आजकाल केसांना रंग लावणं खूप सामान्य झालं आहे. काहीजण पांढरे केस लपवण्यासाठी रंग लावतात, तर काहीजण फॅशन म्हणून किंवा वेगळं दिसण्यासाठी केसांना रंग देतात. अनेकांसाठी तर हे फक्त सौंदर्य नाही, तर आत्मविश्वास आणि स्वतःला व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. पण केसांना रंग लावताना आपण त्या रंगांमुळे आपल्या टाळूवर , केसांवर आणि आपल्या आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो, याचा फारसा विचार करत नाही.
पूर्वी काही अभ्यासातून असं समोर आलं होतं की केसांना रंग लावल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात. पण आजकाल, कधीतरी केसांना रंग लावणाऱ्यांसाठी हा धोका खूप कमी मानला जातो.
डॉ. एस. सुकेश गौतम, जे चेन्नईतील डॉ. मेहता हॉस्पिटल्समध्ये त्वचारोग तज्ज्ञ आहेत, ते सांगतात, “बहुतेक हेअर कलरमध्ये पॅराफेनिलेनेडायमाइन (PPD) आणि हायड्रोजन पेरॉक्साइड सारखी स्ट्राँग रसायने वापरली जातात.” या घटकांमुळे रंग केसांच्या आतपर्यंत जातो आणि खूप काळ टिकतो. पण याच रसायनांमुळे तुमच्या टाळूला त्रास होऊ शकतो किंवा काही लोकांना ॲलर्जी देखील होऊ शकते. असं विशेषतः तेव्हा होतं, जेव्हा तुम्ही वारंवार रंग वापरता किंवा योग्य रंग वापरताना योग्य काळजी घेत नाहीत.
हेअर कलर आणि ॲलर्जी
केसांना रंग लावल्यामुळे होणाऱ्या ॲलर्जीचे पॅराफेनिलेनेडायमाइन हे एक प्रमुख कारण आहे. डॉ. सुकेश सांगतात की त्यांच्या क्लिनिकमध्ये अनेकदा असे रुग्ण येतात ज्यांची टाळू चिकट झालेली असते, डोळ्यांना सूज येते किंवा हेअर कलर लावल्यानंतर एका दिवसाच्या आत खूप खाज सुटते. काही लोकांना तर नियमित रंग वापरल्यानंतर काही महिन्यांनी किंवा वर्षांनी त्वचेवर गडद चट्टे किंवा पुरळ येतो.
डॉ. सुकेश म्हणतात की, खरी समस्या ही आहे की अनेकांना हे समजत नाही की त्यांची ही लक्षणं हेअर कलरमुळे आहेत. त्यांना वाटतं की हे एखाद्या नवीन शाम्पूमुळे किंवा तणावामुळे होत आहे. पण खरं तर ही ॲलर्जी वारंवार रंग लावल्यामुळे तयार होते.
गेल्या काही वर्षांपासून अनेक कंपन्या हर्बल किंवा अमोनिया-फ्री हेअर कलर हे अधिक सुरक्षित पर्याय म्हणून बाजारात आणत आहेत. पण जरी या प्रोडक्ट मुळे टाळूची जळजळ किंवा कोरडेपणा काही प्रमाणात कमी होत असला, तरी यामुळे अजूनही ॲलर्जी होऊ शकते.
काही हर्बल म्हणवल्या जाणाऱ्या रंगांमध्ये कृत्रिम रसायने लपलेली असतात. या रसायनांबद्दल पॅकेजिंगवर स्पष्टपणे माहिती लिहिलेली नसते. म्हणून, केसांना रंग लावताना खूप काळजी घ्या. कोणताही नवीन हेअर कलर वापरण्यापूर्वी आधी लहान पॅच टेस्ट नक्की करा आणि काही त्रास जाणवल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
योग्य हेअर कलर कसा निवडायचा?
केसांना रंग देताना फक्त ब्रँडच्या नावावर जाऊ नका. रंगाच्या डब्यावर त्यात वापरल्या जाणाऱ्या घटकांची यादी दिलेली असते ती नीट वाचा. विशेषतः PPD, अमोनिया आणि रेसोर्सिनॉल यांसारखे घटक त्यात आहेत का ते बघा.
गडद रंगांच्या डायमध्ये सहसा जास्त PPD असते. पण आता काही कंपन्या असे डाय बनवतात ज्यात PPD कमी असते किंवा नसतेच. असे डाय वापरल्याने ॲलर्जीचा धोका कमी होऊ शकतो.
सेमी-पर्मनंट किंवा वनस्पती-आधारित डाय सहसा केसांना कमी नुकसान करतात, पण ते जास्त काळ टिकत नाहीत. डॉ. सुकेश सांगतात की, “जर एखाद्या उत्पादनात घटक स्पष्टपणे दिले नसतील किंवा 100% नैसर्गिक असे दावे केले असतील पण ते खरे आहेत की नाही याची खात्री नसेल, तर आपण सावध राहणे चांगले.” ते असेही सांगतात की, बाजारात किंवा सोशल मीडियावर अनियंत्रित डाय विकत घेऊ नका, कारण त्यांच्या सुरक्षिततेची खात्री नसते.
तुमचे केस कसे आहेत ते पाहून निर्णय घ्या
केसांना रंग लावताना तुमच्या केसांची सध्याची स्थिती काय आहे याचा विचार करणं महत्त्वाचं आहे. ज्या केसांना आधीच रंग लावला आहे किंवा जे केस खराब झाले आहेत, ते रंग वेगळ्या पद्धतीने हे रंग शोषून घेतात. त्यामुळे वारंवार रसायनांचा वापर केल्याने केस अधिक कमकुवत होऊ शकतात.
जर तुम्हाला केसांना ब्लीच करायचे असेल किंवा वारंवार टच-अप करायचे असतील, तर एखाद्या चांगल्या हेअर प्रोफेशनल कडून सल्ला घेणं खूप महत्त्वाचं आहे. असे सलून निवडा जिथे टाळूच्या संरक्षणाला महत्त्व दिले जाते. हातमोजे आणि बॅरियर क्रीम वापरले जातात आणि जिथे आधीच रंगवलेल्या केसांवर पुन्हा रंग लावला जात नाही. यामुळे केसांना होणारे दीर्घकाळचे नुकसान कमी होते. जर तुमची त्वचा सेन्सिटिव्ह असेल किंवा तुम्हाला त्वचेचा कोणताही आजार असेल, तर हेअर कलर वापरण्यापूर्वी त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
टाळू आणि केसांचे संरक्षण कसे कराल?
टाळू आणि केसांचे संरक्षण करण्यासाठी त्वचारोग तज्ज्ञ काही महत्त्वाचे उपाय सांगतात:
1. पॅच टेस्ट
कोणताही नवीन हेअर कलर वापरण्यापूर्वी, पॅच टेस्ट नक्की करा. यामुळे तुम्हाला ॲलर्जी आहे की नाही हे कळेल. ही टेस्ट कानाच्या मागे किंवा हाताच्या कोपरावर थोडा रंग लावून केली जाते.
2. जखमेवर लावू नका
जर टाळूला आधीच खाज सुटली असेल, लालसरपणा असेल किंवा कोणतीही जखम असेल, तर अशा वेळी हेअर कलर वापरणे टाळा.
3. पेट्रोलियम जेली
हेअरलाइनच्या बाजूने आणि कानांच्या मागे थोडी पेट्रोलियम जेली लावल्याने रंग त्वचेवर थेट लागत नाही आणि जळजळ होत नाही.
4. डोकं स्वच्छ धुवा
रंग लावल्यानंतर, टाळू पूर्णपणे स्वच्छ धुवा आणि सौम्य, सल्फेट-फ्री शाम्पूने केस धुवा.
5. कंडिशनर वापरा
केसांना पोषण देणारा कंडीशनर वापरल्याने केस मऊ राहतात आणि रसायनांमुळे होणारे नुकसान कमी होते.
काही लोकांना काळजी वाटते की केसांना खूप वर्षांपासून रंग लावल्याने कॅन्सरचा धोका वाढू शकतो. पूर्वीच्या काही अभ्यासकांनी याबद्दल चिंता व्यक्त केली होती. पण, आजकाल क्वचितच केसांना रंग लावणाऱ्यांसाठी हा धोका खूप कमी मानला जातो. तुम्ही केसांना जो रंग लावता, तो तुमच्या त्वचेशी थेट संपर्कात येतो आणि त्यामुळे तुमच्या त्वचेलाही शरीराच्या इतर भागांप्रमाणेच काळजी आणि लक्ष देणं गरजेचं आहे.
1 Comment
emglvc