आपल्या रोजच्या सवयी, खाद्यपदार्थांची निवड, विश्रांतीचा अभाव, व्यसनाधीनता आणि चुकीची जीवनशैली यांचा शरीरावर खोलवर परिणाम होतो. पण या सगळ्या गोष्टींसाठी फार थोडे डॉक्टर्स आपल्याला वेळ देतात, तपशील सांगतात. तेही दिवसाचे हजारो पेशंट बघत असतात त्यामुळे त्यांचीही चूक आहे असं म्हणता येणार नाही. काही रोग्यांना आजाराची अधिक माहिती देऊन उपयोग नसतो कारण ते त्याचा विपर्यास करतात. त्यामुळे बऱ्याचदा डॉक्टर्स जेवढ्यास तेवढे या पद्धतीचा अवलंब करतात. पण आपल्या आजारांची कारणं स्वतः समजून घेणं, हे केवळ डॉक्टरची जबाबदारी न राहता आपली ही तितकीच आहे.
किडनी –
सर्दी-खोकल्यासाठी दिल्या जाणाऱ्या काही पेनकिलर्स आणि अँटीबायोटिक्स किडनीवर हळूहळू दुष्परिणाम करतात. किडनीचा आजार झाल्यावरच आपण काळजी घेतो – पण वारंवार “ब्लड यूरिया आणि क्रिएटिनिन” तपासणं हे मधुमेह, बीपी असलेल्या रुग्णांसाठी गरजेचं आहे.
फूड आणि ड्रग रिअॅक्शन –
काही फळं (उदा. संत्रं, जांभूळ, द्राक्ष) काही ब्लडप्रेशर किंवा कोलेस्ट्रॉलच्या गोळ्यांबरोबर घेतल्यास औषधाचं अॅबसॉर्प्शन बदलतं. ही माहिती फार कमी रुग्णांपर्यंत पोहोचते.
मेडिकल गिफ्टिंग :
आपण वाढदिवसाला मिठाई, कपडे, गॅजेट्स देतो; पण विटॅमिन D, ओमेगा 3, ब्लड टेस्ट व्हाउचर, मेडिकल हेल्थ चेक-अप अशी गिफ्ट्स दिली तर ती ‘आरोग्यदायी’ ठरतील. ही संकल्पना अजूनही लोकप्रिय नाही. हे खरंतर डॉक्टर कडूनच रुग्णांमध्ये रुजायला हवी.
हे ही वाचा : अरेच्चा ! डॉक्टरांनी तर मला हे सांगितलंच नाही
टीबी आणि औषधांचा प्रभाव
टीबी म्हणजे क्षयरोग. टीबीवर घेतली जाणारी औषधं (जसे की Rifampicin, Isoniazid) यांचा यकृतावर परिणाम होतो. जर एखादा रुग्ण याच दरम्यान अल्कोहोल घेत असेल, तर लिव्हरचा आजार गंभीर होऊ शकतो. पण टीबी रुग्णांना नेहमी हे स्पष्टपणे सांगितले जात नाही की ‘दारू पिणं तुमच्या औषधांचा परिणाम निष्क्रिय करू शकतं’. त्यामुळे तुम्ही जर कोणत्या गोळ्या घेत असाल तर शक्यतो त्याकाळात मद्यसेवन करणं टाळा.
सिगरेट, पान, गुटखा आणि तंबाखू
या व्यसनी पदार्थांचा केवळ कॅन्सरशी संबंध नाही, तर ते अनेक औषधांच्या परिणामक्षमतेवर परिणाम करतात. उदाहरणार्थ, सिगरेट शरीरात निकोटीन वाढवते, जे अनेक औषधांच्या अॅबसॉर्प्शनमध्ये बदल घडवते. काही अँटीडिप्रेसंट किंवा बीपीच्या गोळ्यांचा प्रभाव कमी होतो. गुटखा आणि तंबाखूचा वारंवार वापर मुखाच्या आत रसायनांची क्रिया बदलतो आणि औषध घेण्याचे मार्गही असमर्थ ठरतात.
कोल्ड्रिंक्स + फास्ट फूड: गॅस्ट्रिक बॉम्ब( टिपिकल मॅक-डी/ पिझ्झा हट कॉम्बिनेशन)
फास्ट फूड बरोबर सॉफ्ट ड्रिंक्स घ्यायची सवय आपल्या पचनसंस्थेला मोठा धक्का देते. बर्गर किंवा पिझ्झा हे आधीच जड, चरबीयुक्त असतात. कोल्ड्रिंक्समधील कार्बोनिक अॅसिड याच अॅसिडवर पचन अवलंबून असलेले एन्झाईम्स निष्क्रिय करतो. यामुळे अन्न पचत नाही, गॅस होतो, अॅसिडिटी वाढते आणि कालांतराने गॅस्ट्रायटिस, उलटी, बद्धकोष्ठता यासारखे त्रास सुरू होतात.
हे ही वाचा : उच्च रक्तदाब (Hypertension) – कारणे, उपाय आणि आहार
कॉलेज युवकांची चहा-कॉफीची अतिरेकी सवय
अभ्यास, परीक्षेचा ताण, जागरणं – या सगळ्यामुळे विद्यार्थी सतत कॅफिनयुक्त पेये घेतात. सतत चहा किंवा कॉफी घेतल्याने मज्जा संस्था अति कार्यान्वित/ CNS overstimulation होते. मेंदूचा नैसर्गिक विश्रांती चक्र बिघडतो, झोपेची गुणवत्ता कमी होते आणि अभ्यासाची एकाग्रता कमी होते. त्याचबरोबर कॅफिन पचनावर परिणाम करून मळमळ, अपचन, अग्निमांद्य निर्माण करते.
झोप आणि इम्युनिटीचं नातं
रात्रीचं जागरण, कमी झोप, सतत स्क्रीनवर राहणं यामुळे melatonin हार्मोनची निर्मिती कमी होते. याचा थेट परिणाम रोगप्रतिकारक शक्तीवर होतो. परीक्षेच्या काळात अधिक विद्यार्थी आजारी पडतात कारण त्यांचे शरीर आधीच थकलेले असते. असंतुलित आहार आणि झोपेची कमतरता यामुळे आजारपणाची शक्यता वाढते.
आरोग्य केवळ तपासण्या, रिपोर्ट आणि गोळ्यांवर आधारित नाही. आपण आई-वडिलांनी सांगितलेल्या आणि डॉक्टरने सांगितलेल्या ज्या गोष्टी ऐकत नाही, त्यामुळे अनेकदा आरोग्य बिघडते. म्हणून अशा गोष्टी आपण स्वतः शिकायला हव्यात, आप्तांना सांगायला हव्यात. कारण आपले शरीर आणि जबाबदारी, दोन्ही आपलेच आहेत.
2 Comments
Very informative…if one implements will keep medicines away
डॉक्टर , नमस्ते. तुमची माहिती नेहमीच उपयोगी आणि ज्ञानवर्धक असते. साध्या , सोप्या शब्दांंत तुम्ही सांगता. धन्यवाद.