विक्रम हे मोडण्यासाठीच प्रस्थापित होतात. खेळाच्या दुनियेतील हे सगळ्यात लोकप्रिय वाक्य आहे. 16 मे 2025 रोजी दोहामध्ये पार पडलेल्या डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राने 90.23 मीटर भाला फेकत नव्या राष्ट्रीय विक्रमाला गवसणी घातली. ॲथलेटीक्सच्या मैदानावर त्यानं पहिल्यांदाच 90 मीटरपर्यंत भाला फेकला. आपल्या करिअरमधील त्याची आतापर्यंतची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. तसंच खऱ्याअर्थाने नीरजचा हा स्वत:वरच स्वत:ने मिळवलेला विजय होता. दोन ऑलिम्पिक मेडल नावावर असेलल्या नीरज चोप्राला गेल्या काही काळापासून प्रत्येक पत्रकार परिषदेत कायमच विचारला जाणार प्रश्न म्हणजे नीरज 90 मीटरचा बॅरियर केव्हा मोडणार.
2018 च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये त्यानं 86.47 मीटर भाला फेकत सुवर्ण पदकाची कमाई केली. त्यानंतर टोकीयो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकत इतिहास रचला आणि 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकल्यानंतर सर्वांना एकच प्रश्न पडला होता की, नीरज चोप्रा आपल्या करिअरमध्ये 90 मीटर लांब भाला कधी फेकणार. याचं उत्तर नीरजसह सर्वसामान्य क्रीडाप्रेमींना अखेर 16 मे 2025 या दिवशी याचं उत्तर मिळालं.
हेही वाचा : भारतीय टेनिसला ग्रहण
नीरज कशामुळे पार करु शकला 90 मीटरचा टप्पा ?
दोहा डायमंड लीगमध्ये नीरजला देदीप्यमान यश मिळालं. या यशाचं श्रेय जेवढ नीरजचं आहे. तेवढाचा वाटा त्याचे कोच यान जेलेझनी यांचा आहे. 90 मीटरचं लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊनच नीरजने 2024 पॅरिस ऑलिम्पिकनंतर ज्यांच्या नावावर विश्वविक्रमाची नोंद आहे अशा यान जेलेझनी यांची निवड केली. 1998 मध्ये त्यांनी 98.48 मीटर भाला फेकत विश्वविक्रमाची नोंद केली. त्यांचा हा विक्रम आजतागायत कोणत्याही भालाफेकपटूला मोडता आलेला नाही. आपल्या कारकीर्दीत त्यांनी तब्बल 52 वेळा 90 मीटरच्या पार भाला फेकण्याची किमया साधली आहे. नीरज त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या चार महिन्यांपासून सराव करतोय. आणि त्याचं फळ त्याला लगेचच मिळालं आहे.
यान यांनी नीरजला काही बदल सुचवले. नीरज जेव्हा दोहा डायमंड लीगमध्ये भाला फेकण्यासाठी मैदानात उतरला त्यावेळी त्याची भाला फेकण्याची पद्धत काहीशी वेगळी होती. त्याने हिप रोटेशन काही प्रमाणात कमी केलं होतं. तसंच भालाफेकताना तो सरळ रेषेत फेकत होता. ज्यामुळे त्याला आपल्या लक्ष्यापर्यंत पोहचण्यास मदत झाली. दोहा हे कायमच भालाफेकपटूंसाठी नंदनवन मानलं जातं. तिकडंचं वातावरण भालाफेकपटूंसाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. आतापर्यंत ज्या 25 भाला फेकपटूंनी 90 मीटरपर्यंतची मजल मारली आहे. त्यापैकी 5 भालाफेकपटूंनी दोहामध्ये या विक्रमाला गवसणी घातली आहे. 16 मे रोजी नीरजबरोबर ज्युलियन वेबरने 91.06 मीटर भाला फेकत सुवर्णपदक पटकावलं. तर नीरजला 90.23 मीटर भाला फेकत रौप्य पदकावर समाधान मानाव लागलं.
नीरज चोप्राचे 5 सर्वोत्तम थ्रो
2016 मध्ये पोलंडमध्ये पार पडलेल्या वर्ल्ड अंडर 20 चॅम्पियनशीप स्पर्धेत नीरज चोप्राने 86.48 मीटर भाला फेकत अवघ्या क्रीडा विश्वाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं होतं. 7 ऑगस्ट 2021 हा दिवस तर भारतीय क्रीडाप्रेमी कधी विसरु शकणार नाही. याच दिवशी टोकियो ऑलिम्पिकमध्ये 87.58 मीटर भाला फेकत नीरजने सुवर्णपदक जिंकत नवा इतिहास रचला होता. ट्रॅक अँड फिल्डमधील भारताचं ते पहिलं ऑलिम्पिक सुवर्णपद ठरलं होतं. तर नेमबाज अभिनव बिंद्रानंतर वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक जिंकणारा तो दुसरा भारतीय होण्याचा मानही त्यानं मिळवला होता. यानंतर दोन वर्षांनी म्हणजेच 27 ऑगस्ट 2023 या दिवशी हंगेरितील बुडापेस्टमध्ये झालेल्या वर्ल्ड ॲथलेटीक्स चॅम्पियनशीपमध्ये त्याने 88.17 मीटर भाला फेकत सुवर्णपकद जिंकत नवा इतिहास रचला होता.
30 जून 2022 मध्ये नीरज चोप्रा 90 मीटर भाला फेकण्याच्या अगदी जवळ पोहचला होता. मात्र, त्याचं स्वप्न साकार होऊ शकलं नव्हतं. 89.94 मीटर भाला फेकत आपलं 90 मीटरचं लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न केला होता. अखेर त्याचं स्वप्न सत्यात उतरलं ते 16 मे 2025 मध्ये दोहात पार पडलेल्या डायमंड लीगमध्ये. 90.23 मीटर भाला फेकत अखेर तो आपल्या लक्ष्यापर्यंत पोहचू शकला. अशी कामगिरी करणालरा तो 25 वा भालाफेकपटू ठरला आहे.
ओव्हरवेट नीरज कसा बनला भालाफेकपटू ?
24 डिसेंबर 1997 मध्ये हरियाणाच्या खांडरा गावात नीरज चोप्राचा जन्म झाला. त्याचे वडिल शेती करायचे. आणि आई गृहिणी आहे. नीरजला दोन लहान बहिणी आहेत. 19 जणांच्या एकत्र कुटुंबाच नीरज लहानाचा मोठा झाला. वयाच्या अकराव्या वर्षी त्याचं वजन जवळपास 90 किलो होतं. त्यामुळे वडिलांनी नीरजला वजन कमी करण्यासाठी जिममध्ये पाठवलं. पानीपतच्या शिवाजी स्टेडियममध्ये तो आपल्या वडिलांबरोबर जायचा तिथेच त्याला भालाफेक या खेळाची ओळख झाली. 13 वर्षांचा असताना तो पंचकुलामध्ये भालाफेकीचं प्रशिक्षण घेऊ लागला. यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही. आणि हळूहळू भालाफेकमध्ये यशाची शिखरं पादाक्रांत केली. आज कठोर मेहनतीच्या जोरावर भालाफेक या प्रकारात भारताला नव्या उंचीवर नेऊन ठेवलंय.
काय आहे नीरज चोप्राचं पुढचं लक्ष्य ?
90 मीटर भाला फेकल्यानंतर नीगरज चोप्राने आपल्या समोरील एक अडथळा पार केला आहे. आता त्याच्यासमोर यापुढे आव्हान असणार आहे ते पाकिस्तानचा भाला फेकपटू अरशद नदीमचा विक्रम मोडित काढण्याचा. अरशदने 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 92.97 मीटरपर्यंत भाला फेकत नीरजचं सलग दोनदा ऑलिम्पिक सुवर्णपद जिंकण्याचं स्वप्न साकार होऊ दिलं नव्हतं. दोहा डायमंड लीगमध्ये अरशद सहभागी झाला नव्हता. मात्र, सप्टेंबरमध्ये होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये या दोघांमधील सामना क्रीडाप्रेमींना पुन्हा एकदा पहायला मिळण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे 2028 मध्ये होणाऱ्या लॉस एंजिलिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत नीरज आणखी एक ऑलिम्पिक पदक मिळवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.