सुरुची फोगाट…. हे नाव ऐकल्यावर ही खेळाडू कुस्तीपटू असेल असं तुम्हाला वाटत असेल मात्र, तुम्ही साफ चुकीचा विचार करताय. फोगाट म्हटलं की, कुस्ती आणि कुस्ती म्हटलं की फोगाट हे समीकरणचं बनलं आहे. त्यातच फोगाट या नावाचा हरियाणाशी संबंध आला, तर कुठल्याही क्रीडाप्रेमीला कुस्तीपटू असणार असा भास झाल्याशिवाय होणार नाही.
पण सध्या नेमबाजीच्या दुनियेत सुरुची फोगाट या नावाची चर्चा सर्वत्रच पहायाला मिळतेय. साधारणत: पंधरा दिवसांच्या अंतरामध्ये नेमबाजीच्या वेगवेगळ्या देशात दोन विश्वचषकच्या स्पर्धा झाल्या. त्या विश्वचषकात सुर्वणपदक मिळवत सुरुचीने कमाल केली. अनुक्रमे अर्जेन्टीना आणि पेरुमध्ये या स्पर्धा झाल्या. तिथल्या वातावरणाशी जुळवून घेत हरिणायाच्या झज्जरमधील सिरसिलोची लेकीने गगनभरारी घेतली.
माझी स्पर्धा ही केवळ माझ्याशी इतर कुणाशीही नाही… हे वाक्य होतं नेमबाजी विश्वचषकात सुवर्णपदकाची कमाई करणाऱ्या सुरुची फोगाटचं. आपल्या कारकीर्दीला तिने सुरुवात केली तेव्हापासून सुरुचीने ही गाठ मनाशी बांधून ठेवली. १९ व्या वर्षी तिची पदकांची संख्या पाहता तिला याचा फायदा निश्चितच होताना पहायला मिळतोय. माझी नजर केवळ सुवर्णपदकावर आहे. आणि मला खूप पदकं जिंकायची आहेत हे ध्येय सुरुचीचं आहे. नेमबाजीच्या दुनियेत तीनं आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
ऑलिम्पिक पदकविजेत्या मनू भाकरला पराभूत करण्याची किमया साधत सुरुचीने वर्ल्ड कपमध्ये सुवर्णपदक जिंकलं. या वर्षी झालेल्या नेमबाजीच्या दोन विश्वचषक स्पर्धेत तिच्या नावावर सध्या तीन सुर्वणपदक जमा झाली आहेत. आणि तिला नेमबाजीत ऑलिम्पिक पदकाचं स्वप्न साकारण्यासाठी लागणाऱ्या तयारीला तिच्याकडे बराच अवधी आहे.
कुस्तीपटू सुरुची नेमबाजीकडे कशी वळली ?
कुस्तीपटू ते नेमबाज असा सुरूची फोगाटचा प्रवास सुरु होतो तो कुस्तीपटू आणि मुष्टीयोद्ध्यांची खाण अशी ओळख असणाऱ्या हरियाणामधून. घरात खेळासाठी लागणार पोषक वातावरण तर होतंच. सुरुचीचे वडील निवृत्त सेनानी आहेत. त्यांचा चुलत भाऊ हा उत्तम कुस्तीपटू होता. पद्मश्री आणि क्रीडा जगतामध्ये ‘गुंगा पहलवान’ म्हणून त्यांची ओळख आहे. डेफलिम्पिकमध्ये कुस्ती या प्रकारात त्यांनी भारतासाठी पदकांची लयलूट केली आहे. जेव्हा-जेव्हा ते एखादं पदक जिंकून घरी परत यायचे त्यावेळी सुरुचीचे वडील आपली मुलगीही अशाचप्रकारे पदक जिंकेल अशी आशा बाळगत होते. तिच्या जन्माच्याही आधीपासून सुरुचीच्या वडिलांनी आपल्या मुलीने कुस्तीपटू व्हावं असं स्वप्न पाहिलं होतं. तिलाही कुठल्याही खेळात प्राविण्य मिळवायचं होतं. कुस्तीपटू होण्याची तिनं तयारीही दर्शवली. यासाठी सुरुचीने सरावाला सुरुवातही केली. मात्र, कुस्तीचा सराव करताना तिला दुखापत झाली. जवळपास तीन महिने तिने कसून सराव केला. मात्र, दुखापतीमुळे सुरुचीची पावलं शूटिंग रेंजकडे वळली. आणि यानंतर तिने मागे वळून पाहिलं नाही.
हरियाणातील झज्जकमधील सरसोली या गावातून ती जवळपास 50 ते 60 किलोमीटर लांब असलेल्या भिवानीतील गुरु द्रोणाचार्य आकादमीमध्ये नेमबाजीचे धडे गिरवू लागली. प्रशिक्षक सुरेश सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली तिने नेमबाजीचं प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. योगायोग म्हणजे येथूनच दोन ऑलिम्पिक पदकं जिंकणाऱ्या मनू भाकरनेही आपला नेमबाजीचा प्रवास सुरु केला होता.
खडतर परिस्थितीवर मात
सुरुचीच्या घरची परिस्थिती बेताची होती. नेमबाजी हा तसचा खर्चिक खेळ आहे. तिच्या वडिलांनीही आपल्या मुलीसाठी पहिल्यांदा पिस्तूल खरेदी केली कर्ज काढून. आपल्या मुलीचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्यांनी कुठली कसर सोडली नाही. दरम्यान, सुरुचीनेही आपल्या कुटुंबीयांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला.
कसून सराव आणि चिकाटीच्या जोरावर सुरुचीने अवघ्या थोड्या कालावधीतच 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात आपली छाप सोडण्यास सुरुवात केली. त्यामुळेच तिच्या वडिलांनी आणखी दोन पिस्तूल तिला खेरदी करुन दिल्या. सुरुचीचा खेळ हळूहळू बहरत गेला. तिचा खेळ सुधारावा यासाठी त्यांनी देसी जुगाड अर्थातच घरी लाकडाचे ब्लॉक तयार केले. ज्यामुळे तिला अचूक नेम साधण्यात मदत होईल. नेमबाजीमध्ये आपल्या मुलीने मोठं नाव मिळवाव यासाठी कुटुंबीयांची मोलाची साथ सुरूचीला लाभली ही बाब नाकारता येणार नाही.
सुरुचीचा सुवर्णवेध
खेलो इंडिया या स्पर्धेने आजपर्यंत भारताला अनेक खेळाडू दिले आहेत. याच खेलो इंडियामध्ये सुरुची फोगाटने सुवर्ण आणि रौप्य पदकांची कमाई केली होती. 2024 चे राष्ट्रीय खेळ तिच्या कारकीर्दीत मैलाचा दगड ठरले. 67 व्या राष्ट्रीय खेळांमध्ये सुरुचीने 7 पदकांची कमाई केली. यामुळेच तिला आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली. नेमबाजीत या वर्षी तब्बल एक नाही तर दोन सुवर्णपदकं पटकावत भारताची मान आंतराराष्ट्रीय स्तरावर तिने अभिमानाने उंचावली आहे. अर्जेन्टीनामध्ये झालेल्या विश्वचषक नेमबाजीत 244.6 गुणांची कमाई करत सुरुचीने सुवर्णपदाकवर आपलं नाव कोरलं. या स्पर्धेत तिनं चीनच्या नेमबाबाजांना मागे टाकत सुवर्णपदक खेचून आणलं. तर पेरुमधील लिमा या शहरात झालेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतही तिनं सुवर्णपदक जिंकण्याची किमया साधली.
दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या मनू भाकरवर या स्पर्धेत साऱ्यांच्याच नजर खिळल्या होत्या. मात्र, सुरुचीने नवा इतिहास रचत अवघ्या क्रीडाविश्वाचं लक्ष आपल्याकडे वेधलं. 243.6 गुणांची कमाई करत तिने अव्वलस्थान पटकावलं तर 242.3 गुण मिळवत मनू भाकरलं रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. सुरुचीच्या या सुवर्ण कामगिरीमुळे भारताला एक नवी युवा नेमबाज मिळाली आहे.
हेही वाचा : गोल्डन गर्ल ते बॉस लेडी
2017 च्या राष्ट्रीय खेळांमध्ये नऊ सुवर्णपदकं जिंकत मनू भाकर या नेमबाजपटूचा उदय झाला होता. आणि आता नेमबाबजीत सुरुचीच्या कामगिरीने याचीच आठवण मनूला निश्चितच झाली असणार आहे. 2028 मध्ये अमेरिकेच्या लॉस एंजिलिसमध्ये 14 ते 30 जुलैदरम्यान ऑलिम्पिकच्या स्पर्धा रंगणार आहेत. या ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणं हेच लक्ष्य सुरुची फोगाटचं असणार आहे. तिला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. अमेरिकेत होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये अचूक नेम साधण्यासाठी सुरुचीला जीवाचं रान कराव लागले. झज्जरमधील सिरसोली या गावात सुरुची फोगाट पुन्हा एकदा आपल्या अचाट कामगिरीने गावकऱ्यांना जोरदार सेलिब्रेशन करण्याची संधी देणार का ते येणारा काळच ठरवेल.