मंगळागौर ही मराठी संस्कृतीची शान आहे. महाराष्ट्रातील नववधू आणि स्त्रियांच्या आनंदाचा, उत्साहाचा आणि एकतेच्या उत्सवाचं प्रतिबिंब हे मंगळागौर कार्यक्रमातून पाहायला मिळतो. सर्व महिला एकत्र येत पारंपारिक, मंगळागौरसाठी विशेषरित्या तालबद्ध केलेल्या गीतं आणि तबल्याच्या वादनावर खेळ सादर करतात. महाराष्ट्राची ही परंपरा जपण्यासाठी ‘श्रेष्ठ महाराष्ट्र’ने सलग दुसऱ्या वर्षी ‘श्रेष्ठ महाराष्ट्राची मंगळागौर 2025’ स्पर्धेचं आयोजन केलं होतं.
शिवकन्या मंगळागौर ग्रुपने मारली बाजी
रविवार, 13 जुलै 2025 रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक इथे ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत मुंबईतल्या एकूण 13 संघांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी शिवकन्या मंगळागौर ग्रुप, चिंचपोकळी इथल्या संघाने या स्पर्धेत बाजी मारली. स्पर्धेत एकूण पाच विजेते संघ निवडण्यात आले. दुसरा क्रमांक नवरंग मंगळागौरी ग्रुप, कांदिवली, तीसरा क्रमांक हा नवदुर्गा मंगळागौर, दिवा – ठाणे, चौथा क्रमांक सखी मंगळागौर ग्रुप पनवेल आणि पाचव्या क्रमांकाचे मानकरी शिवाज्ञा मंगळागौर ग्रुप, नालासोपारा हा संघ ठरला.
विजेत्या संघासह इतरही पारितोषिक दिली गेली. बेस्ट डान्सचा मान नवदुर्गा मंगळागौर, दिवा ठाणे या ग्रुपला मिळाला. बेस्ट गायिका आणि बेस्ट ढोलकी वादक हे दोन्ही पुरस्कार नवरंग मंगळागौरी ग्रुप, कांदिवलीने जिंकले. सीनियर मेंबरचा पुरस्कार स्वरा मंगळागौर समूह, नालासोपाराला मिळाला. तर ‘श्रेष्ठ महाराष्ट्राची क्वीन’ हा मान शिवकन्या मंगळागौर ग्रुप, चिंचपोकळीने पटकावला.
मंगळागौर शारीरिक कस लावणारे खेळ
मंगळागौर म्हटलं की, नऊवारी साडीमध्ये सगळा साज श्रृंगार करुन विविध खेळ करणाऱ्या महिला नजरेसमोर येतात. या खेळामध्ये फुगडी, झिम्मा, टिपऱ्या, गोफ, साळुंकी, वटवाघूळ फुगडी, बस फुगडी, तवा फुगडी, फिंगरी फुगडी, वाकडी फुगडी, आगोटापागोटा, गाठोडे, लाटा बाई लाटा, घोडा हाट, करवंटी झिम्मा, सासू-सून भांडण, अडवळ घुम पडवळ घुम, सवतीचे भांडण, दिंड, घोडा असे वेगवेगळे खेळाचं सादरीकरण केलं जातं. मंगळागौरचे साधारण 110 विशेष खेळ आहेत. या खेळांसाठी विविध गाणी सुद्धा रचलेली आहेत. या गाण्याच्या बोलातून सर्व महिला एकमेकींना सुखदुःख सांगतात, चिडवाचिडवी करतात, मजामस्ती करतात. अलीकडे या गीतांमधून विविध सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो.
आता सगळीकडे फ्यूजनचा ट्रेंड आहे. त्यामुळे श्रेष्ठ महाराष्ट्राने बॉलिवुड ही थीम ठेवली होती. यामध्ये बॉलिवुड सिनेमातील गाण्यांवर किंवा तालावर हे खेळ सादर करायचे होते. सर्व सहभागी संघांनी अतिशय कल्पकतेने खेळाचं सादरीकरण केलं.
आव्हान पालक संघाचं विशेष सादरीकरण
कार्यक्रमातील एक विशेष आकर्षण म्हणजे ‘आव्हान पालक संघा’च्या विशेष मुलांनी सादर केलेली मंगळागौर. या संघामध्ये विविध वयोगटातील विशेष मुलांनी सर्वोत्तम सादरीकरण केलं. त्यांच्या सादरीकरणाने सभागृहात आगळं-वेगळं वातावरण निर्मिती झाली.
विठ्ठल नृत्याने कार्यक्रमाची सुरुवात
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून झाली. त्यानंतर अशिमिक कामठे यांच्या ग्रुपने सादर केलेल्या विठ्ठल नृत्याने संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक ‘वारणा सहकारी संघ’ होते. वारणा सहकारी संघाचे जनरल मॅनेजर ( मार्केटिंग )अशोक कुमार सिंग यांनीही कार्यक्रमाला उपस्थिती लावली. तसेच, सहयोगी प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप सोसायटीच्या प्रभादेवी शाखेच्या ब्रँच मॅनेजर सौ. माधुरी तिनी यांचीही विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे स्पेशल पार्टनर ‘प्रथम एन्वायरोटेक सोल्युशन्स’च्या हेमा येमूल, फूड पार्टनर ‘कुबल मसाले’च्या संचालक शीतल कुबल, ज्वेलरी पार्टनर ‘कालिष्का’च्या प्रियंका घारे उपस्थित होत्या.
या स्पर्धेच्या परीक्षकांची जबाबदारी प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक आशिष पाटील, पार्श्वगायिका सावनी रवींद्र, कालिष्का आभुषणच्या प्रियंका घारे आणि त्वचा-केस विशेषज्ञ डॉ. शिल्पा देव यांनी सांभाळली.
त्याचबरोबर समाजसेविका पल्लवी सरमळकर, लावणी नृत्यांगना आकांक्षा कदम, बालगंधर्व पुरस्कार विजेते आणि लावणी सम्राट अशिमिक कामठे यांनी विशेष उपस्थिती दर्शवली होती.
या कार्यक्रमाचं संचलन विनित देव आणि सिद्धी ढोके यांनी केलं.