तमिळनाडू सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता राज्यात कच्च्या अंड्यांपासून तयार होणाऱ्या मेयोनीजच्या उत्पादन, साठवणूक, विक्री आणि वितरणावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी 8 एप्रिल 2025 पासून लागू करण्यात आली आहे. आणि पुढील एका वर्षासाठी हे लागू असणार आहे.
सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. कच्च्या अंड्यांमुळे होणारी अन्न विषबाधा, विशेषतः साल्मोनेला आणि ई. कोलाईसारख्या जीवाणूंमुळे होणारा संसर्ग, यामुळे ही बंदी महत्वाची ठरली आहे.
कच्च्या अंड्यांचा धोका का?
पारंपरिक मेयोनीज तयार करताना तेल, अंड्याचा पिवळा भाग आणि व्हिनेगर किंवा लिंबाचा रस वापरला जातो. यामध्ये अंड्यातील प्रथिने इमल्सीफायर म्हणून काम करतात. पण ही प्रक्रिया गरम न करता केली जाते. त्यामुळे अंड्यातील धोकादायक बॅक्टेरिया नष्ट होत नाहीत.
राज्याच्या अन्न सुरक्षा विभागानुसार, कच्च्या अंड्यांमध्ये ‘साल्मोनेला’ हा जीवाणू असण्याचा धोका अधिक असतो. एकदा का हे बॅक्टेरिया शरीरात गेले की पोटदुखी, उलट्या, जुलाब आणि तापासारखे त्रास निर्माण करतात. काहीवेळा ही लक्षणे अधिक गंभीर होऊ शकतात यामुळे रुग्णालयात दाखल होण्याची गरजही भासू शकते.
तामिळनाडूसारख्या उष्ण आणि दमट हवामान असलेल्या राज्यात अन्न साठवून ठेवताना विशेष काळजी घेणे आवश्यक असते. अशा हवामानात कच्च्या अंड्यांपासून बनवलेले मेयोनीज जर योग्य तापमानात ठेवले नाही, तर त्यात सूक्ष्मजंतू झपाट्याने वाढतात. त्यामुळे अशा अन्नपदार्थांचा वापर अत्यंत धोकादायक ठरतो.
हे ही वाचा : व्हे प्रोटीन – तरुणांच्या फिटनेसची खरी गरज का?
ही बंदी कोणत्या प्रकारच्या मेयोनीजवर लागू आहे?
अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की ही बंदी फक्त कच्च्या अंड्यांपासून बनवलेल्या मेयोनीजवर लागू आहे. पाश्चराईज्ड अंड्यांपासून बनवलेले मेयोनीज व शाकाहारी मेयोनीज (व्हेज) यावर ही बंदी नाही. अंड्याचं पाश्चरायझेशन करताना अंड्यांना विशिष्ट तापमानावर गरम केले जाते, त्यामुळे त्यातील हानिकारक बॅक्टेरिया नष्ट होतात.
एफएसएस प्रा. लि.च्या व्यवस्थापकीय संचालक ए. जी. सरन्यायाधीश गायत्री यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्या म्हणाल्या की, “कच्चं अंडं लवकर खराब होतं. जर अंडं फुटल्यानंतर ते 20 मिनिटांत वापरलं नाही, तर ते धोकादायक ठरू शकतं. मेयोनीजमध्ये गरम करण्याची प्रक्रिया नसल्यामुळे त्यात बॅक्टेरिया वाढण्याचा धोका अधिक असतो.”
राजीव गांधी सरकारी रुग्णालयाच्या आहारतज्ज्ञ के. कालाराणी यांनीही या निर्णयाचं समर्थन केलं. त्या म्हणाल्या की “कच्च्या अंड्यांचा वापर अस्वच्छ ठिकाणी झाला, तर त्यातून सूक्ष्मजंतूंचा संसर्ग होण्याची शक्यता वाढते,”.
तसंच , रस्त्यावर मिळणाऱ्या बर्गर, शोरमामध्ये वापरलं जाणारं मेयोनीज बऱ्याच वेळा खराब असतं. त्यामुळे जंक फूडमुळे अन्न विषबाधेचे प्रमाण वाढले आहे.
इतर राज्यांनी काय केलं ?
तामिळनाडू राज्य हे अशा प्रकारची बंदी करणारे भारतातील तिसरे राज्य आहे. यापूर्वी केरळ आणि तेलंगणानेही कच्च्या अंड्यांच्या मेयोनीजवर बंदी घातली होती.
हे ही वाचा : व्हे प्रोटीनचे पर्याय आणि नैसर्गिक प्रोटीन स्रोत
मेयोनीज व्यवसायिकांना आता पर्याय काय ?
या बंदीमुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि स्ट्रीट फूड विक्रेत्यांना आता अंडी नसलेले किंवा पाश्चराईज्ड अंडी वापरून तयार केलेले मेयोनीज वापरावे लागेल. भारतात शाकाहारी मेयोनीजला आधीच चांगली मागणी आहे, पण अंड्याचे मेयोनीज वापरणाऱ्या व्यावसायिकांना आता त्यांच्या स्ट्रॅटेजीमध्ये बदल करावा लागणार आहे.
या निर्णयामुळे ग्राहकांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होईल असं सांगितलं जातंय. पण या संदर्भात अधिक माहिती व जनजागृती होणं देखील आवश्यक आहे.