स्वप्न पाहणं आणि ते सत्यतात उतरवणं हे काही सर्वांना शक्य होत नाही. प्रत्येकाचीच स्वप्न पूर्ण होतातच असं नाही. पण वर्ल्ड चॅम्पियन गुकेशने बुद्धीबळपटू होण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते सत्यातही उतरवलं. यासोबतच वर्ल्ड चॅम्पियन होत त्याने स्वप्नांचा पाठलाग करत ते कसं पूर्ण करता येतं हे दाखवून दिलं. आता हेच पहा ना वर्ल्ड चॅम्पियन डी. गुकेश एकदा चेन्नईमध्ये विश्वनाथन आनंद आणि मॅग्नस कार्लसन यांच्यातला सामना पहायला गेला होता. त्यावेळी गुकेशला आणि त्याच्या वडिलांना तो सामना पाहण्यासाठी जागाही मिळाली नव्हती. मात्र, बाप-लेकाने तो सामना जिथे सामना सुरु होता. त्याठिकाणी असलेल्या पारदर्शी काचेतून त्यांनी हा संपूर्ण सामना पाहिला होता. त्यावेळी गुकेश जेमतेम सात वर्षांचा होता. याच सामन्यात पाच वेळचा विश्वविजेता विश्वनाथन आनंदला हरवून मॅग्नस कार्लर्सन जगज्जेता बुद्धीबळपटू बनला होता. गुकेशने त्यावेळीच एकदा या पारदर्शी काचेतून सामना बघण्याऐवजी प्रत्यक्षात बुद्धीबळाचा सामना खेळण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच मॅग्नस कार्लसनला चेकमेट करण्याचा चंगही त्याने आपल्या मनाशी बांधला. आणि त्याचं हेच स्वप्न साकार झालं ते 2025 मध्ये नॉर्वे इथे तेही मॅग्नस कार्लसन याच्या मातृभूमीत…
गुकेशकडून कार्लसन चेकमेट
भारतात आयपीएलचा क्वालिफायर-2 मुकाबला मुंबई इंडियन्स जिंकणार की पंजाब किंग्ज इलेव्हन जिंकणार यासाठी रविवारी 1 जूनच्या रात्री क्रीडाप्रेमी मध्यरात्रीपर्यंत जागे होते. कारणही तसंच होतं पावसामुळे सामना लांबणीवर पडला. आणि क्रीडाप्रेमी रात्रभर टीव्ही समोर डोळे लावून बसले होते. याचदरम्यान, सोशल मीडीयावर ‘वेट वॉट जस्ट हॅपनड’ या एक्सवरील एका पोस्टने लक्ष वेधलं. ही पोस्ट होती ती डी. गुकेशने बुद्धीबळाच्या दुनियेत रचलेल्या ऐतिहासिक कामगिरीबाबतची. नॉर्वे चेस 2025 च्या मुकाबल्यात वर्ल्ड चॅम्पियन डी गुकेशने मॅग्नस कार्लसनला पराभूत करण्याचा भीमपराक्रम केला. याच स्पर्धेतल्या पहिल्या फेरीत गुकेशला कार्लसनकडून पराभवाची स्विकारायला लागला होता. मात्र, सहाव्या फेरीत गुकेशने अप्रतिम चाली रचत कार्लसनला पराभूत करण्याची किमया साधली. कार्लसनला हा पराभव एवढा जिव्हारी लागला की, सामन्यानंतर त्याने आपला हात जोरदार टेबलवर आपटला आणि तो निघून गेला. यानंतर त्याने गुकेशशी हस्तांदोलन केलं मात्र, जगातील नंबर एकच्या बुद्धीबळपटूने केलेले हे कृत्य निश्चितच त्याला शोभणारं नव्हतं. कार्लसनच्या या कृतीबबात त्याच्यावर जोरदार टीकाही होतेय.
तर दुसरीकडे वर्ल्ड चॅम्पियन गुकेशला आपण बुद्धीबळाच्या दुनियेतील नंबर एकच्या खेळाडूला पराभूत केलंय याचा विश्वास बसला नव्हता. या विजयानंतर त्याने कुठलंही सेलिब्रेशन केलं नाही. त्याच्या विजयानंतरचा शांत आणि संयमीपणा क्रीडाप्रेमींना अधिक भावला. वास्तविक पाहता या सामन्यात गुकेशचा खेळ बचावात्मक होता. आणि कार्लसनच्या आक्रमणांना परतवून लावण्याचं तो काम करत होता. या परिस्थितीत कुणालाही कळायच्या आत त्याने हा विजय साकारला.
क्लासिकल चेस प्रकारात गुकेशने कार्लसनला पराभूत केल्याने सर्वच स्तरातून कौतुकांचा वर्षाव होतोय. 19 वर्षीय डी. गुकेशने 34 वर्षीय कार्लसनवर मात केली. त्यामुळे क्लासिक चेस हा प्रकारचं सोडण्याचा विचार आता कार्लसन करु लागलाय. कार्लसन ब्लिट्झ, रॅपिड आणि फ्रिस्टाईल चेस या प्रकरांकडे अधिक भर देण्याचा त्याचा मानस आहे. घरच्या प्रेक्षकांसमोर गुकेशकडून चारही मुंड्या चित झाल्याने कदाचित हा पराभव कार्लसनच्या अधिक जिव्हारी लागलेला दिसतोय.
हे ही वाचा : डी. गुकेश बुद्धीबळाचा जगजेत्ता
बुद्धीबळ एक छंद ते करिअर…
गुकेश डोम्माराजू म्हणजे वर्ल्ड चॅम्पियन डी. गुकेश सुरुवातीला बुद्धीबळाकडे एक छंद म्हणून पाहत होता. मात्र, त्यानं आपल्या बुद्धीबळ खेळण्याचा छंद करिअर म्हणूनच निवडलं आणि आता गुकेश जगज्जेता आहे. या 64 घरांच्या राजाचा बुद्धीबळाकडे कल वाढू लागला तो सात वर्षांचा असताना. गुकेशला एक विश्वविजेता बुद्धीबळपटू घडवण्यात त्याच्या आई-वडिलांनी मोलाचा वाटा उचलला आहे. त्याचे वडिल एक निष्णात इएनटी सर्जन होते. पण मुलासाठी त्यांनी आपलं करिअर मागे ठेवलं. आणि ते प्रत्येक छोट्या अथवा मोठ्या स्पर्धांसाठी गुकेशबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ लागले. वडिल पूर्णपणे गुकेशबरोबर असल्याने त्याच्या आईने घरचा संपूर्ण भार उचलला. पद्मा कुमारी यांनी आपल्या मुलाच्या आड कुठलीही गोष्ट येणार नाही याची काळजी घेतली. गुकेशनेही आपल्या आई-वडिलांना निराश केलं नाही. अवघ्या 12 व्या वर्षी तो ग्रँडमास्टर झाला. बुद्धीबळाच्या इतिहासात तो तिसरा सर्वात युवा ग्रँडमास्टर आहे. त्याचप्रमाणे वयाच्या 17 व्या वर्षी त्याचं फिडे रँकिंग 2750 होतं. आतापर्यंत त्याने अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. बुद्धीबळाच्या जगतात एकेक शिखर तो पादाक्रांत करत आहे. वयाच्या 18 व्या वर्षी तो जगज्जेता बनला आणि त्यानं नवा इतिहास लिहीला. त्याच्या या कामगिरीमुळे बुद्धीबळाच्या दुनियेत विश्वनाथन आनंदनंतर त्यानं आपल्या भोवती एक वेगळ वलय निर्माण केलंय.
बुद्धीबळामध्ये भारताचं भविष्य उज्वल
विश्वानथन आनंद म्हणजे बुद्धीबळ आणि बुद्धीबळ म्हणजेच विश्वनाथन आनंद. भारतामध्ये विश्वनाथन आनंदच बुद्धीबळाचा चेहरा. पाचवेळा वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान विश्वनाथन आनंदला मिळाला होता. मात्र, विश्वनाथन आनंदनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या एकाही बुद्धीबळपटूला विश्वविजेतेपदाचा मान मिळाला नव्हता. मात्र, 2024 मध्ये 18 वर्षीय डी. गुकेश विश्वविजेता झाला, आनंदनंतर वर्ल्ड चॅम्पियन जिंकणारा तो केवळ दुसरा बुद्धीबळपटू आहे. चीनच्या डींग रेनला पराभूत करत गुकेश सर्वात युवा वर्ल्ड चॅम्पियन झाला. 2024 हे वर्ष गुकेश आपल्या खेळाने गाजवलंच. शिवाय 2025 मध्ये त्याने आपल्या खेळातील सातत्य कायम राखत मॅग्नस कार्लसनचा धुव्वा उडवला. त्याचा हा विजय भारतीय क्रीडाप्रेमींच्या कायमच लक्षात राहणार आहे.
हे ही वाचा : बुद्धीबळातील सर्वाधिक वजीर ‘तामिळनाडूत’!
डी. गुकेश भारताचं नाव बुद्धीबळाच्या क्षेत्रात उंचावत आहेच. गुकेशबरोबरच अर्जुन एरीगैसी, प्रज्ञानंद, अरविंद चिदंबरम आणि विदीत गुजराथी या सारखे बुद्धीबळपटू आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. दरम्यान, 19 वर्षीय गुकेश आता भविष्यात आपला खेळण्याचा स्तर अधिक उंचावत आपल्या विश्वविजेतेपदाची संख्या आणखी वाढवावी अशीच अपेक्षा त्याच्याकडून केली जाणार आहे. आता गुकेश बुद्धीबळाच्या दुनियेत कार्लसनप्रमाणे इतर किती अव्वल मानांकित बुद्धीबळपटूंना चेकमेट करतो ते पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.