केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने यावर्षी आयटीआर रिटर्न्स फाईल करण्याची मुदत 15 सप्टेंबर 2025 पर्यंत वाढवली आहे. मात्र, ही मुदतवाढ सगळ्याच करदात्यांसाठी नाही. तर, जे करदाते ऑडिटच्या परीघात येत नाहीत, अशाच करदात्यांना ही मुदतवाढ लागू होते. अन्य करदात्यांना 31 जुलै 2025 पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे.
आयटीआर रिटर्न्सची मुदतवाढ कोणाला मिळणार नाही?
पगारदार व्यक्ती आणि छोट्या उद्योजकांचं उत्पन्न हे कमी असेल आणि ज्यांचं ऑडिट केलं जात नाही, असे करदाते 15 सप्टेंबरपर्यंत आता आयटीआर रिटर्न्सची प्रक्रिया पूर्ण करु शकतात. मात्र, ज्या कंपन्या, संस्था ऑडिटच्या अखत्यारित येतात त्यांना 31 जुलैपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावीच लागणार आहे. यामध्ये कंपनी, वार्षिक उत्पन्न मर्यादेहून जास्त असलेले व्यावसायिक, गृहीत धरलेल्या कर आकारणीतून बाहेर पडणारे व्यवसाय आणि आंतरराष्ट्रीय किंवा विशिष्ट देशांतर्गत व्यवहारांमध्ये सहभागी असलेले करदाते (हस्तांतरण किंमत प्रकरणे) या वर्गवारीतल्या करदात्यांचा समावेश आहे.
ऑडिट कराव्या लागणाऱ्या करदात्यांसाठी महत्त्वाच्या तारखा
ज्या कंपनी आणि व्यावसायिकांना आपल्या आर्थिक उलाढालीचं वार्षिक ऑडिट करावं लागतं अशा करदात्यांसाठी महत्त्वाच्या तारखा पुढीलप्रमाणे :-
30 सप्टेंबर 2025 : कलम 44 AB अंतर्गत टॅक्स ऑडिट रिपोर्ट सादर करण्याची शेवटची तारीख आहे.
31 ऑक्टोबर 2025 : ऑडिट प्रकरणांमध्ये जर 31 जुलैची तारीख चुकली तर आयटीआर दाखल करण्याची अंतिम मुदत ही 31 ऑक्टोबर आहे.
30 नोव्हेंबर 2025 : ट्रान्सफर प्राइसिंग आवश्यकता असलेल्या करदात्यांसाठी आयटीआर भरण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर दिली आहे.
ट्रान्सफर प्राइसिंग म्हणजे आंतरराष्ट्रीय किंवा विशिष्ट देशांतर्गत व्यवहारांमध्ये सहभागी असलेले करदाते.
त्यामुळे ऑडिट कराव्या लागणाऱ्या किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यवहार करणाऱ्या करदात्यांनी या तारखा लक्षात ठेवायच्या आहेत. कारण या करदात्यांच्या बाबतीत याहून जास्त मुदतवाढ दिली जात नाही.
हे ही वाचा : आयटीआर भरायचा आहे.. पण फॉर्म 16 घेतला का?
नॉन – ऑडिट करदात्यांसाठी नवीन मुदतवाढ
पगारदार लोकं आणि छोटे व्यावसायिक आता 15 सप्टेंबरपर्यंत रिटर्न दाखल करू शकतात. आयटीआर फॉर्म्स आणि त्यासंबंधित अन्य कागदपत्रं देण्यासाठी यंदा आयकर विभागाला उशीर झाला. त्यामुळे करदात्यांना फाईल तयार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून ही मुदतवाढ दिली आहे.
सामान्य करदात्यांसाठीच्या महत्त्वाच्या तारखा
31 डिसेंबर 2025 : सामान्य करदाते आता 15 सप्टेंबरपर्यंत आयटीआर रिटर्न्सची प्रक्रिया पूर्ण करु शकतात. 31 डिसेंबर 2025 ही सुधारित आयटीआर दाखल करण्याची तारीख आहे. ज्यांनी आयटीआर दाखलच केला नाही ते यादिवशी आयटीआर दाखल करु शकतात पण त्यांना 5 हजार रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागू शकतो. त्यामुळे शक्यतो 31 जुलै किंवा 15 सप्टेंबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.
31 मार्च 2026 : कर निर्धारण वर्ष 2025 – 26 साठी अपडेटेड रिटर्न (ITR-U) दाखल करण्याची अंतिम तारीख आहे.
दरम्यान ही सगळी प्रक्रिया सुरु करण्यापूर्वी फॉर्म 16, टीडीएस तपशील, वार्षिक माहिती पत्र आणि गुंतवणुकीचे पुरावे तुमच्याजवळ तयार ठेवा जेणेकरून फाइलिंग सुरळीत होईल.