महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटन स्थळांवर लवकरच ‘पर्यटन सुरक्षा दल’ तैनात करण्यात येणार आहे. राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या विशेष दलामुळे महाराष्ट्रात फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षित आणि अधिक माहितीपूर्ण अनुभव मिळेल. तसेच स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होतील.
राज्यात अनेक सुंदर आणि ऐतिहासिक पर्यटन स्थळे आहेत. या स्थळांना भेट देण्यासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर देशभरातून आणि विदेशातूनही पर्यटक येत असतात. पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता, त्यांच्या सुरक्षिततेची आणि सोयीसुविधांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
महाराष्ट्र सरकारकडून हा निर्णय का घेण्यात आला?
काश्मीरमधील पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक ऐरणीवर आला होता. त्यामुळे राज्य सरकारने या दिशेने ठोस पाऊलं उचलली असल्याचं राज्याचे पर्यटन मंत्री श्री. शंभूराज देसाई यांनी सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार, या सुरक्षा दलामुळे पर्यटकांना सुरक्षित आणि चांगला अनुभव मिळेल. अनेकदा पर्यटकांना अनेक गैरसोईंचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ‘पर्यटन सुरक्षा दल’ स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय.
सुरुवात महाबळेश्वर महोत्सवापासून
या दलाची पहिली चाचणी सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर महोत्सवात होणार आहे. हा महोत्सव 1 ते 4 मे 2025 दरम्यान पार पडणार आहे. या काळात पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आणि माहिती पुरवठ्यासाठी 25 खास प्रशिक्षित जवानांची नेमणूक करण्यात येणार आहे. हे जवान 25 एप्रिल ते 31 ऑगस्ट 2025 पर्यंत कार्यरत राहतील. या पथदर्शी प्रकल्पासाठी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (MSSB), आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) हे एकत्र काम करत आहेत.
‘पर्यटन सुरक्षा दला’ची तयारी
सध्या ‘पर्यटन सुरक्षा दला’च्या स्थापनेसाठी आवश्यक तयारी सुरू आहे. यामध्ये सुरक्षा कर्मचाऱ्यांची निवड, त्यांचे प्रशिक्षण इत्यादी कामं वेगाने सुरू आहेत. महाबळेश्वर मधील पथदर्शी प्रकल्पाच्या यशस्वितेनंतर या मॉडेलचा अभ्यास करून हे दल राज्यातील इतर पर्यटन स्थळांवरही लागू केले जाईल. या सुरक्षा दलामध्ये प्रशिक्षित सुरक्षा रक्षकांचा समावेश असेल. जे पर्यटकांना केवळ सुरक्षाच नव्हे, तर प्रथमोपचार सेवा आणि आपत्कालीन परिस्थितीत मदत करतील.
याव्यतिरिक्त ‘पर्यटन सुरक्षा दल’ पर्यटन स्थळांवरील गैरसोयी आणि समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देईल. उदाहरणार्थ, जर एखाद्या ठिकाणी कचरा साचलेला असेल किंवा पिण्याच्या पाण्याची सोय नसेल, तर हे कर्मचारी संबंधित विभागाला याची माहिती देतील, ज्यामुळे पर्यटन स्थळांची स्वच्छता आणि व्यवस्था अधिक चांगली राखली जाईल.
काय असतील विशेष सुविधा?
हे सुरक्षा दल तांत्रिकदृष्ट्या देखिल सक्षम असेल. यानुसार पर्यटन स्थळांवर खालील सुविधा असतील.
• सीसीटीव्ही कॅमेरे
• हेल्पलाइन क्रमांक
• तात्काळ प्रतिसाद यंत्रणा
• स्थानिक भाषेत माहिती केंद्र
यामुळे पर्यटकांना कोणतीही अडचण आल्यास त्वरित मदत मिळू शकेल.
या पर्यटन सुरक्षा दलामुळे राज्याच्या पर्यटनात वाढ होईल आणि आर्थिकदृष्ट्याही फायदा होईल.
मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, “या उपक्रमामुळे 1 लाख कोटी रुपयांची खाजगी गुंतवणूक आणि सुमारे 18 लाख प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होतील.” याशिवाय, स्थानिक तरुणांना प्रशिक्षित करून त्यांना दलात सामावून घेतले जाईल. यामुळे त्यांना घरच्या घरी रोजगार मिळू शकेल.