जर तुम्ही शिक्षणासाठी, नोकरीसाठी किंवा फक्त फिरायला अमेरिकेला जाण्याचा विचार करत असाल, तर आता तुम्हाला ही नवीन गोष्ट करावी लागणार आहे. तुमच्या सोशल मीडिया अकाउंट्सची माहिती अमेरिका सरकारला द्यावी लागणार आहे.
अमेरिकेला तुमच्या सोशल मीडियाची माहिती का हवी आहे?
तुम्हाला वाटेल की अमेरिकेला आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सची काय गरज. पण यामागे त्यांची काही खास कारणं आहेत.
1. देशाची सुरक्षा
अमेरिकेसाठी त्यांच्या देशाची सुरक्षा खूप महत्त्वाची आहे. अमेरिकेत येणाऱ्या परदेशी नागरिकांमधील एखादी व्यक्ती अमेरिकेसाठी किंवा तिथल्या नागरिकांसाठी धोकादायक नाही ना, त्या व्यक्तीचे विचार दहशतवादाशी संबंधित तर नाहीत किंवा या व्यक्ती समाजात अशांतता निर्माण करू शकतात का, हे तपासण्यासाठी अमेरिकेला ही माहिती हवी आहे.
2. ट्रम्प सरकार
डोनाल्ड ट्रम्प यांनी परदेशी नागरिकांच्या बाबतीत काही नियम खूप कडक केले आहेत. बेकायदेशीर स्थलांतर थांबवण्यावर त्यांचा भर आहे. अनधिकृतरित्या अमेरिकेत येणाऱ्या लोकांना पकडण्यासाठी ट्रम्प वेगवेगळ्या उपाययोजना करत आहेत. लोकांच्या सोशल मीडियावरिल माहितीतून एखादी व्यक्ती अमेरिकेत कोणत्या उद्देशाने येत आहे हे समजू शकेल.
3.कॉलेजमधील निदर्शनं आणि विरोध
सध्या अमेरिकेतील अनेक कॉलेजमध्ये वेगवेगळ्या गोष्टींवरून मोठी आंदोलनं सुरू आहेत. विशेषतः इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या वादावरून खूप निदर्शनं होत आहेत. इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट (ICE) या सरकारी संस्थेच्या विरोधातही आवाज उठवला जात आहे. या आंदोलनांमध्ये अनेक विद्यार्थी सहभागी होत आहेत. यामुळे अमेरिकन सरकारला सोशल मीडियावर लोक काय बोलतात, त्यांचे राजकीय विचार काय आहेत, ते सरकारबद्दल काय विचार व्यक्त करतात किंवा त्यांचे काही कट्टर विचार आहेत का, हे तपासणं महत्त्वाचं वाटत आहे. त्यामुळे ज्या लोकांचे विचार अमेरिकेच्या धोरणांविरुद्ध आहेत किंवा जे समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करतील अशा लोकांना ‘फिल्टर’ करण्याचा अमेरिकन सरकारचा प्रयत्न आहे.
तुम्हाला कोणती माहिती द्यावी लागेल?
यामध्ये महत्त्वाचा प्रश्न हा आहे की, तुम्हाला नक्की कोणती माहिती द्यायची आहे. याबद्दल, अमेरिकेच्या दूतावासाने (US Embassy) स्पष्ट सांगितलं आहे की, तुम्हाला गेल्या पाच वर्षांत तुम्ही वापरलेल्या प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचं युझरनेम किंवा हँडल द्यावे लागतील. यात फक्त मोठे सोशल मिडिया प्लॅटफॉर्म नाहीत, तर छोटे-मोठे प्लॅटफॉर्म पण आहेत, ज्याची माहिती तुम्हाला द्यावी लागणार आहे. उदाहरणार्थ, फेसबुक, एक्स, इंस्टाग्राम, लिंक्डइन, युट्यूब, थ्रेड्स, रेडिट, टम्बलर.
याशिवाय, तुम्हाला चीनमधील काही प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जसे की टिकटॉक आणि वीचॅट यांची माहिती पण द्यावी लागू शकते. तसेच ब्लूस्काय, तुम्ही लिहिलेले काही ब्लॉग किंवा तुमची वैयक्तिक वेबसाईट असेल, तर त्याची माहितीही द्यावी लागेल.
म्हणजेच, अमेरिकन अधिकारी तुमच्या सोशल मीडियावरील तुमच्या सर्व पोस्ट्स, अपलोड केलेले फोटो/व्हिडिओ, इतरांना दिलेली रिप्लाय, जुन्या कमेंट्स, स्टेटस अपडेट्स, तुम्हाला टॅग केलेल्या पोस्ट्स/फोटो आणि तुम्ही लाईक केलेलं पोस्ट्स या सर्व गोष्टी तपासल्या जाऊ शकतात. म्हणजेच, तुम्ही ऑनलाइन काय करता, कशाबद्दल बोलता, तुमचे मित्र कोण आहेत, हे सगळं बघितलं जाईल.
तुमच्या सोशल मीडिया खात्यांना ‘पब्लिक’ का करायचं?
अमेरिकन दूतावासाने असंही सांगितलं आहे की, तुम्हाला तुमच्या सोशल मीडिया खात्यांचे प्रायव्हसी सेटिंग्स ‘पब्लिक’ करावे लागतील. ‘पब्लिक’ म्हणजे तुमची प्रोफाइल आणि तुम्ही पोस्ट केलेली माहिती कोणालाही दिसू शकेल अशी करायची आहे. असं केल्यास अमेरिकन अधिकाऱ्यांना तुमची ओळख पटवणं आणि तुम्ही अमेरिकेत येण्यास पात्र आहात की नाही, हे ठरवणं सोपं जाईल.
आधी हे नियम फक्त काही ठराविक व्हिसासाठी होते, पण आता F, M किंवा J नॉन-इमिग्रंट व्हिसा आणि DS-160 व्हिसा अर्जदारांसाठीही ते लागू झाले आहेत. यामध्ये शिक्षण आणि नोकरीसाठी अमेरिकेत जाणाऱ्या भारतीयांचाही समावेश आहे.
यावर आपण काय उपाय करू शकतो?
तुमच्या सोशल मीडिया खात्यांना ‘पब्लिक’ करण्यापूर्वी आणि ती माहिती अमेरिकन अधिकाऱ्यांना देण्यापूर्वी, तुम्ही तुमच्या खात्यांमधून संवेदनशील किंवा वैयक्तिक माहिती हटवू शकता. म्हणजे, ज्या पोस्ट्स किंवा फोटोंमुळे तुम्हाला काही अडचण येऊ शकते असं वाटतं, त्या पोस्ट तुम्ही डिलीट करू शकता.
आपलं सोशल मीडिया अकाउंटच डिलीट करून टाकावं म्हणजे आपल्याला काहीच माहिती द्यावी लागणार नाही, असा विचार तुम्ही करत असाल. पण हे पूर्णपणे सुरक्षित नाही, कारण अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स तुम्ही अकाउंट डिलीट केल्यानंतरही तुमचा डेटा काही आठवडे किंवा महिन्यांपर्यंत साठवून ठेवतात. त्यामुळे, जुनी डिलीट केलेली माहिती पण तपासणीत दिसू शकते.
तुम्हाला तुमची सोशल मीडिया खाती किती काळ पब्लिक ठेवावी लागतील, याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती नाही. पण सुरक्षित राहण्यासाठी, तुम्ही तुमचा व्हिसा अर्ज भरल्यापासून ते तुम्हाला व्हिसा मिळेपर्यंत आणि तुम्ही अमेरिकेत पोहोचेपर्यंत तुमचे अकाउंट्स पब्लिक ठेवू शकता.
हा नियम कायदेशीर आहे का?
अमेरिका तुम्हाला तुमची सोशल मीडिया खाती पब्लिक करण्यासाठी किंवा त्यांची माहिती देण्यासाठी सक्ती करू शकत नाही. पण जर तुम्ही हे नियम पाळले नाहीत, तर तुमचा व्हिसा मिळण्यास उशीर होऊ शकतो किंवा तुमचा व्हिसा अर्ज नाकारलाही जाऊ शकतो.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) यावर म्हटलं आहे की, प्रत्येक व्हिसाचा निर्णय हा ‘राष्ट्रीय सुरक्षा’ लक्षात घेऊनच घेतला जाईल. आणि भारतीय नागरिकांच्या व्हिसा अर्जांवर त्यांच्या गुणवत्तेनुसार निर्णय घेतला जाईल. तुमचा अर्ज पूर्णपणे तपासला जाईल आणि मगच व्हिसाबद्दल निर्णय घेतला जाईल.