जागतिक वारसा समितीच्या 47 व्या बैठकीत ‘भारताचे मराठा साम्राज्यातील लष्करी बांधणीचे गडकिल्ले’ या विषयांतर्गत युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत. महाराष्ट्रातील 11 किल्ले आणि तामिळनाडू मधील 1 किल्ला असे एकूण 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. किल्ले साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि तामिळनाडूतील जिंजी हे आता जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाणार आहेत. मराठा लष्कराची मुहूर्तमेढ 17 व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकाळात रोवली गेली. त्यानंतर 1818 पर्यंत पेशव्यांच्या काळापर्यंत ही घोडदौड कायम राहिली. ही मान्यता मिळवणारी भारताची ही 44 वी स्थळे बनली आहेत. यामुळं मराठा साम्राज्याच्या इतिहास, मराठा किल्ल्यांचे स्थापत्यशास्त्र, भारतीय प्रादेशिक अस्मिता आणि ऐतिहासिक ठेवा यांची जागतिक स्तरावर दखल घेतली आहे.
गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या या कामात अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघानेही खारीचा वाटा उचलला आहे. या बाराही किल्ल्यांचे To The Scale Models महासंघाच्या गिर्यारोहक स्वयंसेवकांनी अत्यंत विक्रमी वेळेत पूर्ण करून दिल्ली येथे पार पडलेल्या युनेस्कोच्या प्रतिनिधींनी भेट दिलेल्या प्रदर्शनात आकर्षणाचे केंद्र बनले होते.

केवळ याच 11 किल्ल्यांची निवड का?
महाराष्ट्रात 390 हून अधिक किल्ले आहेत. त्यापैकी फक्त 11 किल्ले मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडियासाठी निवडण्यात आले आहेत. 17व्या आणि 19व्या शतकात विकसित झालेली “भारतातील मराठा लष्करी भूदृश्ये”, त्या काळातील मराठा शासकांच्या कल्पनेतून साकारलेली अभेद्य तटबंदी आणि मराठा सैन्याच्या असामान्य लष्करी व्यवस्थेचा भक्कम पुरावा आहेत. किल्ल्यांचे हे एकमेवाद्वितीय जाळे, त्यांच्या महत्वानुसार ठरवलेला त्यांचा क्रम, व्याप्ती आणि प्रतीकात्मक वैशिष्ट्यांमध्ये असलेले वैविध्य, सह्याद्रीच्या पर्वत रांगा, मनमोहक कोकण किनारा, दख्खनचे पठार आणि भारतीय द्वीपकल्पातील पूर्व घाट यांच्यातील वैशिष्ट्यपूर्ण भूदृश्य, भूप्रदेश आणि भौतिक वैशिष्ट्ये यांचा अनोखा मिलाफ आहे.
डोंगरी आणि जल किल्ले
यापैकी आठ भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाद्वारे संरक्षित आहेत. यामध्ये शिवनेरी किल्ला, लोहगड, रायगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा किल्ला, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि जिंजीचा किल्ला यांचा समावेश आहे. तर उर्वरित साल्हेर किल्ला, खांदेरी किल्ला, राजगड, प्रतापगड हे आधीपासूनच महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयानं संरक्षित केले आहेत. भारतातील मराठा लष्करी भूदृश्यांमधील साल्हेर किल्ला, शिवनेरी किल्ला, लोहगड, रायगड, राजगड आणि जिंजीचा किल्ला हे डोंगरी किल्ले आहेत, प्रतापगड हा डोंगराळ आणि वन प्रदेशातील किल्ला आहे, पन्हाळा हा डोंगरी आणि पठारी किल्ला आहे, विजयदुर्ग हा किनारी भागातील किल्ला असून खांदेरी किल्ला आणि सुवर्णदुर्ग किल्ला हे बेटांवर बांधलेले किल्ले आहेत.

युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळ यादी प्रक्रिया
जानेवारी 2024 मध्ये जागतिक वारसा समितीकडे हा प्रस्ताव विचारार्थ पाठवण्यात आला होता आणि सल्लागार संस्थांसोबत अनेक तांत्रिक बैठका आणि स्थळांचा आढावा घेण्यासाठी आयकोमॉसच्या मोहिमेने दिलेल्या भेटी नंतर अठरा महिन्यांच्या कठोर प्रक्रियेनंतर, जागतिक वारसा समितीच्या सदस्यांनी आज संध्याकाळी पॅरिस येथील युनेस्को मुख्यालयात हा ऐतिहासिक निर्णय घेतला. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचे नामांकन सांस्कृतिक आणि नैसर्गिक अशा दोन श्रेणीमध्ये होत असते. महाराष्ट्रातील किल्ल्यांचा समावेश सांस्कृतिक श्रेणीत करण्यात आला आहे. जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठी सांस्कृतिक स्थळांसाठी सहा निकष (i ते vi) आणि नैसर्गिक स्थळांसाठी चार निकष (vii ते x) आहेत. भारतातील मराठा लष्करी भूदृश्यांचे नामांकन श्रेणी (iii) अंतर्गत आहे : वारसा स्थळामधून सांस्कृतिक परंपरेची किंवा जिवंत किंवा लुप्त झालेल्या सभ्यतेबद्दल अद्वितीय किंवा किमान अपवादात्मक साक्ष मिळणे , हा निकष येथे लागू होतो त्याचप्रमाणे निकष (iv): वास्तूच्या स्थापत्याचे उत्कृष्ट उदाहरण, वास्तुशिल्प किंवा तांत्रिक रचना किंवा लँडस्केप जे मानवी इतिहासातील महत्त्वपूर्ण टप्पे आणि काळ मूर्तिमंत स्वरूपात दर्शवते आणि निकष (vi): ज्यामध्ये एखादी घटना किंवा जिवंत परंपरा, कल्पना किंवा विश्वास, तसेच वैश्विक महत्त्व असलेल्या उत्कृष्ट कलात्मक आणि साहित्यिक कृतींशी थेट किंवा मूर्तपणे संलग्न असणे.

युनेस्कोच्या 20 पैकी 18 सदस्यांची मान्यता
फ्रान्समधील पॅरिस येथे झालेल्या जागतिक वारसा समितीच्या 47 व्या अधिवेशनात यासंबंधीचा मजकूर तयार करण्यात आला. हा एक भारताच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारशाला मिळालेल्या जागतिक मान्यतेतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. वारसा समितीच्या बैठकीत, 20 पैकी 18 पक्षांनी या महत्त्वाच्या स्थळाला यादीत समाविष्ट करण्याच्या भारताच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला. या प्रस्तावावरील चर्चा 59 मिनिटे चालली आणि 18 सकारात्मक शिफारशींनंतर, सर्व सदस्य राष्ट्रे, युनेस्को, जागतिक वारसा केंद्र आणि युनेस्कोच्या सल्लागार संस्था (ICOMOS, IUCN IUCN) यांनी, या महत्त्वपूर्ण संधीबद्दल भारतीय शिष्टमंडळाचे अभिनंदन केले.
युनेस्कोच्या वारसा यादीतील इतर भारतीय स्थळे
भारतात सध्या 42 जागतिक वारसा स्थळे आहेत. यापैकी 34 सांस्कृतिक, सात नैसर्गिक आहेत आणि एक मिश्र प्रकारचे आहे. महाराष्ट्रात सहा जागतिक वारसा स्थळे आहेत, त्यापैकी पाच सांस्कृतिक आणि एक नैसर्गिक स्थळ आहे. अजिंठा लेणी (1983), एलोरा लेणी (1983), एलिफंटा लेणी (1987), छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (पूर्वीचे व्हिक्टोरिया टर्मिनस) (2004), व्हिक्टोरियन गॉथिक आणि आर्ट डेको एन्सेम्बल्स ऑफ मुंबई (2018) हे सांस्कृतिक श्रेणीत आणि महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळचा पश्चिम घाट (2012) यांचा समावेश नैसर्गिक श्रेणी मध्ये केला आहे.
या 11 किल्ल्यांच्या समावेशानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा घेतली गेली आहे. मात्र आता या किल्ल्यांना अधिक जपणं, हे आपलं कर्तव्य आहे. या किल्ल्यांची पडझड होऊ नये याकरता प्रत्यक्ष कारवाईची गरज आहे.