‘थेऊरचा श्री चिंतामणी’ काय आहे बाप्पाचं वैशिष्ट्य?
अष्टविनायक गणपती श्री चिंतामणी, थेऊर हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे मंदिर असून हा अष्टविनायकांपैकी पाचवा गणपती आहे. पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातील महड या गावात श्री चिंतामणी गणपतीचे मंदिर आहे. चिंता दूर करणारा गणपती अशी या गणपतीची ख्याती आहे.
ब्रम्हदेवाने आपले चित्त स्थिर करण्यासाठी गणपतीची या जागी आराधना केली. त्यामुळे या गावाला थेऊर असं नाव पडलं, अशी अख्यायिका आहे. यासंदर्भात आणखी एक कथा आहे. राजा अभिजीत आणि राणी गुणवतीचा मुलगा गुणाने कपिलमुनींकडे असलेला चिंतामणी हे रत्न चोरले. कपिलमुनींना हे कळले तेव्हा त्यांनी गणपतीला ते रत्न गुणाकडून परत आणण्याची विनंती केली. गणपतीने गुणाचा वध करून ते रत्न कपिलमुनींना दिले. मात्र, कपिलमुनींनी हे रत्न गणपतीला अर्पण केले. गणपतीच्या गळ्यात त्यांनी ते घातलं आणि त्यांची चिंताही दूर झाली. त्यामुळे गणपतीला येथे चिंतामणी या नावाने ओळखले जाऊ लागलं. चिंता दूर करणारा गणपती म्हणून हे देवस्थान प्रसिद्धीस पावलं.
गणपतीचे मंदिर
श्री चिंतामणी गणपतीचे मुळ मंदिर कुणी बांधलं याबाबत ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. चिंचवड येथील श्रीमोरया गोसावी महाराज यांना थेऊर हे गाव इनाम असून सदर मंदिराची पुनर्बांधणी श्रीमोरया यांचे नातू श्रीधरणीधर महाराज देव यांनी बांधलं. 100 वर्षांनंतर पेशव्यांनी तेथे भव्य व आकर्षक मंदिर व सभागृह बांधलं. युरोपीयांकडून पेशव्यांना पितळाच्या दोन मोठ्या घंटा मिळाल्या होत्या. त्यातील एक महाडला असून दुसरी येथे आहे. श्री चिंतामणीचे मंदिर भव्य आहे. मंदिरातील मूर्ती स्वयंभू असून डाव्या सोंडेची, आसन घातलेली व पूर्वाभिमुख आहे. त्याच्या दोन्ही डोळ्यात लाल मणी व हिरे आहेत. हे मंदिर आजही मजबूत स्थितीत आहे.
चिंतामणी हा श्री माधवराव पेशवे यांच्या घराण्याचे कुलदैवत आहे. श्री माधवराव यांनी त्यांचे शेवटचे दिवस या देवळात व्यतीत केले आणि गणपतीचे नांव घेत त्यांनी शेवटचा श्वास सोडला. माधवराव पेशवे यांचे स्मारकही या मंदिर परिसरात असलेले पाहायला मिळते.
थेऊर येथे संत मोरया गोसावी यांनी घोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपाने प्रसन्न होऊन गणपतीने त्यांना सिद्धी प्रदान केली. सद्यस्थितीही या मंदिराची संपूर्ण देखभाल दुरुस्ती व व्यवस्थापन चिंचवड येथील मोरया गोसावी ट्रस्टच्या माध्यमातूनच पाहिले जाते.