उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेने युतीची घोषणा केलीय. या युतीला ‘शिवशक्ती-भीमशक्ती’ असं संबोधण्यात येतंय. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि विशेषतः मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही युती शिंदेंसाठी महत्त्वाची ठरू शकते. हे समीकरण वर वर सहज सोपं दिसत असलं तरी या युतीपुढे अनेक आव्हानं असणार आहेत.
दोन्ही पक्षांची गरज
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आगामी निवडणुकांमध्ये आपला जनाधार वाढवण्यासाठी आणि विशेषतः मुंबई महानगरपालिकेत पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी मजबूत सामाजिक आधाराची गरज आहे. शिवसेना पारंपरिकपणे मराठी मतांवर अवलंबून आहे, परंतु उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेमुळे मराठी मतांमध्ये विभाजन होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, दलित आणि वंचित समाजाच्या मतांचा आधार मिळवण्यासाठी शिंदे यांनी आनंदराज आंबेडकर यांच्यासोबत युती केलीय. ही युती शिंदे गटाला दलित समाजात प्रवेश मिळवून देऊ शकते, जो आतापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससारख्या पक्षांचा पारंपरिक मतदारसंघ राहिला आहे.
दुसरीकडे, आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेला मुख्य प्रवाहातील राजकारणात आपलं स्थान निर्माण करण्यासाठी मोठ्या राजकीय व्यासपीठाची गरज आहे. मागील बऱ्याच काळापासून आनंदराज आंबेडकर हे आपलं राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी धडपडत आहेत. त्यासाठी त्यांनी अनेक राजकीय प्रयोगही केले पण त्यात त्यांना यश आलं नाही. दुसरीकडे आनंदराज यांचे मोठे बंधू प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने दलित आणि वंचित समाजात आपलं भक्कम स्थान बनवलंय. अनेक निवडणुकीत त्यांचा जनाधार दिसून आलाय. त्यामुळे शिवसेनेशी युती करून वंचितला आव्हान देण्याची आणि आपली राजकीय ताकद दाखवण्याची संधी आनंदराज यांना यानिमित्ताने मिळू शकते. शिवसेनेची राज्यभरातील ताकद, संघटनेचं जाळं आणि सत्तेचा फायदा रिपब्लिकन सेनेला आगामी निवडणुकीत होऊ शकतो.
शिवशक्ती-भीमशक्ती समीकरण
ही युतीमुळे ‘शिवशक्ती-भीमशक्ती’ समीकरण पुन्हा एकदा चर्चेत आलंय. शिवसेनेची मराठी अस्मिता आणि रिपब्लिकन सेनेची आंबेडकरी विचारधारा यांचा संगम जोड घालण्याचा प्रयत्न याआधीही झालाय. 3 वर्षांपूर्वी प्रबोधनकार डॉट कॉम नावाच्या वेबसाईटच्या लोकार्पण प्रसंगी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर हे एका व्यासपीठावर आले होते. त्यावेळी दोन्ही पक्षांच्या युतीच्या चर्चा रंगल्या होत्या. दोन्ही नेत्यांच्या एकत्र येण्यामागे प्रबोधनकार ठाकरे आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या मैत्रीचा धागा होता. त्यावेळी शिवशक्ती भीमशक्ती एकत्र येणार अशा चर्चा रंगल्या होत्या. आता पुन्हा एकदा शिंदेंची शिवसेना आणि आनंदराज आंबेडकर यांची युती ही सुद्धा शिवशक्ती भीमशक्तीचं नवं समीकरण असल्याचं बोललं जातंय.
एकनाथ शिंदे यांनी ही युती केवळ राजकीय नसून सामाजिक परिवर्तनासाठी असल्याचं म्हटलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीची ही जोडणी महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय पटलावर नवं समीकरण निर्माण करू शकते. मराठी आणि दलित मतांचं एकत्रीकरण करून ही युती मुंबईसह इतर शहरी आणि ग्रामीण भागात प्रभावी ठरू शकते.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, विशेषतः मुंबई महानगरपालिकेची निवडणूक, ही युतीसाठी मोठी कसोटी ठरणार आहे. मुंबईत शिवसेनेचा पारंपरिक प्रभाव आहे, परंतु ठाकरे गट आणि मनसेच्या संभाव्य युतीमुळे शिंदे गटाला नव्या रणनीतीची गरज आहे. या युतीमुळे शिंदे गटाला दलित मतांचा पाठिंबा मिळू शकतो, ज्यामुळे मुंबई आणि ठाणे यासारख्या शहरी केंद्रांमध्ये त्यांचा प्रभाव वाढू शकतो. तसंच, जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही ही युती ग्रामीण भागात दलित समाजाला आकर्षित करू शकते.
हेही वाचा : ‘आवाज मराठीचा’ नांदी ठाकरेंच्या पुनर्मिलनाची!
आंबेडकर घराण्यातील फूट आणि ‘वंचित’ची टीका
आनंदराज आंबेडकर आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातील मतभेद या युतीमुळे पुन्हा एकदा उघड झाले आहेत. युतीची घोषणा होताच वंचित बहुजन आघाडीने रिपब्लिकन सेनेसोबतचे सगळे संबंध तोडून टाकलेत. सोबतच आनंदराज यांच्यावर आंबेडकरी जनतेशी विश्वासघात केल्याचा आरोप केला आहे. आनंदराज आंबेडकर की संविधान हा निर्णय आता आंबेडकरी जनतेनं घ्यावा, असं आवाहन वंचितने केलंय. ही फूट आंबेडकर घराण्याच्या राजकीय वारशाला आव्हान देणारी ठरू शकते. यामुळे दलित मतांमध्ये विभागणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शिवसेना-रिपब्लिकन सेनेच्या युतीचं भविष्य काय?
या युतीचं भविष्य अनेक घटकांवर अवलंबून आहे. दोन्ही पक्षांच्या विचारसरणींमधील वैचारिक फरकांमुळे कार्यकर्ते आणि मतदार या युतीला कितपत स्वीकारतील हा प्रश्नच आहे. दुसरीकडे आनंदराज आंबेडकर यांच्या राजकीय मर्यादा स्पष्ट आहेत. त्यांच्या पक्षाचं मुंबईत आणि राज्यात फारसं संघटन नाही. स्पष्ट जनाधार नाही. मतदारसंघ नाही. ते स्वतः निवडणुकीत अनेकदा पराभूत झाले आहेत. पक्षात दुसऱ्या तिसऱ्या फळीतील नेते आणि कार्यकर्ते यांचा अभाव आहे. केवळ बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव आणि दलीत नेतृत्व यावर त्यांचा पक्ष आधारलेला आहे. त्यामुळे निवडणुकीत ते किती प्रभाव दाखवू शकतील यावर साशंकता आहे.
शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर आधीच ‘रिपाइं’ नेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांची युती आहे. कवाडे यांचे पुत्र जयदीप हे शिवसेनेच्या कोट्यातून महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आहेत. दुसरीकडे ‘रिपाइं नेते रामदास आठवले हे दशकभराहून अधिक काळ भाजपसोबत आहेत. अशात शिंदेंनी आपल्यासाठी नवा रिपब्लिकन मित्र जोडल्याने यावर भाजपची काय भूमिका असेल ते देखील बघणं महत्वाचं असेल.
प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितने आतापासूनच या युतीविरोधात रान पेटवण्यास सुरुवात केलीय. त्यामुळे विरुद्ध विचारसरणीशी जुळवून घेत सोयीचं जागावाटप पदरात पाडून घेणं आणि जनाधार कायम ठेवत तो निवडणुकीत दाखवून देणं हे आनंदराज आंबेडकर यांच्यापुढे मोठं आव्हान असणारं आहे आणि यावरच या युतीचं भविष्य अवलंबून असेल