निवृत्ती कधी घ्यावी हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे. मात्र निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी योग्य आणि पुरेशी बचत करुन ठेवणं अतिशय गरजेचं आहे. आज आपण काम करण्यासाठी सक्षम आहोत, चांगली नोकरी हातात आहे, म्हणून निवृत्तीचं वय 60 चं असेल असं बरेच जण गृहीत धरतात. त्यामुळे एवढ्या लवकर निवृत्तीच्या तयारीचा विषयच कशाला? असा प्रश्नही तुमच्या मनात डोकावला असेल. पण बदलती परिस्थिती पाहता निवृत्तीचं वय हे 60 वरुन 45 वर कधी येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे प्रत्यक्षात जरी 45 व्या वर्षी नोकरीतून आपण निवृत्त होत नसलो तरिही, निवृत्तीची तयारी आतापासून कशी केली पाहिजे याबद्दल चार्टर्ड अकाउंटंट कनान बहल यांनी लिंक्डइनवर एक चांगली पोस्ट शेअर केली आहे. पाहुयात ते निवृत्तीच्या वयाबद्दल आणि निवृत्तीची तयारी कशी करावी याबद्दल काय म्हणतात.
नोकरीची शाश्वती
मध्यमवर्गीय व्यक्ती हे नोकरीच्या कचाट्यातून शक्य तितक्या लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी लवकरात लवकर निवृत्तीचा मार्ग स्वीकारण्याचा विचार करत असतात. आज जर तुमच्याकडे स्थिर आणि मोठ्या पगाराची नोकरी असेल तर तुम्ही हा विचार करु शकता. स्पर्धा खूप वाढली आहे. दररोज नवनव्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. तर तितक्याच प्रमाणात पारंपरिक वा आधी ज्या कामांना खूप महत्त्व होतं, अशा नोकऱ्या बाद होत आहेत. त्यामुळे जरी स्थिर नोकरी असली तरी नवनवीन स्किल्स शिकत राहणं, ते वापरता येणं गरजेचं आहे. तुम्ही अपडेटेड नसाल, तुम्हांला बदलांसोबत बदलता येत नसेल तर तुमची नोकरी कोणत्याही क्षणी धोक्यात येऊ शकते. त्यामुळे जिथे तुम्ही स्वत:हून निवृत्त होऊ इच्छिता, तिथे कदाचित तुम्हाला तुम्ही अपडेटेड नसल्यामुळे नोकरी वरुन कमी केल्यामुळे आणि आता नवीन नोकरी शोधून ती करण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे तुम्हाला निवृत्ती घ्यावी लागू शकते. जर अशी परिस्थिती निर्माण झाली आणि तुम्हाला तुमच्या वयाच्या 45 ते 55 या वयात निवृत्ती घ्यावी लागली तर काय? यासाठी तुम्ही तयार असणं गरजेचं आहे. आणि यासाठी आवश्यक आहे सेव्हिंग्ज आणि गुंतवणूक.
ज्यावेळेला तुम्ही तुमच्या करिअरच्या उच्च टोकाला असता त्यावेळी तुमच्या पगारातला जास्त हिस्सा हा तुम्ही तुमच्या भविष्यासाठी राखून ठेवणं गरजेचं आहे. यासाठी सेव्हिंग्ज आणि गुंतवणूक हे पर्याय स्वीकारणं आवश्यक आहे.
खर्चाचा ताळेबंद
आपल्या आधीच्या पिढ्यातील अस्थिरतेपेक्षा आपलं आयुष्य खूपच अस्थिर झालं आहे. कोणत्याही क्षणी काहीही घडू शकतं. कोरोना महामारीनंतर ‘आयुष्य खूप छोटं आहे. उद्या काय घडेल काही सांगता येत नाही. म्हणून मौज करा, इच्छा पूर्ण करा, जिथे फिरायचं आहे तिथे फिरुन घ्या’ अशा सगळ्या थेअरीज प्रसिद्ध झाल्या होत्या. आजही अनेकजण जगण्याचा हाच मूलमंत्र जपत खाण्या-पिण्यावर, फिरण्यावर, उच्च जीवनशैली जगण्यावर मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करत आहेत. पण आयुष्य हे अस्थिर आहे. आज आपण पैसा कमवत आहोत, उद्या जर नोकरी नाही राहिली, आपला व्यवसाय बंद पडला तर काय? याचा विचार कमी केला जातो. आयुष्य हे याही बाबतीत अस्थिर आहे याची जाणीव ठेवून आज मिळणाऱ्या पैशाचं योग्य नियोजन करुन वापरणं अत्यावश्यक आहे.
आजची झेन झी (Gen – Z) पिढी लाईव्ह कॉन्सर्ट पाहण्यासाठी मित्र मैत्रिणींकडून उधारीवर पैसे घेत असतात. तर मध्यम वयातली तरुण मुलं गाड्या घेण्यासाठी वा प्रत्येक विकअंडला फिरायला, पार्टीला जाण्यासाठी आपला पगार खर्च करत असतात. मात्र, हे करताना गुंतवणुकीसाठी पगाराचा वापर करण्यावर पूर्ण दुर्लक्ष केलं जात आहे.
गुंतवणूक वा सेव्हिंग्ज कशी करावी?
सुरक्षित गुंतवणूकीसाठी दर महिन्याला तुमच्या पगारातून ईपीएफ (एम्पॉयी प्रोव्हिडंट फंड) किंवा एनपीएस (नॅशनल पेन्शन स्कीम) योजनांमध्ये निवृत्तीसाठी बचत करु शकता. या दोन योजनांतील बचतीवर कर सवलतही मिळते. तसेच तुमचा पैसा दीर्घकाळ सुरक्षित राहतो. निवृत्तीनंतर तुम्हाला हा निधी पेन्शन स्वरुपात मिळतो. तर तुमच्या मृत्यूपश्चात 40 टक्के निधी हा कुटुंबियांना दिला जातो.
येत्या काही काळामध्ये भारतामध्ये निवृत्तीच्या वयात असलेल्या ज्येष्ठाचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. त्याचवेळी त्यांच्यासाठी सोईसुविधा, त्याचा खर्च, आरोग्य खर्च अशा सगळ्या गोष्टींचा ताण पडणार आहे. निवृत्तीसाठी आर्थिक तरतूद केली नाही तर, त्याची झळ सोसावी लागते. त्यामुळे आत्ताच आपल्या पगारातून सेव्हिंग्ज वा गुंतवणुकीच्या माध्यमातून निवृत्तीसाठी तयारी करणं गरजेचं आहे.