कैलास मानसरोवर यात्रा ही तब्बल 5 वर्षांच्या मोठ्या अंतरानंतर पुन्हा सुरू करण्यात आली आहे. सोमवार, 30 जून 2025 पासून ही यात्रा लिपुलेख खिंडीतून सुरू होत आहे.
18 हजार फूट उंचीवर असणाऱ्या कैलास पर्वत आणि मानसरोवरची ही यात्रा अनेक धर्मियांमध्ये खूप पवित्र मानण्यात येते. या यात्रेत शेकडो भाविक खूप कठीण प्रवास करून तिथे पोहोचतात.
हिंदू, बौद्ध, जैन आणि तिबेटमधील बॉन या सगळ्या धर्मांमध्ये मानसरोवर तलाव आणि कैलास पर्वताला खूप पवित्र मानलं जातं. हिंदूंसाठी कैलास पर्वत हे भगवान शंकराचे निवासस्थान आहे आणि मानसरोवर त्यांच्यासाठी पवित्र ठिकाण आहे. या यात्रेला गेली पाच वर्ष विराम दिला होता. हा विराम आता रहीत केल्यामुळे भारतीयांची या पवित्र स्थळांना भेट देण्याची प्रतीक्षा आता संपली आहे. चला तर मग, या आध्यात्मिक यात्रेबद्दल थोडक्यात जाणून घेऊया.
खरंतर हा प्रवास खूपच खडतर आणि कठीण आहे. पण तरीही अनेक भाविकांसाठी ही एक अशी यात्रा आहे, जी आयुष्यात एकदा तरी करावी अशी त्यांची मनापासून इच्छा असते.
कैलास मानसरोवर म्हणजे काय?
मानसरोवर तलाव हा तिबेटमधील न्गारी प्रांतामध्ये कैलास पर्वताजवळ असलेला गोड्या पाण्याचा तलाव आहे. तिथले स्थानिक लोक याला ‘मापाम युमत्सो’ असं म्हणतात. हा तलाव तब्बल 4,600 मीटर उंचीवर आहे. आपल्या हिंदू धर्मात असं मानलं जातं की, ब्रह्मदेवाने हा तलाव तयार केला आहे आणि या तलावातील पाण्यात माणसाला ‘पवित्र’ करण्याची शक्ती आहे.
कैलास पर्वत भगवान शंकराचं निवासस्थान मानलं जातं. 6,638 मीटर उंच असलेलं हे शिखर बौद्ध धर्मातही खूप पूजनीय आहे. बौद्ध धर्मीय याला ‘माउंट मेरु’ म्हणतात. बौद्ध धर्मानुसार, इथेच आध्यात्मिक ऊर्जा मुख्य रूपात मिळते. जैन धर्मीयांसाठी, त्यांचे तीर्थंकर ऋषभदेव यांना ‘माउंट अष्टापद’ नावाच्या ठिकाणी मोक्ष मिळाल्याचं मानलं जातं, आणि तेही कैलास पर्वतच आहे असं म्हणतात.
कैलास मानसरोवर यात्रेचे मार्ग
2020 मध्ये, जेव्हा कोविड-19 महामारी आली, तेव्हा कैलास मानसरोवर यात्रा थांबवण्यात आली होती. पण लॉकडाउन संपल्यावर ही यात्रा लगेच सुरू झाली नाही. याचं मुख्य कारण होतं भारत आणि चीनमधील तणाव. विशेषतः 2020 मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षामुळे दोन्ही देशांमधील संबंध बिघडले होते.
पण, चांगली गोष्ट अशी की गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भारत आणि चीनच्या संबंधांमध्ये थोडी सुधारणा झाली. त्यानंतर, ही यात्रा पुन्हा सुरू करण्याबद्दल चर्चा सुरू होती. त्यानंतर आता ही यात्रा सुरू झाली आहे.
भारतातून मानसरोवर तलावापर्यंत पोहोचण्यासाठी भाविकांसाठी दोन मुख्य मार्ग
1. सिक्कीममधील नाथू ला खिंड
ही खिंड 4,310 मीटर उंचीवर आहे आणि ती सिक्कीम आणि तिबेटच्या सीमेवर आहे. या मार्गाचा एक फायदा असा की, हा मार्ग गाड्यांसाठी पूर्णपणे खुला आहे. त्यामुळे मानसरोवर तलावापर्यंत पोहोचण्यासाठी जवळजवळ 1,500 किलोमीटरचा प्रवास गाडीतून करता येतो. या मार्गाने गेलेल्या भाविकांना कैलास पर्वताची आणि सरोवराची परिक्रमा करण्यासाठी फक्त 35-40 किलोमीटर चालावे लागते.
2. उत्तराखंडमधील लिपुलेख खिंड
ही खिंड भारत, नेपाळ आणि चीन या तीन देशांच्या सीमेजवळ आहे. उत्तराखंड आणि तिबेटच्या सीमेपासून तलाव सुमारे 50 किलोमीटर दूर आहे. पण या मार्गावरील रस्ता खूप खडबडीत आहे, त्यामुळे प्रवास थोडा कठीण आहे. या मार्गात जवळपास 200 किलोमीटर ट्रेकिंग करावी लागते.
या यात्रेत सहभागी होण्यासाठी काही नियम आहेत. फक्त 18 ते 70 वयोगटातील लोकांनाच या यात्रेत जाण्याची परवानगी आहे. ही यात्रा पूर्ण व्हायला साधारणपणे 20 दिवसांपेक्षा जास्त दिवस लागतात. त्यामुळे, यात्रेकरू शारीरिक आणि वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त असले पाहिजेत आणि त्यांच्याकडे वैध भारतीय पासपोर्ट असणं गरजेचं आहे.
यंदा 750 भारतीय यात्रेकरू करणार प्रवास
यंदा एकूण 750 भारतीयांना या यात्रेसाठी परवानगी मिळाली आहे. ही यात्रा जून ते ऑगस्ट या महिन्यांदरम्यान असेल. हे यात्रेकरू 15 वेगवेगळ्या गटांमध्ये प्रवास करतील. ते सिक्कीममधील नाथू ला खिंड आणि लिपुलेख खिंडीतून तिबेटमधील पवित्र स्थळावर पोहोचतील. सिक्कीममधील नाथू ला खिंडीतून 36 भारतीय यात्रेकरूंचा पहिला गट कैलास पर्वत आणि मानसरोवर तलावाला भेट देऊन सुखरूप परतला आहे.
आज , 30 जून 2025 रोजी, पिथौरागढ जिल्ह्यातील लिपुलेख खिंडीतून यात्रेला सुरुवात होत आहे. या मार्गाने या वर्षी 50 यात्रेकरूंचे 5 गट तयार केले आहेत. म्हणजेच एकूण 250 यात्रेकरू कैलास मानसरोवरला भेट देणार आहेत.
यात्रेकरू दिल्लीहून वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर प्रवासाला निघतील. पिथौरागढचे जिल्हाधिकारी विनोद गोस्वामी यांनी पीटीआयला PTI ला दिलेल्या माहितीनुसार, एका रात्रीसाठी टनकपूरमध्ये मुक्काम केल्यानंतर, हे यात्रेकरू 5 जुलै रोजी धारचुला बेस कॅम्पवर पोहोचतील आणि दुसऱ्या दिवशी गुंजी कॅम्पसाठी निघतील.
गुंजी येथे उंच ठिकाणी आल्यावर यात्रेकरूंची पुन्हा एकदा वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. तसंच वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी यात्रेकरूंना दोन दिवस तिथे राहावे लागणार आहे. त्यानंतर तिबेटमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांची वैद्यकीय तपासणी पुन्हा नाभीडांग इथे केली जाईल.
कैलास मानसरोवर यात्रा ही यात्रेकरूंसाठी मनाला शांतता आणि समाधान देणारी आहे. पण हा प्रवास खूप आव्हानात्मक आणि कठीण आहे.
यात्रेकरूंनी काय काळजी घ्यावी?
– जर तुम्ही या पवित्र यात्रेला जाण्याचा विचार करत असाल, तर काही महत्त्वाच्या गोष्टी तुमचा सोबत असणं गरजेचं आहे.
– आपली ओळखपत्रं, परमिट, प्रथमोचारातील औषधे सोबत ठेवा.
– शरीरात उब टिकून राहिल असे कपडे घालावेत आणि उबदार कपड्यांचे अधिकचे जोड सोबत असावेत.
– प्रवासात शरीरातील शक्ती, उत्साह टिकून राहावा याकरता प्रोटिनयुक्त कोरडा खाऊ जवळ असावा.
– रात्रीच्यावेळी किंवा अंधारात चालण्यासाठी टॉर्च सोबत असणं गरजेची आहे.
– ट्रेकिंग करताना आधार मिळावा म्हणून ट्रेकिंग स्टिक सोबत ठेवल्यास तुम्हाला त्याची मदत होईल. स्नीकर्सऐवजी मजबूत ट्रेकिंग शूज घाला आणि गरम मोजे सोबत ठेवा.