‘मुंबई इंडियन्स या क्रिकेटच्या युनिव्हर्सिटीतलं ग्रॅज्युएशन तुम्हाला सुपरस्टार बनवतं’, असं वर्णन माजी क्रिकेटपटू इरफान पठाण यानं केलं होतं. आयपीएल अर्थातच इंडियन प्रिमियर लीगमध्ये रोज नवा क्रिकेटपटू उदयाला येतो. यंदाच्या 2025 च्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सनं दोन नवे क्रिकेटपटू भारतीय क्रिकेटला दिले आहेत. चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्धच्या सामन्यता केरळचा युवा स्पिनर विग्नेश पुतुर आणि आता कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या मॅचमध्ये हिरो ठरलेला पंजाबचा 23 वर्षीय उदयोन्मुख क्रिकेटपटू अश्विनी कुमार.
यंदाचा पहिला हिरा केरळचा विग्नेश
मुंबईच्या स्काऊटींग टीमचं यासाठी जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. भारताच्या कानाकोपऱ्यातून मुंबई इंडियन्सची स्काऊटिंग टीम हे क्रिकेटपटू शोधून काढते. विग्नेश पुतुर तर केरळच्या एका स्थानिक लीगमध्ये क्रिकेट खेळत होता. त्यावेळी मुंबईच्या स्काऊटींग टीमनं त्याला हेरलं. आणि एका रात्रीत विग्नेश सुपरस्टार झाला. चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या मॅचमध्ये इम्पॅक्ट प्लेअर म्हणून तो मैदानात उतरला आणि त्यानं तीन विकेट्स घेत अवघ्या क्रिकेट जगताचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे आणि दीपक हुड्डाला बाद करत त्यानं आंतरराष्ट्रीय स्तरावर साऱ्यांनाच आपली दखल घ्यायला भाग पाडलं आहे. विग्नेश पुथुर केरळमधील मलमपुरम या छोट्या गावातील रिक्षाचालकाचा मुलगा. वयाच्या अकराव्या वर्षी त्यानं क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली. केरळा क्रिकेट लीगमध्ये त्यानं आपल्या फिरकीची जादू दाखवली. 2024 च्या केरळा क्रिकेट लीगच्या हंगामात त्यानं 16 सामन्यात 13 विकेट्स घेतल्या. 38 रन्स देत 3 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली. याच लीगमध्ये मुंबई इंडियन्सला हा हिरा गवसला.
लंबी रेस का घोडा
या हिऱ्याला पैलू पाडण्याचं काम मुंबई इंडियन्सच्या स्काऊटींग टीमनं केलं. त्यांनी विग्नेशला आपल्या खेळात अधिक परिपक्व होण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या क्रिकेट लीगमध्ये नेट बॉलर म्हणून पाठवलं. तिथे त्याला अफागाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशिद खानबरोबर गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या लिलावात अवघे 30 लाख रुपये मोजून त्याला खरेदी केलं. आणि 2025 आयपीएल हंगामातील मुंबई इंडियन्सच्या पहिल्याच सामन्यात विग्नेशवर त्याच्या टीमनं विश्वास दाखवला. त्याला महेंद्र सिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध खेळण्याची संधी दिली. विग्नेशनही आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवत तीन बळी घेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दिमाखात पदार्पण केलं.
विग्नेशला आपल्या टीमला विजय साकारुन देता आला नाही. मात्र त्याच्या फिरकीची जादू अशी काही चालली की, चेन्नई सुपर किंग्जच्या विजयापेक्षा विग्नेशची चर्चा क्रिकेट जगतामध्ये अधिक रंगली. विग्नेशनं मिळालेल्या संधी सोनं करत अवघ्या क्रिकेट जगतामध्ये पदार्पणातच आपली वेगळी छाप सोडली आहे. लंबी रेस का घोड म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातंय. दरम्यान, आपल्या पहिल्याच सामन्यात त्यानं क्रिकेटप्रेमींकडून कौतुकाची थाप तर मिळवलीच. त्याचप्रमाणे टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं त्याच्या पाठिवर कौतुकाची थाप मारली. आता आगामी काळात विग्नेश कशी कामगिरी करतो याकडे तमाम क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेल.
मुंबई इंडियन्सच्या विजयाचं खातं उघडणारा अश्विनी कुमार
विग्नेशबरोबरच मुंबई इंडियन्सने अश्विनी कुमार हा देखील एक नवा तारा क्रिकेटविश्वाला दिला आहे. या हंगामात मुंबईच्या विजयाचं खातं उघडून देण्यात त्यानं मोलाची भूमिका बजावली. 23 वर्षीय अश्विनी मुळचा चंदीगढमधील झंजेरी या शहरातला. त्याला झंजेरीतच क्रिकेटचं बाळकडू मिळालं. पंजाबच्या संघात स्थान मिळावं, यासाठी त्यानं आपल्या नोकरीवरही पाणी सोडलं. 2019 मध्ये त्यानं पंजाबकडून त्याचा पहिला फर्स्ट क्लास सामना खेळला. मात्र त्याला आपली छाप सोडता आली नाही. दुखापतींच्या विळख्यात आणि पंजाबच्या रणजी संघात फास्ट बॉलर्ससाठी असलेल्या मोठ्या स्पर्धेमुळे त्याला संधी मिळाली नाही. अश्विन हा एक मध्यमगती गोलंदाज आहे. आपल्या शॉर्टपीच आणि यॉर्करसाठी तो ओळखला जातो. तसेच डेथ ओव्हर्समध्येही त्याची गोलंदाजी फायदेशीर ठरते. पंजाबच्या स्थानिक लीगमध्ये शेर ए पंजाब या टीमकडून खेळताना त्यांनं चांगली कामगरी केली. आणि त्यामुळे मुंबई इंडियन्सकडून खेळण्याची एक चांगली संधी त्याला मिळाली. पंजाब किंग्ज इलेव्हन आणि चेन्नई सुपरकिंग्जसाठी तो नेट बॉलरही होता. मात्र, त्याला या दोन्ही संघाकडून खेळण्याची संधी मिळाली नाही.
आयपीएलमध्ये पदार्पणात चार विकेट्स घेणारा पहिला खेळाडू
दरम्यान, जसप्रीत बुमराच्या अनुपस्थिती मुंबईच्या फास्ट बॉलिंगची भिस्त ट्रेंट बोल्ट आणि दीपक चाहरसह अश्विनी कुमारवर होती. कोलकाता टीमचा कर्णधार अजिंक्य रहाणे त्याचा आयपीएलमधील पहिला बळी ठरला. पहिल्याच ओव्हरमध्ये अश्विनीने त्याला माघारी धाडले. तर रिंकू सिंग, मनिष पांडे आणि आंद्रे रसेल या कोलकात्याच्या धोकादायक फलंदाजांना बाद करण्याची किमयाही त्यानं साधली. आयपीएलमध्ये पदार्पणात चार विकेट्स घेणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. अश्विनीसारखी देदिप्यान कामगिरी आयपीएलच्या गेल्या 17 हंगामात कोणत्याही क्रिकेटपटूला करता आलेली नाही. चार विकेट्स घेतल्यानंतर अश्विनीला दुपारच्या जेवणात काय खाल्लं होतं? असा प्रश्न क्रिकेट समालोचकाने विचारला होता. त्यावेळी त्यानं “कुछ नहीं सिर्फ एक बनाना खाया था” असं उत्तर दिलं. त्याच्या या उत्तराने सारेच आवाक झाले होते. मॅच खेळण्याचा इतका दबाव होता की, “भूकच लागली नाही” असंही त्याने सांगितलं.
नव्या चेहऱ्यांना संधी
दरम्यान, पंजाब संघाचे प्रशिक्षक वसिम जाफर यांनी अश्विनीने आपला फिटनेस कायम राखला तर तो 140 च्या स्पीडनेही गोलंदाजी करु शकतो असं म्हटलं आहे. जसप्रीत बुमराह दुखापतीतून सावरल्यानंतर त्याचं मुंबईच्या संघात कमबॅक होईल. आणि त्याच्या अनुभवाचा फायदाही अश्विनीलाही मिळणार आहे. त्याने पहिल्या सामन्यात मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर सर्वोत्तम कामगिरी केलीच आहे. मात्र, आयपीएलच्या या हंगामातील येणाऱ्या सामन्यातील कामगिरीवर त्याचं भारतीय क्रिकेटमधील भवितव्य ठरणार आहे. मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या या हंगामाच्या सुरुवातीलाच दोन नवे चेहरे भारतीय क्रिकेटला दिलेले आहेत. याआधीही पंड्या ब्रदर्स म्हणजेच हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या, भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह, तिलक वर्मा आणि यासारखे क्रिकेटपटू भारतीय संघाला दिलेत.
मुंबईच्या टीमने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 5 आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेतच. त्यांच्या या यशामध्ये स्टार क्रिकेटपटूंबरोबरच युवा क्रिकेटपटूंचाही वाट तेवढाच होता. या टीमचं वैशिष्ट्य म्हणेज भारताला चांगले क्रिकेटपटू देण्याचा इतिहास मुंबई इंडियन्सच्या टीमला आहे. आयपीएलची ओळख ग्लॅमर आणि पैसा अशी तर आहेच. मात्र, ही लीग अनेक उदयोन्मुख क्रिकेटपटूंसाठी यामुळे भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवण्याचं एक हक्काचं व्यासपीठही बनलंय. मुंबई इंडियन्स तर असे क्रिकेटपटू निर्माण करणारी एक फॅक्टरीच आहे.