दररोज आपल्या मोबाईलवर अनेक SMS येत असतात. कधी बँकेचे, कधी मित्रांचे, तर कधी जाहिरातींचे. पण बऱ्याचदा जाहिरातीचे स्पॅम मेसेज येतात किंवा फसवणुकीचा प्रयत्नही केला जातो. याच फेक कॉल्स आणि मेसेजेसना आळा घालण्यासाठी आणि तुमच्या मोबाईलवर येणारे मेसेज अधिक सुरक्षित करण्यासाठी, TRAI कडून महत्त्वाचे नियम जाहीर करण्यात आले आहेत. TRAI म्हणजेच टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया. चला, तर मग जाणून घेऊया हे नवीन नियम काय आहेत आणि ते आपल्याला कसे मदत करतील.
1. मेसेज पाठवणारा कोण हे कळणार
नवीन नियमानुसार जाहिरात, बँक किंवा सेवेसंबंधित मेसेज पाठवला गेला की तो कोणी किंवा कुठून पाठवला आहे आणि तो कोणापर्यंत पोहोचला, याची माहिती ठेवणे सर्व कंपन्यांना बंधनकारक आहे. यामुळे नको असलेले आणि फसवणुकीचे मेसेज कोण पाठवतंय, हे शोधून त्यांच्यावर कारवाई करणे सोपे होईल.
2. मेसेज पाठवणाऱ्याच्या नावापुढे खास अक्षर
TRAI मध्ये नोंदणी केलेल्या कंपन्या जेव्हा मेसेज पाठवतील, तेव्हा त्यांच्या नावापुढे काही खास अक्षर असेल जसं की,
-P म्हणजे जाहिरात (Promotional)
-S म्हणजे सेवा (Service)
-T म्हणजे बँकेसारखे व्यवहार (Transactional)
-G म्हणजे सरकारी मेसेज (Government)
या विशेष अक्षरामुळे आता तुम्हाला मेसेज कोणत्या प्रकारचा आहे, आणि तो कोणाकडून पाठवला आहे ते लगेच समजू शकेल.
3. लिंक्स आणि ॲप्सना परवानगी गरजेची
खूप वेळा मेसेजमध्ये वेगळ्या लिंक्स असतात किंवा ॲप डाउनलोड करण्याबद्दल माहिती दिलेली असते.पण या लिंकमध्ये व्हायरस असू शकतो किंवा फसवणूक, स्कॅम्ससाठी देखील अशा लिंक्सचा वापर केला जातो.
म्हणूनच TRAI च्या नव्या नियमांनुसार, कोणतीही वेबसाईट लिंक, OTT ॲप लिंक किंवा APK पाठवायची असल्यास कंपन्यांना आधी परवानगी घ्यावी लागेल. यामुळे धोकादायक लिंक्स किंवा व्हायरस असलेले ॲप्स तुमच्या फोनमध्ये येणार नाहीत.
4. DLT नियमांचं पालन
मेसेज पाठवणाऱ्या कंपन्यांना आता त्यांचे खास ओळखपत्र म्हणजे ‘PE ID आणि डीएलटी टेम्पलेट आयडी’ प्रत्येक मेसेजसोबत द्यावा लागेल.
PE ID – म्हणजे मेसेज पाठवणाऱ्या कंपनीचा नोंदणी क्रमांक
DLT Template ID – म्हणजे कंपनीला जो मेसेज पाठवायचा तो आधीच TRAI कडे मंजूर करून घेतलेला टेम्पलेट ID
यामुळे कोणताही बनावट किंवा खोटा मेसेज पाठवता येणार नाही.
5. नोंदणी नसलेल्या कंपन्यांवर कडक कारवाई
जर तुम्हाला एखाद्या अनोळखी किंवा नोंदणी नसलेल्या नंबरवरून सतत मेसेज किंवा कॉल येत असतील आणि तो नंबर TRAI कडे नोंदणीकृत नसेल. तर तुम्ही लगेच तक्रार करू शकता. तक्रार केल्यावर मोबाईल कंपनी त्या नंबरवर लगेच कारवाई करेल आणि त्याचं मेसेजिंग/कॉलिंग थांबवेल.
हेही वाचा : UPI ट्रान्जेक्शनवरही भरावा लागणार कर!
6. नियम मोडल्यास मोठी शिक्षा
जर एखाद्या मोबाईल कंपनीने चुकीचा किंवा खोटा रिपोर्ट दिला. म्हणजेच एखाद्या स्पॅम मेसेजबद्दल योग्य ती माहिती दिली नाही, तर त्यांच्यावर दंड बसवला जाईल. त्याचबरोबर नियम मोडणाऱ्या कंपन्यांची कॉल आणि मेसेज सेवा काही काळासाठी बंद केली जाऊ शकते.
7. मोबाईल कंपन्यांचे मेसेजेस वर 24 तास लक्ष
सर्व मोबाईल कंपन्यांना त्यांच्या नेटवर्कवरून सगळ्या कॉल आणि मेसेजेसवर 24 तास लक्ष ठेवावे लागेल. यामुळे स्पॅम किंवा फसवणुकीचे प्रकार लगेच ओळखून ते थांबवता येतील.
8. नको असलेले मेसेज थांबवण्याचा पर्याय
TRAI च्या नव्या नियमानुसार, जाहिरात करणाऱ्या कंपन्यांना आता त्यांच्या प्रत्येक मेसेजमध्ये ‘जर हे मेसेज नको असतील तर इथे क्लिक करा’ असा पर्याय द्यावा लागणार आहे. यामुळे तुम्ही सहजपणे तुम्हाला नको असलेले मेसेज थांबवू शकाल.
9. जाहिरातींच्या मेसेजसाठी वेळेच बंधन
जाहिरात मेसेज आता कोणत्याही वेळी पाठवले जाणार नाहीत. TRAI ने यासाठी वेळ निश्चित केली आहे. सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेतच असे मेसेज पाठवता येतील.
10. DND नंबरवर जाहिरात मेसेज नाहीत
जर तुम्ही ‘DND’ म्हणजेच Do Not Disturb सेवा चालू केली असेल, तर तुम्हाला कोणताही जाहिरातीचा मेसेज येणार नाही. त्यामुळे DND असताना देखील जर मेसेज आला तर संबंधित कंपनीवर कारवाई केली जाईल.