2024 हे वर्ष बॉलीवूडसाठी संमिश्र होतं. एकूण मिळून हजार एक चित्रपट तयार होणाऱ्या या इंडस्ट्रीमध्ये केवळ 6 सिनेमांनाच सुपरहिटचं लेबल लागलं आहे. एकीकडे टॉलीवूड हे झुकेगा नही म्हणत बॉक्सऑफिसवर टोलेजंग इमारती बांधत आहे. तर दुसरीकडे बॉलीवूड सिनेमाला चांगल्या कंटेंट अभावी सिनेमा निदान हिट करण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागला. हे वास्तव आहे आणि ते आपल्याला नाकारता येणार नाही.
2024 बॉलीवूडमध्ये नायिकांची सरशी
‘हिरो’ हा बॉलीवूड सिनेमाचं यश ठरवण्यात इतकी वर्ष महत्वाचा फॅक्टर असायचा. पण, 2024 मध्ये मात्र हे चित्र बदललं. हे वर्षी ‘हिरोईन’चं होतं. वूमन एम्पॉवरमेन्ट गरजेचं आहे हे समस्त प्रेक्षकांना यावर्षी जाणवलं. ‘नायिका प्रधान’ सिनेमांना एकेकाळी मल्टिप्लेक्स मध्ये प्राईम टाईमचे ‘शोज्’ मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागायचा. 2024 मध्ये मात्र बॉलीवूडमधला हा बदल दर महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटातून जाणवला.
‘स्त्री 2’ मध्ये सिनेमाची नायिका श्रद्धा कपूरने, ‘भुलभुलैय्या 3’ मध्ये विद्या बालन, माधुरी दीक्षितने, ‘लापता लेडीज’ मधील दोन्ही नवख्या नायिकांनी आणि बाकी सिनेमांमध्ये तृप्ती डीमरी नावाच्या नव्या ‘नॅशनल क्रश’ने या सिनेमांना बॉक्स ऑफिसवर तारलं ही वस्तुस्थिती आहे.
2024 सिनेमामध्ये ‘खान’ कलाकारांची अनुपस्थिती
सुपरस्टार पद भुषवणाऱ्या तिन्ही खानांचा यावर्षी एकही सिनेमा प्रदर्शित झाला नाही. हे सुद्धा 2024 चं एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल. ज्यामुळे प्रेक्षकांनी कलाकारांच्या प्रेझेंसपेक्षा सिनेमाच्या कथानकाकडे झुकतं माप दिलं.
हिरोपेक्षा कथानक महत्वाचं
प्रेषकांना आता पठडीतल्या नायकापेक्षा खऱ्या आयुष्याला साजेसा असा वेगळा हिरो पाहिजे आहे. सिनेमाचा नायक हा केवळ एका फाईटने दहा लोकांना उडवणारा नको आहे किंवा प्रत्येक सिनेमात (आपलं वय झालेलं असलं तरीही) प्रेमाचा गुलाब घेऊन वावरणारा नको आहे. याचचं द्योतक म्हणजे राजकुमार राव यांचा ‘श्रीकांत’ सिनेमाला मिळालेलं यश. तसचं ‘बोलान्ट इंडस्ट्री’ चे संस्थापक श्रीकांत बोला जे की अंध आहेत, त्यांच्या आयुष्यावरील या अंध नायक असलेल्या सिनेमाला ही प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आहे.
सिनेमा री-रिलीचं वर्ष
या सरत्या वर्षात बॉलीवूडमध्ये आणखीन एक ट्रेंड पाहायला मिळाला तो म्हणजे सिनेमा रिलीजचा. हे तेच वर्ष होतं जेव्हा प्रेक्षकांना पुन्हा एकदा आपलं तारुण्य जगायचं होतं. अनेक प्रेषकांनी मल्टिप्लेक्समध्ये जाऊन ‘रहेना है तेरे दिल मे’, ‘करण अर्जुन’, ‘तुंबाड’, ‘रॉकस्टार’ या तत्कालिन हिट सिनेमा पाहण्याला पसंती दर्शवली.
हा री-रिलीचा ट्रेंड 2025 मध्ये सुद्धा सुरू राहिल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
20-30 वर्षांपूर्वीचे हे सिनेमे आज साधारणपणे चाळीशीत असणाऱ्या प्रेक्षकांनी परत एकदा आपल्या लाईफ पार्टनरसोबत मोठ्या पडद्यावर हे सिनेमा पाहिले. निर्मात्यांनी हे योग्यपणे हेरत आपला ‘नॉस्टॅल्जीया’ एन्कॅश केला.
सिनेमाचे सिक्वेल्सचं प्रेषकांसाठी पर्वणी
नवीन कथांचं स्वागत करताना प्रेक्षकांनी याही वर्षी अनेक सिनेमांच्या सिक्वेल्सचा मनमुराद आनंद लुटला. 2024च्या कोणत्याही हिट सिनेमाचं नाव घेतलं तर त्यासोबत एक आकडा जोडल्याचं आपल्या लक्षात येईल. स्त्री 2, भुलभुलैय्या 3 आणि दक्षिणेकडील कधीही न वाकणारं पुष्पा हे पात्र यावर्षी पुष्पा 2 च्या नावाने प्रेक्षकांसमोर आलं. या सिनेमाच्या सिक्वेलने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः वादळ आणलं. एखाद्या सिनेमाची इतकी ‘क्रेझ’ असू शकते हे सर्वांनी यावर्षी याची डोळा बघितलं.
पुष्पा 2 सिनेमाचे ऐतिहासीक रेकॉर्ड्स
डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या पुष्पा 2 या सिनेमाने एडव्हान्स बुकिंगचे सर्व रेकॉर्डस् नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीसचं मोडले होते. जगभरात मिळून 1700 कोटी आणि अजूनही उत्पन्न सुरूच असलेला हा सिनेमा भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी सिनेमा ठरला आहे. 300 कोटी इतकं मानधन घेणारा अल्लू अर्जुन हा आजवरचा सर्वात महागडा अभिनेता आहे हे देखील या वर्षानेच इंडस्ट्रीला दाखवून दिलं.
सिनेमांची चर्चा आणि व्यवसाय
पुष्पा 2 हा सिनेमा आवडलेले आणि न आवडलेले लोक जवळपास सारख्याच प्रमाणात असतील. पण, त्याचा फायदा हा सिनेमालाच झाला. कारण, कोणत्या न कोणत्या कारणांमुळे हा सिनेमा सतत चर्चेत राहिला.
सिनेमा हिट करण्यासाठी निर्मात्यांनी आपल्या सिनेमाची ‘हवा’ आहे का? हे तपासावं. सिनेमाच्या शूटींगपासूनच तुमच्या सिनेमाची चर्चा असेल तरच, तुमचा सिनेमा या भाऊगर्दीत तग धरून राहू शकतो हे यावर्षाने शिकवलं.
हाच ट्रेंड कायम ठेवत अमिताभ बच्चन यांची अश्वत्थामाची भूमिका असलेला कल्की 2898 एडी हा निर्मिती पासूनच चर्चेत राहिला. सिनेमाच्या रीलीजनंतर 1000 कोटींच्या पंगतीत जाऊन बसणारा हा दुसरा सिनेमा ठरला. ‘कल्की’ अवतार बद्दल सर्वांमध्ये एक उत्सुकता आहेच. ही उत्सुकता निर्मात्यांनी सिनेमाच्या शेवटच्या सीनपर्यंत ताणली. 800 वर्षानंतरच्या जगात तंत्रज्ञानाचा, एआयचा किती अतिरेक झालेला असणार हे या सिनेमात दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. सिनेमात आणि खऱ्या आयुष्यातही सिनेमाच्या चित्रीकरणाच्या वेळी गरोदर असलेल्या दीपिका पदुकोणचं देखील या सिनेमासाठी, त्याच्या प्रमोशनसाठी तिने दिलेल्या वेळेसाठी खूप कौतुक झालं होतं.
बॉलीवूडमधले सुपरहिट सिनेमा
स्त्री 2 ने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत जगभरात मिळून 875 कोटींची कमाई केली. श्रद्धा कपूर, राजकुमार राव यांच्या आजवरच्या करिअर मधील हा सर्वात मोठा हिट सिनेमा ठरला. पंकज त्रिपाठी यांची सहकलाकार म्हणून असलेली भूमिका देखील प्रेक्षकांना खूप आवडली. तमन्ना भाटियाचं ‘आज की रात’ हे आयटम सॉंग हे या सिनेमासाठी गेम चेंजर ठरलं. राजस्थान मधील छोट्या गावातील या काल्पनिक कथा असलेल्या या सिनेमाला हिट ते सुपरहिटचा रस्ता हा या गाण्याने पार करून दिला आणि ऑगस्ट महिन्यात बॉलीवूडला 2024 चा पहिला सुपरहिट सिनेमा मिळाला.
भुलभुलैय्या 3 ने या खालोखाल 400 कोटींचा टप्पा पार करत बॉलीवूड सिनेमा आणि विशेषतः सिंगल स्क्रीन थिएटर मालकांना पुन्हा एकदा सुगीचे दिवस आणले. ‘सिंघम अगेन’ म्हणजेच ‘सिंघम’ या फ्रॅंचायझीचा तिसरा भाग हा देखील बॉक्स ऑफिसवर 400 कोटींच्या आसपास कमाई करण्यात यशस्वी ठरला. अजय देवगण, करीना कपूर, अर्जुन कपूर, टायगर श्रॉफ आणि इतर पाहुणे कलाकारांमध्ये अर्ध्या बॉलीवूडचा समावेश असलेल्या या सिनेमाला समीक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. पण, प्रेक्षकांनी मात्र दिवाळीच्या सुट्टीत हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन सहकुटुंब बघण्याचे प्लॅन्स केले आणि वर्षाच्या अखेरीस बॉलीवूडला आपल्या हक्काचे दोन सुपरहिट सिनेमे मिळवून दिले.
‘फायटर’ या ऋतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर यांची प्रमुख भूमिका असलेल्या सिनेमाने देखील संमिश्र प्रतिक्रिया मिळवत कमाईच्या बाबतीत 300 कोटींचा आकडा पार केला. देशभक्ती, पाकिस्तानी अतिरेक्याला मारण्यासाठी केलेला सर्जिकल स्ट्राईक, ऋतिक आणि दीपिका यांची फ्रेश पेयरिंग, वर्षागणिक तरुण होत चाललेला अनिल कपूर यामुळे सिनेमाला चांगली ओपनिंग मिळाली. पण, काही दृष्यांमध्ये दाखवलेल्या अतिशयोक्तीची अतिशयोक्तीने या सिनेमाच्या कलेक्शनला ब्रेक लागला आणि तो केवळ एक हिट म्हणून गणला गेला.
दक्षिणेकडील सुपरहिट सिनेमा
बॉलीवूड सिनेमा व्यतिरिक्त सांगायचं झालं तर, दक्षिणेकडील देवरा पार्ट 1, आमरण आणि हनुमान या हिंदी डब सिनेमांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली. देवरा मधील ज्युनिअर एनटीआर आणि जान्हवी कपूर यांच्यातली गाण्यातून दिसलेली केमिस्ट्री ही प्रेक्षकांना खूप आवडली. ‘आमरण’ ही एका सैनिकाच्या आयुष्यावरील कथा देखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. तसंच, दक्षिणेत निर्मिती झालेल्या हनुमान हा सिनेमा देखील हिंदी प्रेक्षकांना आपल्या कथानकाकडे आकर्षित करण्यात यशस्वी ठरला. कथानक संथ असलेल्या या सिनेमासाठी नव्या चालीतली ‘हनुमान चालीसा’ ही सिनेमाची युएसपी ठरली.
2025 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या हनुमान 2 मध्ये कांतारा फेम रिषभ शेट्टी हा मुख्य भूमिका निभावणार असल्याने त्याची प्रेक्षकांमध्ये आत्तापासूनच उत्सुकता आहे. दक्षिणेकडील या तिन्ही सिनेमांनी देशभरात मिळून 300 कोटींचा आकडा पार केला आहे.
2025 मध्ये देखील बॉलीवूड आणि दक्षिणेकडील सिनेमा हा प्रेक्षकांचं असंच मनोरंजन करेल अशी आशा करूयात. 2025 मध्ये कोणते प्रमुख सिनेमा आपल्या समोर सादर होतील ? याबद्दल पुढील लेखात जाणून घेऊयात.