एआय चॅटबोट चॅटजीपीटीने 25 मार्च 2025 रोजी जीपीटी 40 मॉडेल विकसीत केलं. या मॉडेलमध्ये एआयच्या मदतीने घिबली या ॲनिमेशन पद्धतीसारखे फोटो तयार करता येतात. या अपडेटेड व्हर्जनमध्ये वापरकर्त्यांना अचूक, तंतोतंत फोटो मिळतो. हे नवीन फीचर येताच अनेक वापरकर्त्यांनी आपले फोटो या घिबली पद्धतीने बदलून घेत या फीचरचा आनंद घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा हा मोह आवरला नाही. त्यांनीही त्यांच्या कुटुंबियांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत असलेला फोटो या घिबली स्टाईलमध्ये करुन घेत तो एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट केला आहे. तर जाणून घेऊयात ही घिबली स्टाईल नेमकी काय आहे?
स्टुडिओ घिबली नेमकं काय आहे?
स्टुडिओ घिबली हा जपानमधील ॲनिमेशन स्टुडिओ आहे. 1985 साली सुप्रसिद्ध ॲनिमेटर्स हायओ मियाझाकी, दिग्दर्शक इसाओ ताकाहाता आणि निर्माते तोषिओ सुझुकी यांनी हा स्टुडिओ सुरू केला होता. घिबली ॲनिमेशन तंत्रामध्ये हातांनी रेखाटलेल्या चित्रांच्या खऱ्या भासतील अशा फ्रेम्स असतात. या चित्रामध्ये विविध ॲक्रेलिक रंगांचा वापर केला जातो. अशा पद्धतीने चित्रांची निर्मिती करुन सिनेमा तयार केला जात असे. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कम्प्युटरचा वापर कमी केला जायचा.
घिबलीचा नेमका अर्थ काय?
घिबली हा इटालियन शब्द आहे. याचा अर्थ ‘वाळवंटातून वाहणारे तप्त वारे’ असा आहे. जागतिक महायुद्ध 2 मध्ये इटलीने वापरलेल्या लढाई विमानाचं नाव घिबली असं होतं. मियाझाकी यांना इटलीविषयी असलेलं प्रेम आणि विमानांची आवड यामुळे त्यांनी त्यांच्या स्टुडिओला घिबली हेच नाव दिलं.
घिबली ॲनिमेटेड सिनेमाचे विषय
या ॲनिमेशन तंत्रामध्ये निर्मिती केलेल्या सिनेमांमधून थोड्या कठीण पद्धतीने कथा प्रेक्षकांसमोर सादर केली जायची. या सिनेमांमधून अतुलनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचे पात्र दाखवण्यावर अधिक भर असे. स्त्रीवाद, पर्यावरणवादी, विकासात्मक, कौटुंबिक आणि युद्धाचा तिटकारा अशा विषयांवर आधारित हे सिनेमा आहेत.
या स्टुडिओमधून तयार केलेले स्पिरीटेड अवे (2001) आणि द बॉय ॲन्ड ह हेरॉन (2023) या दोन सिनेमांना अकादमी ॲवॉर्डकडून बेस्ट ॲनिमेटेड फीचर पुरस्कार मिळालेला आहे. तर पाच सिनेमे हे ऑस्करसाठी नामांकित केले होते. आतापर्यंत या स्टुडिओमधून 25 सिनेमे (निर्मिती आणि ॲनिमेशन), टिव्ही सिरीयल्स, जाहिराती, लघुचित्रपट आणि व्हिडीओ गेम्स तयार केले आहेत.
घिबली तंत्राचे निर्माते हायओ मियाझाकी कोण होते?
हायओ मियाझाकी हे जपानचे ॲनिमेटर आणि सिनेमा निर्माते आहेत. स्टुडिओ घिबलीचा चेहरा म्हणूनच त्यांना जगभरात ओळखलं जातं. 2011 सालच्या जर्मनीच्या ‘देर स्पीगल’ या वृत्तपत्रामध्ये हायओ मियाझाकी यांना ‘आशियातील वॉल्ट डीस्ने’ आणि ‘जपानचे सगळ्यात प्रभावी वास्तववादी चित्रपट निर्माते’ म्हणून गौरविले आहे.
मियाझाकी यांचा जन्म 1941 साली टोकियो इथे झाला. दुसऱ्या महायुद्धाच्या झळा त्यांनाही बसल्या. या युद्धाच्या आठवणी त्यांनी त्यांच्या ‘स्टार्टिंग पॉइंट : 1979 ते 1996’ या पुस्तकात कथन केल्या आहेत. अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयात त्यांनी शिक्षण पूर्ण केलं आहे. 1963 मध्ये त्यांनी ॲनिमेशन क्षेत्रात पदार्पण केलं. मियाझाकी यांनी अनेक वर्ष घिबाली तंत्रामध्ये युद्ध सामुग्री जशी की, लढाऊ विमानं, लढाऊ जहाजं, रणगाडे आणि लोकांचे चित्रे काढण्याचा सराव केला. हीच चित्रे त्यांच्या सिनेमामधून आपल्याला पाहायला मिळतात. 2014 मध्ये, मियाझाकी यांना अकादमीच्या गव्हर्नर्स अवॉर्ड्समध्ये मानद पुरस्कार दिला होता.
चॅट जीपीटीच्या नवीन फीचरवर मियाझाकी यांचं काय मत आहे?
कलाकृती निर्मितीसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर मियाझाकी यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. ते म्हणतात की, “ एआयच्या मदतीने कलाकृती घडवणे हा आपल्या आयुष्याचाच अपमान करण्याजोगं आहे. एआयच्या माध्यमातून तयार केलेल्या इमेजमधील नृत्याच्या अदा किंवा सादरीकरण हे खूप विचित्र स्वरूपातल्या आहेत. अशा पद्धतीचं नृत्य माणसं कधी करत नाहीत. त्यामुळे अशा एआय जनरेटेड कलाकृती पाहायला आवडणार नाहीत. जर तुम्हाला अशीच विचित्र, घाणेरडी कलाकृती घडवायची असेल तर, एआयच्या वापराच्या पलिकडे जाऊन तुम्ही तशी घडवू शकता. मी माझ्या कलेच्या क्षेत्रात अशा पद्धतीच्या तंत्रज्ञानाचं स्वागत करणार नाही. यामुळे आपण आयुष्याचा अपमान करत आहोत असं मला वाटतं.”
एआयचा विकास
एआय तंत्रज्ञानाचा झपाट्याने होणारा विकास पाहता, कलाकृतीतील सर्जनशीलता आणि मालकी यासारखे प्रश्न येत्या काळात निर्माण होऊ शकतात. कारण मियाझाकी यांनी ‘घिबली’ ही स्टुडिओ घिबलीकरता विकसीत केलेली स्टाईल आहे. या ॲनिमेशन पद्धतीचा एआय आता वापर करत आहे. आणि चॅट जीपीटीच्या माध्यमातून असंख्य लोकं आता या पद्धतीने कलाकृती घडवतील. त्यामुळे या कलाकृतीच्या तंत्राच्या मालकीचा प्रश्न उभा राहू शकतो.