भारतीय हवाई दलामध्ये 30 मे 2022 रोजी एक ऐतिहासिक कामगिरीची नोंद झाली. एअर कमोडोर संजय शर्मा आणि त्यांची मुलगी फ्लाईंग ऑफिसर अनन्या शर्मा या बापलेकीच्या जोडीनं भारतीय वायूसेनेच्या इतिहासात पहिल्यांदा एकत्र फायटर जेट उडवलं.
त्यांनी भारतीय हवाई दलाच्या बीदर स्टेशनवर हॉक-132 एकाच इन-फार्मेशनमधून (In-Formation) लढाऊ विमानातून उड्डाण केलं. भारतीय हवाई दलाच्या इतिहासामध्ये याआधी कधीही वडील आणि मुलीने एकत्र फायटर जेट उडवलं नव्हतं.
अनन्याचं बालपण आणि स्वप्न
अनन्या लहान असताना आपल्या वडिलांना फायटर पायलटच्या कपड्यात पाहून ती स्वतः देखील हवाई दलात विमान चालवत असल्याची स्वप्न पाहायची. तिचं बालपण हवाई दलाच्या कँपमध्ये विमाने आणि देशभक्तीच्या वातावरणात गेलं. त्यामुळे तीने लहानपणापासूनच ठरवलं होतं आपल्यालाही बाबांसारखं पायलट व्हायचं आहे.
2016 मध्ये जेव्हा पहिल्यांदा महिला फायटर पायलट हवाई दलात रुजू झाल्या, तेव्हा अनन्याला कळलं की तिचं आयुष्यभराचं स्वप्न आता खरं होऊ शकतं. तिने इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये बी.टेक पूर्ण केल्यावर, तिची निवड हवाई दलाच्या ‘फ्लाइंग ब्रांच’साठी झाली आणि डिसेंबर 2021 मध्ये ती फायटर पायलट म्हणून हवाई दलात रुजू झाली.
संजय शर्मा हे 1989 मध्ये हवाई दलात फायटर पायलट म्हणून रुजू झाले होते. त्यांनी मिग-21 सारख्या लढाऊ विमानांचं नेतृत्व केलं असून, ते एका महत्त्वाच्या फायटर स्टेशनचे प्रमुखही राहिले आहेत. त्यांना फायटर पायलट म्हणून 30 वर्षांहून अधिक अनुभव आहे.
संजय शर्मा म्हणतात, “मी अनेक वेळा विविध पायलट्ससोबत उड्डाण केलं,पण जेव्हा माझ्या मुलीसोबत विमानात बसलो, तो क्षण माझ्यासाठी आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान होता.”
वडिलांच्या अनुभवातून अनन्याला खूप काही शिकायला मिळालं. ती म्हणते, “मी लहान असताना बाबांचे त्यांच्या
सहकाऱ्यां मधील घट्ट नातं पहायचे. ते सहकारी फक्त ऑफिसमधले नव्हते, तर मिशन पार्टनरही होते. आज मी ही बाबांसोबत एक मिशनची पार्टनर होते, माझासाठी हा अनुभव म्हणजे एखाद स्वप्नच होतं.
हॉक-132 विमानं ही प्रशिक्षणासाठी वापरली जातात, पण त्यांचं नियंत्रण, गती आणि क्षमता हे फायटर पायलटचं कौशल्य वाढवण्यासाठी फार महत्त्वाचं असतं.
संजय शर्मा आणि अनन्या शर्मा दोघांनी एकाच मोहिमेत, एकाच फॉर्मेशनमध्ये हे विमान उडवलं. या क्षणाचं वर्णन करताना अनन्या म्हणते, “बाबांसोबत आकाशात उडणं ही माझ्यासाठी सर्वात खास आणि भावनिक गोष्ट होती. आम्ही त्या वेळी फक्त वडील-मुलगी नव्हतो, तर एकमेकांचे मिशन पार्टनर होतो.”
संजय आणि अनन्या शर्मा यांची जोडी देशातील सर्व पालक आणि मुलांसाठी एक उत्तम उदाहरण आहे. आजही सोशल मीडियावर आणि देशभर त्यांच्या या ऐतिहासिक उड्डाणाची चर्चा होते.