधानसभा म्हणजे राज्याची सर्वोच्च धोरणकर्ती संस्था आणि कायदेमंडळ. पण इथं अर्धी लोकसंख्या म्हणजेच महिलांशी संबंधित एकूण 119 म्हणजेच 2.01 % इतकेच प्रश्न विचारले गेले. विधानसभेत मांडल्या जाणार्या बालकांच्या प्रश्नांचा अभ्यास ‘संपर्क’ 2015 पासून करत आहे. हे प्रमाण नेहमीच दोन ते तीन टक्के राहिले आहे. 14 व्या विधानसभेत तर ते आणखीन घटून 2.18 टक्क्यांवर आले. शालेय शिक्षणविषयक प्रश्न एकूण 256, म्हणजेच सव्वाचार टक्के आहेत.
मावळत्या विधानसभेत हाताच्या बोटावर मोजता येतील इतके कमी म्हणजे, 9 प्रश्न अल्पसंख्याकांच्या समस्यांविषयी आहेत. हे प्रमाण एकूण प्रश्नसंख्येच्या केवळ 0.15% आहे. विधानसभेत आज फक्त 10 मुस्लिम सदस्य आहेत.
मानव विकास निर्देशांक
आरोग्यावर एकूण 451, म्हणजे सुमारे साडेसात टक्के प्रश्न मांडले गेले. आरोग्यसुविधांविषयी अधिक प्रश्न सर्वच जिल्ह्यांतून विचारले गेले आहेत. अल्प मानव विकास निर्देशांक – नांदेड आणि अतिउच्च मानव विकास निर्देशांक – मुंबई, हे दोन्ही प्रत्येकी दहा मतदारसंघांचे जिल्हे. नांदेडची प्रश्नसंख्या 8.64% आणि मुंबईची त्याहून कितीतरी अधिक सुमारे 22% आहे.
सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या आमदारांचा भर कोणत्या विषयावर?
वांद्रे पश्चिमचे आमदार आशिष शेलार यांनी बालक व आरोग्य विषयासंदर्भातील सर्वाधिक प्रश्न (अनुक्रमे 28 आणि 82) मांडले. आमदार अमीन पटेल यांनी महिला, शिक्षणविषयक सर्वाधिक प्रश्न (अनुक्रमे 21 आणि 45) मांडले तर डहाणूचे आमदार विनोद निकोले यांनी आदिवासीविषयक सर्वाधिक 21 प्रश्न उपस्थित केले.
विधीमंडळ समित्या नेमल्याच नाहीत
14 व्या विधानसभेत संपूर्ण पाच वर्षांच्या काळात विधिमंडळ समित्यांचं कामच झालं नाही. मविआ सरकारने नेमलेल्या समित्या कोविडमध्ये काम करू शकल्या नाहीत. सत्ताबदल झाल्यावर या समित्या रद्द केल्या गेल्या व नव्या नेमल्याच गेल्या नाहीत.
खासगी विधेयकावरही चर्चा नाही
महिला आमदारांच्या कामगिरीचा विचार करता 26 आमदारांपैकी दहिसरच्या आमदार मनिषा चौधरी यांनी सर्वाधिक म्हणजे 459 प्रश्न उपस्थित केले. 14 व्या विधानसभेत पहिल्यांदाच आमदार बनलेल्या 92 आमदारांमध्ये सर्वाधिक 316 प्रश्न हे वरोऱ्याच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी विचारले. विधेयकं मंजूर करणं हे विधानसभेचं मुख्य काम. परंतु या 14 व्या विधानसभेत एकाही खासगी विधेयकावर चर्चा झाली नाही.
राज्यात आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. जनतेने मताधिकार बजावताना आमदारांच्या सभागृहातील कामगिरीचाही विचार करावा व जनतेच्या प्रश्नांचे अधिकाधिक प्रतिंबिंब सभागृहात उमटावे, या हेतूने संपर्कने हा अहवाल प्रकाशित केला आहे.
या सात आमदारांची कामगिरी सरस –
- अमीन अमीरअली पटेल 656 (सर्वाधिक प्रश्न. शिक्षण आणि महिलाविषयक सर्वाधिक प्रश्न)
- आशिष बाबाजी शेलार 630 (सर्वाधिक द्वितीय. बालक आणि आरोग्यविषयक सर्वाधिक प्रश्न)
- अस्लम शेख 532 (सर्वाधिक तृतीय)
- मनिषा चौधरी 459 (महिला आमदारांत सर्वाधिक प्रश्न)
- कुणाल पाटील 357 (कमी माविनि असलेल्या जिल्ह्यातून सर्वाधिक प्रश्न)
- प्रतिभा धानोरकर 316 (पहिल्यांदा निवडून आलेल्या आमदारांतून सर्वाधिक प्रश्न)
- विनोद निकोले 237 (आदिवासींबाबत सर्वाधिक 21 प्रश्न)
संपर्क
‘संपर्क’ ही संस्था सभागृहात, विधानसभेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा अभ्यास करते. सर्वपक्षीय आमदारांसोबत संवाद साधते आणि त्यांना माहिती पुरवते. आमदारांनी त्यांच्या मतदारसंघात माता–बालकेंद्री कामं करावीत यासाठी सहकार्यही करते.