भारतात महिलांच्या सशक्तीकरणासाठी अनेक उपक्रम सुरू होत आहेत. त्यातच, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महिलांना अधिक संधी मिळवून देण्यासाठी कीर्तिगा रेड्डी यांनी महत्वाचं पाऊल टाकलं आहे. कीर्तिगा या पूर्वी फेसबुक इंडियाच्या प्रमुख होत्या. त्यांनी आता ‘एआय किरण’ नावाचा एक नवीन प्लॅटफॉर्म सुरू केला आहे.
या प्लॅटफॉर्मचा उद्देश भारतीय महिलांना एआय क्षेत्रात अधिक सक्षम बनवणे आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे महिलांना एआय विषयी शिकवले जाईल. त्यांना या क्षेत्रात करियर करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन आणि मदत या प्लॅटफॉर्मद्वारे मिळेल.
कीर्तिगा रेड्डी यांचे उद्दिष्ट
कीर्तिगा रेड्डी यांच्यानुसार, “भारतीय एआय बाजारपेठेची किंमत 2027 पर्यंत $17 अब्ज डॉलर्स होऊ शकते. आणि या बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या जगात महिलांचे योगदान महत्त्वाचे असेल.” त्या म्हणाल्या, “भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान (STEM) शिक्षणात मुलींची संख्या मुलांपेक्षा जास्त असली तरी, एआय क्षेत्रात महिलांची संख्या खूप कमी आहे.” या समस्येवर मात करण्यासाठी त्यांनी ‘एआय किरण’ सुरू केला आहे.
‘एआय किरण’ प्लॅटफॉर्म महिलांना एआय क्षेत्रात प्रशिक्षण देईल. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी मिळवून देईल. या प्लॅटफॉर्ममार्फत महिलांना शिक्षण, मार्गदर्शन, ब्रँडिंगसाठी मदत, महत्त्वाचे कार्यक्रम अशा सर्व गोष्टींसाठी संधी मिळेल.
कोण आहेत कीर्तिगा रेड्डी ?
कीर्तिगा रेड्डी या एक अत्यंत यशस्वी भारतीय-अमेरिकन व्यावसायिका आहेत. त्यांचा जन्म चेन्नईमध्ये झाला. त्यांचे वडील सरकारी नोकरीत होते. मध्यमवर्गीय कुटुंबातील कीर्तिगा यांनी नांदेडमधील एमजीएम कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये अभियांत्रिकीची पदवी घेतली.
अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर, रेड्डी त्यांच्या आई-वडिलांसोबत नागपूरला गेल्या. तिथे त्यांनी प्रसिद्ध कॉम्प्युटर वैज्ञानिक यशवंत कानिटकर यांच्यासोबत काही काळ काम केले. कानिटकर यांच्या पुस्तकांमधील प्रोग्रामिंगच्या उदाहरणांमधील महत्त्वाच्या गोष्टी त्या सोप्या पद्धतीने समजावून सांगायच्या.
यानंतर कीर्तिगा अमेरिकेला गेल्या. तिथं त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एमबीए (MBA) आणि सिरॅक्यूज विद्यापीठातून कॉम्प्युटर इंजिनीअरिंगमध्ये एम.एस. (M.S.) ही पदवी घेतली.
कीर्तिगा रेड्डी यांचा करियरचा मार्ग
कीर्तिगा रेड्डी यांनी मोटोरोला, सिलिकॉन ग्राफिक्स यांसारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये उच्च पदांवर काम केले. सॉफ्टबँकच्या $100 अब्ज डॉलर्सच्या ‘व्हिजन फंड’साठी त्या पहिल्या महिला गुंतवणूकदार होत्या.
2010 मध्ये त्या भारतात फेसबुकच्या पहिल्या कर्मचारी म्हणून रुजू झाल्या. त्यांनी फेसबुक इंडिया आणि दक्षिण आशियाच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून 6 वर्षे काम केले. याशिवाय, त्या स्टॅनफोर्ड बिझनेस स्कूलच्या व्यवस्थापन मंडळाच्या अध्यक्षपदावरही कार्यरत होत्या
एआय किरण’ – महिलांसाठी एक सशक्त प्लॅटफॉर्म
‘एआय किरण’ या प्लॅटफॉर्मचा उद्देश महिलांना AI क्षेत्रातील नव्या संधी मिळवून देणे आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे महिलांना AI शिकवण्यासाठी विविध कार्यक्रम आणि कार्यशाळा आयोजित केल्या जातील. तसेच AI क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी मार्गदर्शन मिळेल.
या प्लॅटफॉर्मची सुरुवात 21 एप्रिल 2025 रोजी, संयुक्त राष्ट्रांच्या (UN) निर्मिती आणि नवकल्पना दिनी झाली. यावेळी कीर्तिगा रेड्डी यांनी ‘एआय किरण’ च्या ध्येयाविषयी सांगितले की, “यामुळे महिलांना एकत्र येण्याची, शिकण्याची, आणि स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी मिळेल.”
‘एआय किरण’ला मिळालेला पाठिंबा
‘एआय किरण’ प्लॅटफॉर्मला विविध महत्त्वाच्या संस्थांचा पाठिंबा मिळाला आहे. भारत सरकारच्या मुख्य वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाने या उपक्रमाला सहकार्य केले आहे. त्याचबरोबर ‘इंक वुमन’ ‘नैसकॉम’ ‘100 गिगा’ , ‘अस्पायर फॉर हर’, ‘उदैती फाउंडेशन’ , ‘ युथ की आवाज ‘ आणि ‘कार्य’ यांसारख्या संस्थांनी ‘एआय किरण’ला मदत केली आहे.
कीर्तिगा रेड्डी यांच्या या उपक्रमामुळे भारतीय महिलांना AI क्षेत्रात मोठ्या संधी मिळवता येतील. या प्रकल्पाद्वारे महिलांना AI मध्ये करियर करण्याची संधी मिळेल. महिला तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अधिक प्रभावीपणे काम करू शकतील आणि त्यांच्या कार्यक्षेत्रातील सीमारेषा ओलांडू शकतील.
कीर्तिगा रेड्डी यांचा उद्देश केवळ भारतातच नव्हे, तर जागतिक पातळीवर महिलांना त्यांच्या कामामुळे ओळख मिळवून देण्याचा आहे. AI क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी ‘एआय किरण’ एक महत्त्वाची पाऊल ठरू शकतो.
 
				 
											 
								 
								 
								


