तुम्ही ‘ई-पासपोर्ट’बद्दल ऐकलं आहे का? भारत सरकारने आता देशातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची आणि आधुनिक सुविधा सुरू केली आहे. ती म्हणजे ‘ई-पासपोर्ट’. या नवीन पासपोर्टमध्ये एक छोटी इलेक्ट्रॉनिक चिप बसवली जाते. जी पासपोर्ट धारकाची संपूर्ण माहिती सुरक्षितपणे साठवून ठेवते.
ई-पासपोर्ट म्हणजे काय?
ई-पासपोर्ट हा नेहमीच्या पासपोर्टसारखाच दिसतो, पण त्यात एक RFID चिप असते. ही चिप पासपोर्टच्या पहिल्या पानावर असते आणि त्यावर एक छोटेसे सोन्यासारखे चिन्ह दिसते. हे चिन्ह पाहून तुम्ही लगेच ओळखू शकता की हा ई-पासपोर्ट आहे.
या चिपमध्ये तुमचं नाव, जन्मतारीख, पासपोर्ट नंबर, फोटो, सही आणि काही बायोमेट्रिक माहिती म्हणजेच बोटांचे ठसे व चेहरा यांची माहिती साठवलेली असते. आणि ही चिप फक्त अधिकृत यंत्रांद्वारेच वाचता येते त्यामुळे तुमची माहिती अधिक सुरक्षित असणार आहे.
भारत आता 120 हून अधिक देशांमध्ये सामील
ई-पासपोर्ट तंत्रज्ञान आधीच अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, जपान, ऑस्ट्रेलिया यांसारख्या 120 पेक्षा जास्त देशांमध्ये वापरात आहे. भारताने आता हे तंत्रज्ञान भारतात आणून या यादीत आपली जागा मिळवली आहे.
भारत आता ICAO (International Civil Aviation Organization) या जागतिक संस्थेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आपली प्रणाली उभी करत आहे. ICAO ही संस्था जगभरातील हवाई प्रवासाच्या सुरक्षिततेसाठी नियम तयार करते.
सध्या भारतातील काही निवडक पासपोर्ट कार्यालयांमध्येच ई-पासपोर्ट दिले जात आहेत. हळूहळू ही सुविधा संपूर्ण देशभरात सुरु होईल. प्रत्येक ठिकाणी यासाठी लागणारी यंत्रणा बसवली जात आहे. या सुविधेचा लाभ तुम्हाला तुमचा पासपोर्ट रिन्यू करताना किंवा नवीन पासपोर्टसाठी अर्ज करताना मिळू शकतो.
जुना पासपोर्ट असलेल्यांनी काय करावं?
ज्यांच्याकडे सध्या जुना पासपोर्ट आहे, त्यांना घाबरण्याची किंवा लगेच ई-पासपोर्ट घेण्याची गरज नाही. भारत सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की जुने पासपोर्ट त्यांची वैधता संपेपर्यंत पूर्णपणे चालू राहतील. जेव्हा तुमचा पासपोर्ट रिन्यू करण्याची वेळ येईल, तेव्हा नवीन ई-पासपोर्ट दिला जाईल.
हेही वाचा : तुम्हांला भारतीय पासपोर्टच्या पांढऱ्या, लाल आणि निळ्या रंगांचा अर्थ माहीत आहे का?
ई-पासपोर्टचे फायदे काय?
ई-पासपोर्टमुळे प्रवास अधिक सुरक्षित आणि सोपा होणार आहे. पासपोर्ट वरील चिपमधील माहिती सुरक्षित असून त्यात फेरफार करणे खूप कठीण आहे. या चिपमुळे आता फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारांना पासपोर्टची नकल करता येणार नाही.
बायोमेट्रिक बोटांचे ठसे आणि चेहरा ओळख यांसारख्या माहितीमुळे पासपोर्ट धारकाची ओळख आता अचूकपणे पटवता येईल. तसेच ई-पासपोर्ट असलेले प्रवासी विमानतळांवर ‘ई-गेट्स’ मधून पटकन पुढे जाऊ शकतात.
ई-पासपोर्ट ICAO च्या नियमांनुसार तयार करण्यात आले असल्याने जगातील अनेक देशांमध्ये सहजपने त्याचा वापर करता येईल.
या तंत्रज्ञानामुळे भारत डिजिटल ओळख व्यवस्थापनात एक पाऊल पुढे टाकत आहे. यामुळे पासपोर्ट रिन्यू करणे किंवा त्यात बदल करणं अधिक सोपे आणि जलद होणार आहे. भारतात येणारे-जाणारे नागरिक कोण आहेत याची माहिती अधिक अचूकपणे लक्षात ठेवता येईल
भारताची ई-पासपोर्ट ही सुविधा देशाच्या सुरक्षिततेच्या आणि डिजिटल प्रगतीच्या दिशेने टाकलेले एक मोठं पाऊल आहे.