इ.स. 1579 साली, थॉमस स्टीफन्स, तरुण जेझुइट पाद्री, ख्रिस्ती धर्माचा प्रचार करण्याच्या उद्देशाने पोर्तुगीज वसाहतीतील गोव्याच्या किनाऱ्यावर उतरले. त्यावेळी मात्र त्यांना हे माहीत नव्हते की, पुढील चार दशकांतच ते ‘मराठी भाषेचे भक्त’ म्हणून ओळखले जातील. आणि स्थानिक प्रदेशातील संत-कविंच्या शैलीला अनुसरून ख्रिस्ती काव्याची रचना करतील. स्टीफन्स त्यांनी लिहिलेल्या ‘ख्रिस्तपुराण’ काव्यासाठी विशेष प्रसिद्ध आहेत. हे ख्रिस्तपुराण म्हणजे बायबलमधील कथानकाचे मराठीतील पुनर्कथन.
1579 मध्ये गोव्यात आगमन
थॉमस स्टीफन्स यांचा जन्म इ.स. 1549 मध्ये इंग्लंडमधील विल्टशायर प्रांतातील सॉलिसबरी धर्मप्रदेशातील बुश्टन येथे झाला. त्यांचे वडील, थॉमस स्टीफन्स लंडनमधील एक सधन व्यापारी होते. स्टीफन्सच्या बालपणाविषयी व शिक्षणाबाबत फारशी माहिती उपलब्ध नाही. रोममध्ये पाद्री बनण्याचे प्रशिक्षण घेतल्यानंतर 4 एप्रिल 1579 रोजी त्यांनी S. Lorenzo नावाच्या जहाजातून भारतासाठी प्रस्थान केले आणि 24 ऑक्टोबर 1579 रोजी गोव्यात पोहोचले. त्याकाळातील पोर्तुगीज वसाहतीत स्टीफन्स एकमेव इंग्रज जेझुइट होते.
थॉमस स्टीफन्स लिखित कोंकणी व्याकरणग्रंथ भारतातील आधुनिक भाषेतील पहिला व्याकरणग्रंथ

गोव्यात आल्यावर स्थानिक संस्कृती समजून घेण्यासाठी स्टीफन्स यांनी लगेच स्थानिक भाषा शिकायला सुरुवात केली आणि लवकरच ती चर्चच्या व्यवहारातही आणली. थॉमस स्टीफन्स, त्यांनी लिहिलेल्या ‘आर्ते दा लिंग्वा कानारीम’ (Arte da Lingua Canarim) या कोंकणी भाषेच्या व्याकरणग्रंथासाठी ओळखले जातात. या व्याकरणग्रंथामुळे, व्याकरण लिखित स्वरूपात संकलित झालेली, कोंकणी आधुनिक भारतीय भाषांपैकी पहिली भाषा ठरली. आजही त्याच्या सन्मानार्थ थॉमस स्टीफन्स कोंकणी केंद्र नावाची संस्था गोव्यात कोंकणी भाषा आणि संस्कृतीच्या अभ्यासासाठी कार्यरत आहे.
ख्रिस्ती धर्मप्रसारासाठी भारतीय परंपरांचा स्वीकार
जेझुइट थॉमस स्टीफन्स जेव्हा भारतात आले तेव्हा पुराणांना स्थानिक हिंदु धर्मात असलेले महत्व त्यांच्या लक्षात आले. पुराणे मुख्यत्वेकरून धर्माच्या अनुषंगाने इतिहास, पूजापध्द्ती, आचार, विचार, मिथककथा यावर भाष्य करतात हे त्यांनी जाणले. त्याकाळात अनेक पारंपरिक संस्कृत पुराणांचे प्रादेशिक भाषांत भाषांतर झाले होते. अशाच काही मराठी भाषेतील पुराणाचा स्टीफन्स यांचा परिचय झाला. ख्रिस्ती धर्माचा प्रचार करण्यासाठी त्यांनी या प्रस्थापित भारतीय परंपरेचा स्वीकार करण्याचे ठरवले. पुढील काळात त्यांनी येशू ख्रिस्ताची कथा पुराणाच्या स्वरूपात आणली.
पैल्लें पुराण आणि दुस्सरें पुराण

थॉमस स्टीफन्स यांनी काव्यात्म रीतीने स्थानिक शैलीचा वापर करित पुन्हा एकदा बायबलकथा लिहिली. त्यात त्यांनी सृष्टीच्या निर्मितीपासून ते येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थान व स्वर्गारोहणापर्यंतचा प्रवास सांगितला. पुराणांचा पगडा त्यांच्यावर होताच. त्यामुळे स्टीफन्स यांनी स्वतः आपल्या रचनेला “पुराण” असे संबोधले. ख्रिस्तपुराणात पौराणिक शैलीचा वापर करून एकूण 10,962 ओव्या मराठी भाषेत आणि रोमन लिपीत रचल्या आहेत. त्याचे दोन भाग आहेत. पैल्लें पुराण आणि दुस्सरें पुराण. पैल्लें पुराणामध्ये 36 अध्याय असून त्यातील कथाभाग बायबलमधील ओल्ड टेस्टामेंटमधील कथांशी साधर्म्य दर्शवतो. तर 59 अध्यायांमध्ये रचलेले दुस्सरें पुराण बायबलमधील न्यू टेस्टामेंटमधील कथाभागावर आधारित आहे.
भारताच्या मुद्रण-इतिहासातील महत्त्वाचा टप्पा

इ.स. 1616 मध्ये गोव्यातील राचोळी येथे “Discurso Sobre a Vinda de Jesu Christo Nosso Salvador ao Mundo” या शीर्षकाखाली ख्रिस्त पुराण मराठी भाषेत आणि रोमन लिपीत, प्रकाशित झाले. राचोळी येथील छापखाना, जिथे ख्रिस्तपुराण छापले गेले भारताच्या मुद्रण-इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरतो. आजही राचोळी सेमिनरीच्या जुन्या इमारती उभ्या आहेत. केवळ एक काल्पनिक चित्र आणि ख्रिस्तपुराणाच्या आधुनिक प्रती या रूपात थॉमस स्टीफन्स यांची स्मृती जपली गेली आहे. या मूळ प्रकाशित झालेल्या प्रतींपैकी एकही प्रत उपलब्ध नाहीत. नंतरच्या काळात ख्रिस्तपुराण पुनर्मुद्रित आणि प्रसिध्द झाले. गोव्यातील स्थानिक ख्रिश्चन लोकांनी ख्रिस्तपुराणाच्या प्रती तयार केल्या. काही प्रतींमध्ये चित्रेही घातली गेली. मूळ जुन्या प्रती सध्या उपलब्ध नाहीत.
हस्तलिखित गोवा आणि ब्रिटिश लायब्ररीत

ख्रिस्तपुराणाची हस्तलिखिते पणजीतील कृष्णदास शामा गोवा राज्य मध्यवर्ती ग्रंथालय व गोवा विद्यापीठाच्या ग्रंथालयात पाहायला मिळतात. थॉमस स्टीफन्स कोंकणी केंद्र, आल्तो पोर्वोरिम, गोवा येथील एम. सी. सालदान्हा हस्तलिखित जे. एल. सालदान्हा यांनी 1907 मध्ये तयार केलेल्या आवृत्तीत वापरलेल्या पाच हस्तलिखितांपैकी एक असण्याची शक्यता आहे. श्री. एम. सालधाना यांनी ती प्रत ब्रिटिश लायब्ररीला भेट दिली. सध्या ती प्रत ब्रिटिश लायब्ररीच्या Endangered Archives प्रकल्पाच्या अंतर्गत डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहेत.
300 पानी कोंकणी प्रस्तावना
ख्रिस्तस्तपुराणाची तीन पूर्ण भाषांतरे अस्तित्वात आहेत – इंग्रजी, आधुनिक मराठी आणि कोकणी. इंग्रजी व मराठी अनुवाद ख्रिस्तपुराणाच्या प्रसारासाठी दीर्घ काळ कार्यरत असलेल्या फाल्काओ नावाच्या सेल्सियन पाद्री अभ्यासकाने केले आहेत. सुरेश आमोणकर यांचे कोकणी भाषांतर 2017 मध्ये प्रसिद्ध झाले. त्यांनी रोमन लिपीतील मजकूर नव्याने देवनागरी लिपीत रूपांतर करून कोकणी भाषेत अनुवाद केला. या अनुवादासोबत एक 300 पानी प्रस्तावना (गोयेंचे सांसारिकीकरण) स्वतंत्र खंड म्हणून प्रकाशित केली आहे.
नवख्रिस्त्यांना केंद्रित करून बायबलमधील प्रसंग
ख्रिस्तपुराणात स्टीफन्स यांनी गोव्यातील नवख्रिस्त्यांना केंद्रित करून बायबलमधील प्रसंग सांगितले आहेत. यामुळे मूळच्या ख्रिस्ती कथेला स्थानिक रंग आणि सोंग मिळाले. साहित्यिक इतिहासकार ए.के. प्रिओलकर (1895–1973) यांच्या मते, थॉमस स्टीफन्स यांना “मराठी साहित्यात अजरामर स्थान” मिळाले आहे, याचे कारण म्हणजे बायबलच्या कथांचे त्यांनी मराठीत केलेले हे शास्त्रीय काव्यमय सादरीकरण. गोव्यात स्टीफन्स विविध नावांनी ओळखले गेले. त्यांच्या काव्यग्रंथ ‘ख्रिस्तपुराण’चा लेखक म्हणून त्यांचे नाव ‘थोमस एस्तेव्हा’ (Thomas Estevão) असे छापले गेले.
हेही वाचा – गणपती आणि त्याच्या पत्नी
मराठी साहित्यातील अमूल्य साहित्य
1619 साली, ख्रिस्तपुराण प्रकाशित झाल्यानंतर तीन वर्षांनी, थॉमस स्टीफन्स यांचे गोव्यात निधन झाले. त्यांच्या योगदानामुळे मराठी आणि कोकणी भाषेतील धार्मिक साहित्याला नवे रूप आणि समृद्धी मिळाली. आयाम अशाप्रकारे ख्रिस्ती धर्मकथेला भारतीय पौराणिक परंपरेची स्थानीय रंगछटा देण्यात आली. त्यामुळे ख्रिस्तपुराण केवळ एक धर्मग्रंथ न राहता, मराठी साहित्यात अमूल्य साहित्यिक योगदान ठरले.
हेही वाचा – ‘पैठणी वस्त्रा’ पलीकडचे पैठण
ख्रिस्तपुराणातील निवडक 25 ओव्या ‘ख्याल’ शैलीत
गोव्यातील गेल्या चार शतकांतील ख्रिस्तीधर्माच्या प्रवासात ख्रिस्तपुराण ग्रंथाचा प्रदर्शनात्मक (performative) पैलू हरवलेला आहे. सध्या गोव्यातील कोणत्याही चर्चमध्ये ख्रिस्तपुराणातील ओव्या गाण्याची प्रथा नाही. फादर ग्लेन डी’सिल्वा भारतीय शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षित गायक आहेत. त्यांनी ख्रिस्तपुराणातील निवडक 25 ओव्या ‘ख्याल’ शैलीत सादर केल्या होत्या.
अशा प्रकारे, ख्रिस्तपुराण लोकांच्या सांस्कृतिक स्मृतीत, मराठी-कोकणी साहित्येतिहासात, आधुनिक भाषांतरे व सादरीकरणांमधून आजही जतन केले गेले आहे.