फेसबुक, एक्स, इन्स्टाग्राम यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सप्रमाणे ‘ट्रूथ’ हे आणखीन एक नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुरु झालेला आहे. या प्लॅटफॉर्मची खासियत ही आहे की, हे ॲप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वतःचं सोशल मीडिया ॲप आहे. या ॲपचं पूर्ण नाव, ‘ट्रुथ सोशल’ (Truth Social) असं आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘ट्रम्प मीडिया अँड टेक्नॉलॉजी ग्रुप (TMTG)’ या कंपनीचं हे ॲप आहे.
ट्रुथ सोशलची सुरुवात कशी झाली?
6 जानेवारी 2021 रोजी अमेरिकेतल्या राजकीय घडामोडींमुळे फेसबुक आणि एक्स (तत्कालिन ट्विटर) या सोशल मीडियावरुन डोनाल्ड ट्रम्प यांची खाती बंद केली. या घटनेनंतर ट्रम्प यांनी स्वतःचं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बनवण्याचा विचार केला. जेणेकरुन या प्लॅटफॉर्मवर ते मुक्तपणे आपली मतं मांडू शकतात. इथे त्यांना कोणीही थांबवू शकत नाही आणि अकाऊंट बंद करण्याची भीतीही राहणार नाही. या उद्देशाने त्यांनी हा प्लॅटफॉर्म सुरु केला.
ट्रुथ सोशल सुरू करण्याआधी, त्यांनी “From the Desk of Donald J. Trump” नावाची एक ब्लॉग वेबसाईट सुरू केली होती. ती एक प्रकारची तात्पुरती व्यवस्था होती. पण ती काही काळापुरतीच कार्यरत ठेवली होती.
ट्रुथ सोशल बाजारात कधी आलं?
त्यानंतर, फेब्रुवारी 2022 मध्ये ॲपल ॲप स्टोअरवर ट्रुथ सोशल हे ॲप आलं. सुरुवातीला या ॲपला काही अडचणी आल्या, पण लवकरच हे ॲप सर्वात जास्त डाउनलोड केलेल्या मोफत ॲप्सपैकी एक बनलं. हे ॲप खास करून अशा लोकांसाठी बनवलं होतं, ज्यांना असं वाटतं की मुख्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांचं म्हणणं दाबून टाकलं जातं. त्यामुळे ट्रम्प यांना पाठिंबा देणारे लोक आणि पुराणमतवादी विचारसरणीचे लोक या ॲपचा मोठ्या प्रमाणावर वापर करु लागले.
ट्रुथ सोशल ॲप कसं काम करतं?
ट्रुथ सोशल ॲप वापरायला खूप सोपं आहे. त्याचं स्वरुप हे एक्स (ट्विटर) सारखंच आहे. इतर ॲप्सप्रमाणे तुम्ही तुमची स्वतःची ओळख किंवा प्रोफाईल यामध्ये बनवू शकता. तुम्ही जसं एक्स वर पोस्ट करता, तशाच पोस्ट तुम्ही या ॲपवर करु शकता. एक्स वर जसं तुमच्या पोस्ट ना ट्विट म्हटलं जातं. तसं या प्लॅटफॉर्मवर तुम्ही केलेल्या पोस्टनां ‘ट्रुथ्स’ असं म्हटलं जातं.
त्यानंतर तुम्ही दुसऱ्यांनी पोस्ट केलेले “ट्रुथ्स” तुमच्या मित्रांना किंवा फॉलोअर्सना दाखवण्यासाठी “री-ट्रुथ” करू शकता. जसं ट्विटरवर रिट्विट केलं जातं तसंच. तुम्ही थेट एकमेकांना खासगी मेसेजही पाठवू शकता. या ॲपचा रंग जांभळा आहे.
ट्रुथ सोशलचे वेगळे नियम आणि वापरकर्ते
फेसबुक, एक्स आणि इन्स्टाग्राम यासारख्या इतर ॲप्सपेक्षा ट्रुथ सोशलचा एक वेगळा नियम आहे. हे ॲप फक्त 18 वर्षांवरील लोकांसाठी आहे. पण, या ॲपमध्ये वयाची तपासणी फारशी केली जात नाही. त्यामुळे 18 वयोवर्षाखालील मुलंही सहजपणे यावर आपलं खातं उघडून ते वापरु शकतात.
सिमिलरवेब नावाच्या एका संशोधन कंपनीच्या अंदाजानुसार, फेब्रुवारी 2024 पर्यंत ट्रुथ सोशलचे सुमारे 50 लाख ॲक्टिव्ह वापरकर्ते आहेत. म्हणजे 50 लाख लोक हे ॲप वापरत आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांचे स्वतःचे ट्रुथ सोशलवर फक्त 10 लाख फॉलोअर्स आहेत, जे खूपच कमी आहेत. त्याउलट एक्स वर सध्या 107 कोटी (107M) फॉलोअर्स आहेत. यावरून असं दिसतं की ट्रम्प यांच्या फॉलोअर्सपैकी खूप कमी लोक ट्रुथ सोशलवर आहेत.
हे ॲप केवळ एक संवाद साधन नसून एका विशिष्ट विचारसरणीच्या लोकांना एकत्र आणण्याचं आणि त्यांच्या विचारांना मुक्तपणे मांडण्याचं एक माध्यम बनलं आहे.
1 Comment
3kz3hj