भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड आणि जीएसके पीएलसी मलेरिया प्रतिबंधित लसीची किंमत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. 2028 सालापर्यंत आर.टी.एस.एस. या लसीची किंमत साडेचारशे रुपयांहूनही कमी असणार आहे.
गॅवी संस्थेसाठी दर कपातीचा निर्णय
गॅवी (ग्लोबल अलायन्स फॉर व्हॅक्सीन एण्ड इम्युनायझेशन) ही संस्था अविकसित देशांमध्ये लसीकरणाला उत्तेजन देण्याकरता काम करते. या संस्थेद्वारे या देशांतील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येते. या कार्यात जीएसके (ग्लॅक्सो) ही कंपनी गॅवी संस्थेला मदत करते. आफ्रिकन देशांमध्ये मलेरिया आणि इतर रोगांचं थैमान असतं. यातून लहान बालकांची सुटका व्हावी, त्यांना लस मिळावी म्हणून जीएसके कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
या दोन्ही कंपन्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उत्पादन प्रक्रियेतील सुधारणा, वाढलेली उत्पादन क्षमता, किफायतशीर उत्पादन आणि किमान नफा या बदलांमुळे ही दर कपात करणं शक्य झालं. त्याचप्रमाणे, भारत बायोटेकने नवीन उत्पादन सुविधा आणि तंत्रज्ञान हस्तांतरणात 18 अब्ज रुपयांहूनही जास्त गुंतवणूक केली आहे. GSK ने उत्पादन क्षमता आणि कार्यक्षमतेत मोठी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे टप्प्याटप्याने या लसीच्या दरामध्ये कपात करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
काय आहे गॅवी संस्था
ग्लोबल अलायन्स फॉर व्हॅक्सीन अँड इम्यूनिसेशन (GAVI) ही जगातील गरिब देशांमध्ये लसपुरवठा करणारी संस्था आहे. जगातील अनेक गरिब देशांतील नागरिकांना विशेषत: लहान मुलांना विविध आजारांना प्रतिबंध करणाऱ्या लस मिळाव्यात यासाठी ही संस्था प्रयत्न करते. या लसीकरण मोहिमांसाठी निधी उभा करणे, लसींच्या किंमतीमध्ये वाटाघाटी करुन त्या परवडतील अशा किंमतीमध्ये मिळवणं आणि गरजूंपर्यंत पोहोचवणं असं सगळं कार्य या संस्थेच्या अंतर्गत चालतं. या संस्थेकडून आतापर्यंत 76 कोटीहून जास्त बालकांना लसीकरण केलं आहे.
भारत बायोटेकची भागीदारी
जीएसके या ब्रिटिश औषध निर्माण कंपनीने आरटीएस,एस ही मलेरिया प्रतिबंधित लस निर्माण केली. या लसीच्या उत्पादनासाठी 2021 साली भारत बायोटेक कंपनीने जीएसके कंपनीसोबत भागिदारी केली. यासाठी भारत बायोटेकने 18 अब्ज रुपयांची गुंतवणूक केली.
कशी आहे ही आरटीएस,एस लस
आरटीएस,एस ही प्रोटीन पोषणमूल्ये असणारी लस आहे. लहान मुलांचं मलेरियापासून संरक्षण करण्यासाठी या लसीची निर्मिती केली आहे. ही लस सर्वात घातक मलेरियाचं जंतू (परजीवी) प्लास्मोडियम फाल्सीपेरम वर हल्ला करतात.
जागतिक आरोग्य संस्थेने मध्यम ते उच्च मलेरियाचा प्रसार असलेल्या भागात 5 महिन्यांच्या मुलांसाठी RTS,S/AS01 चे चार-डोस देण्याचे निर्देश दिले आहेत. तर ज्या ठिकाणी मलेरियाचा अधिक प्रादुर्भाव आहे, अशा भागातील लहान बालकांना पाच डोस देण्याचे निर्देश दिले आहेत.
आरटीएस,एस या लसीचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळत आहेत. घाना, केनिया आणि मलावी या आफ्रिकन देशांमध्ये मलेरियाचा खूप जास्त प्रादुर्भाव आहे. जागतिक आरोग्य संस्थेंतर्गत या तिन्ही देशांमध्ये 2 कोटीहून अधिक लहान बालकांना ही लस दिली. त्यानंतर 2019 ते 2023 दरम्यान मलेरियामुळे होणाऱ्या मृत्यूदरात 13 टक्क्यांनी घट झाली. तर लसीकरण केल्या जाणाऱ्या या वयोगटातील पात्र मुलांमध्ये गंभीर मलेरियासाठी रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण 22 टक्क्याने कमी झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे जागतिक आरोग्य संस्थेच्या निर्देशानुसार या लसी दिल्या तर 75 टक्के मलेरिया रुग्णांचं प्रमाण कमी झाल्याचं पाहायला मिळालं.
मलेरिया विरोधातला लढा
भारत बायोटेकचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. कृष्णा एला म्हणाले की, जगातल्या लाखो मुलांचं मलेरिया या आजारापासून संरक्षण करण्यासाठी भारत बायोटेक कंपनी कटिबद्ध आहे.
जीएसकेचे मुख्य जागतिक आरोग्य अधिकारी थॉमस ब्रुअर हे म्हणाले की, जागतिक पातळीवर मलेरिया विरोधात लढा देताना या लसीच्या उत्पादनासाठी भारत बायोटेकची साथ मिळणं हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.
आफ्रिकेमध्ये मलेरियाचा विळखा
आफ्रिकेमध्ये मलेरियामुळे दरवर्षी 6 लाख लोक मृत्युमुखी पडतात. आफ्रिकेतील 12 स्थानिक देशांमध्ये 2025 च्या अखेरीसपासून आरटीएस,एस या लसीचा नियमित लसीकरण कार्यक्रम राबविला जाईल अशी आशा गॅवी संस्थेने व्यक्त केली आहे.
गॅवीच्या सीईओ डॉ. सानिया निश्तार यांनी सांगितले की, 2030 च्या अखेरपर्यंत संपूर्ण आफ्रिकेतील किमान 5 कोटी अधिक मुलांचं मलेरियापासून संरक्षण करण्याचं संस्थेचं उद्दिष्ट आहे.