तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे का? ज्यात खर्च कमी असेल, पण फायदा खूप जास्त मिळेल? तर तुमच्यासाठी मायक्रोग्रीन (Microgreens) म्हणजेच कोवळ्या पालेभाज्या विकणे व्यवसाय हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो! हा व्यवसाय सध्या खूप वाढत आहे आणि यात चांगला नफा मिळवण्याची संधी आहे.
वेगवेगळ्या प्रकारच्या बियांपासून मायक्रोग्रीन्स पिकवता येऊ शकतात. आरोग्यप्रेमी व्यक्ती आणि आहारतज्ज्ञांमध्ये हे मायक्रोग्रीन खाण्याचा ट्रेंड सध्या जोरात आहे. त्यामुळे या कोवळ्या पालेभाज्यांचा (Microgreens) व्यवसाय हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. हा व्यवसाय सध्या खूप वाढत आहे आणि यात चांगला नफा मिळवण्याची संधी देखील आहे. आणि या भाज्यांकरता फार मोठ्या जागेचीही गरज नाही.
मायक्रोग्रीन्स म्हणजे काय?
मायक्रोग्रीन्स म्हणजे कोवळ्या भाज्यांना आपण पूर्ण वाढण्याआधीच कापून खातो. कोवळी, लहान पाने असलेल्या या भाज्या उगवल्यानंतर फक्त 7 ते 21 दिवसांनी लगेच काढल्या जातात. कारण त्या खूप लवकर तयार होतात. इतर पालेभाज्यांपेक्षा या पालेभाज्यांची पाने लहान लहान असतात. आणि उंचीने देखील त्या लहान असतात. बियाण्यांपासून उगवलेली ही लहान रोपे असतात. पण त्यामध्ये पोषक तत्वांचे प्रमाण हे जास्त असते आणि चवीलाही चांगल्या लागतात. म्हणूनच बाजारात या भाज्यांची मागणी अधिक आहे.
फ्लॉवर, ब्रोकोली, बेसिल, कोबी, अळीव, मुळा, लेट्युस, बडीशेप, गाजर, सेलेरी, लसूण, कांदा, राजगिरा, बीट, पालक, टरबूज, काकडी आणि घोसाळे या भाज्या बिया पेरून लावण्यात येतात. एवढंच नाही तर तांदूळ, गहू, मका, बार्ली यासारखी तृणधान्ये आणि हरभरे, चणे, मसूर यासारखी कडधान्येसुद्धा मायक्रोग्रीनमध्ये पिकविण्यात येतात.
मायक्रोग्रीन्सचा व्यवसाय का सुरू करावा?
कमी वेळात जास्त उत्पन्न: मायक्रोग्रीन्स फक्त 1 ते 3 आठवड्यांत तयार होतात. त्यामुळे तुम्ही कमी वेळात जास्त उत्पादन घेऊन विकू शकता.
जागेची चिंता नाही: तुमच्याकडे मोठी जागा नसली तरी हा व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता. तुम्ही घरात किंवा टेरेसवरही ट्रेमध्ये या भाज्या पिकवू शकता. त्यांना जास्त जागेची गरज लागत नाही.
चांगली मागणी आणि किंमत: आजकाल हॉटेल, रेस्टॉरंट, कॅफे आणि आरोग्याची काळजी घेणाऱ्या लोकांमध्ये मायक्रोग्रीन्सना खूप मागणी आहे. बाजारात 100 ग्रॅम मायक्रोग्रीन्स भाज्या 200 ते 400 रुपयांपर्यंत विकल्या जातात, त्यामुळे यात चांगला नफा मिळतो.
कमी खर्च, जास्त नफा: हा व्यवसाय सुरू करण्यासाठी जास्त खर्च येत नाही. तुम्हाला फक्त ट्रे, बियाणं, जैविक खत आणि माती इतक्याच गोष्टी लागतात.
मायक्रोग्रीन्स पिकवणं खूप सोपं आहे. त्यांना जास्त प्रखर सूर्यप्रकाशाची गरज नसते. फक्त रोज थोडं पाणी दिलं की काही दिवसांतच रोपं उगवायला लागतात. मुळा, गाजर किंवा इतर भाज्यांच्या बिया वापरून तुम्ही हे पिकवू शकता.
हेही वाचा:पारंपारिक शेतीला छेद देत सीताफळाची लागवड; दौंडच्या शेतकऱ्याची यशोगाथा
व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणत्या गोष्टी लागतील?
हा व्यवसाय सुरू करायला खूप कमी गोष्टी लागतात आणि सुरुवातीचा खर्चही कमी असतो. साधारणपणे 15 हजार इतका खर्च होऊ शकतो. या भाज्या पिकवण्यासाठी ट्रे किंवा ग्रो रॅक लागतील. आणि यासाठी उत्तम प्रतीचे बियाणे वापरणे खूप महत्त्वाचं आहे. जर नैसर्गिक सूर्यप्रकाश नसेल, तर वाढीसाठी तुम्ही ग्रो लाईट्स वापरू शकता. तसंच भाज्यांची काळजी घेण्यासाठी स्वच्छ पाणी आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं आहे.
या भाज्या कोण विकत घेतं?
मायक्रोग्रीन्सना बाजारात चांगलीच मागणी आहे. तुमच्या आसपासच्या किराणा दुकानांमध्ये तुम्ही या भाज्या विकू शकता. मोठ मोठ्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स मध्ये त्यांच्या जेवणात सजावट म्हणून किंवा पदार्थांना खास चव देण्यासाठी या मायक्रोग्रीन्सचा वापर केला जातो.
तसंच जे लोकं आरोग्याबद्दल खूप जागरूक असतात आणि खास डाएट फॉलो करतात, त्यांना मायक्रोग्रीन्स भाज्या खायला खूप आवडतात. असे लोक मायक्रोग्रीन्स रोजच विकत घेतात. तुम्ही सोशल मीडिया वापरून किंवा शेतकरी बाजारात स्टॉल लावून थेट ग्राहकांनाही मायक्रोग्रीन्स विकू शकता.
नफा आणि व्यवसायाची वाढ
मायक्रोग्रीन्सच्या व्यवसायात नफा मिळवण्याची खूप चांगल्या संधी आहेत. एका ट्रेमध्ये मायक्रोग्रीन्स पिकवायला तुम्हाला फक्त 40 ते 60 रुपये खर्च येतो. त्याच एका ट्रेमधील भाज्या तुम्ही 200 ते 400 ला विकू शकता. म्हणजेच याचा अर्थ तुम्हाला 300% पेक्षा जास्त नफा मिळू शकतो.
एकदा तुम्हाला कमी प्रमाणात मायक्रोग्रीन्स पिकवण्याचा अनुभव आला की, तुम्ही दर महिन्याला 100 पेक्षा जास्त ट्रे भाजी पिकवून तुमचा व्यवसाय खूप मोठा करू शकता. जसजसा तुमचा अनुभव वाढेल, तसतसा तुमचा नफाही वाढत जाईल.