अनेकदा लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचं तिकीट हे महिना – दोन महिने आधी आरक्षित (बुक) करावं लागतं. ही आरक्षण प्रक्रिया ज्यादिवशी सुरु होते, त्यादिवशी अवघ्या अर्ध्या तासातच सगळ्या जागा आरक्षित होऊन जातात आणि आपल्याला तिकिट बुक करताना वेटिंग म्हणून दाखवलं जातं. हा अनुभव आपल्यापैकी अनेकांना कधी ना कधी आलाच असेल. प्रवास अगदीच गरजेचा असेल तर आपण ‘तात्काल’मध्ये ज्यादा पैसे भरून तिकिट बुक करायचा प्रयत्न करतो. पण यातही तिकिट मिळतंच असं नाही. मात्र, याला आता चाप बसणार आहे. आता तुम्हाला आधार कार्डनंबर शिवाय तिकीट आरक्षित करता येणार नसल्याचं रेल्वे प्रशासनाने जाहीर केलं आहे. याची अंमलबजावणी 1 जूलै 2025 पासून होणार आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जागा आरक्षित करण्यामागचा गैरप्रकार उघडकीस
‘तात्काल’ तिकीट आरक्षणप्रक्रियेमध्ये आरक्षणाची प्रक्रिया सुरु होताच अवघ्या काही सेकंदामध्ये सर्व तिकीटं आरक्षित झाल्याचं दाखवलं जायचं. रेल्वे प्रशासनाने केलेल्या एका सर्व्हेमध्ये प्रवाशांना ‘तात्काल’ तिकीट आरक्षण प्रणालीविषयी प्रश्न विचारला गेला होता. यामध्ये बऱ्याच प्रवाशांनी ‘तात्काल’ तिकीट आरक्षित करताना अडचण येत असल्याचं कळवलं. आरक्षणाची प्रक्रिया सुरु होताच दुसऱ्या मिनीटाला सर्व तिकीटं ही आरक्षित असल्याचं दाखवलं जायचं, हे प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलं.
हे ही वाचा : रेल्वेच्या तत्काळ तिकीट बुकिंगसाठी टिप्स आणि ट्रिक्स
आधार प्रमाणीकरण पद्धत
यावर उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने आधार कार्ड प्रमाणीकरण पद्धतीनुसार ‘तात्काल’ तिकीट आरक्षित करण्याचा पर्याय स्वीकारला आहे. या नवीन पद्धतीनुसार, तुम्हांला तिकीट आरक्षित करताना तुमचा आधार कार्ड क्रमांक आणि मोबाईल नंबर द्यावा लागणार आहे. त्याची तपासणी झाल्यावर तुम्हाला ओटिपी (वन टाईम पासवर्ड) दिला जाईल. हा पासवर्ड दिल्यावरच तुमचं तिकीट हे आरक्षित होईल.
अधिकृत तिकीट एजंटना अर्धा तास थांबावं लागणार
तत्काळ तिकीट आरक्षणाची प्रक्रिया सुरु झाल्यावर पहिला अर्धा तास हा फक्त सर्वसामान्यांना तिकीट आरक्षित करण्यासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. अर्ध्या तासानंतर रेल्वे प्रशासनाचे अधिकृत तिकीट एजंट तिकीट आरक्षित करु शकतात. जसं की, एसी डब्यांसाठी आरक्षण प्रक्रिया सकाळी ठिक 10 वाजता सुरु होते. तर 10 ते 10.30 पर्यंत सर्वसामान्य लोकं (जे एजंटशिवाय तिकीट आरक्षित करतात त्यांच्यासाठी) राखीव ठेवलेला आहे. तसेच सर्वसामान्य लोकांना नॉनएसी स्लीपर ‘तात्काल’आरक्षण 11 ते 11.30 या वेळेत करता येतं.
रेल्वेचे अधिकृत एजंट एसीकरता सकाळी साडे दहा ते अकरा आणि नॉन एसीकरता सकाळी साडे अकरा ते बारा यावेळेत तिकीट आरक्षित करु शकतात.
या व्यवस्थेमुळे सर्वसामान्या लोकांना सहजरित्या लांब पल्ल्याच्या गाड्यांची तिकीट वेळेत आरक्षित करता येतील.
1 Comment
abu215