दैनंदिन जीवनात घडणाऱ्या काही घटना या आपल्या आयुष्यावर दूरगामी परिणाम करतात हे आपल्याला ठाऊक आहे. पण अशा काही आघात करणाऱ्या घटनाच नाही तर, आपल्या मुलांकडे दुर्लक्ष करणं हेही धोकादायक आहे. बाल्यावस्थेत मुलांकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर, त्याचा थेट परिणाम हा त्यांच्या मेंदूच्या रचनेवर आणि त्या बालकाच्या रोगप्रतिकार शक्तीवरही खोलवर होतो.
त्यामुळे अलीकडे मानसोपचारतज्ज्ञ आवर्जून सांगतात की, “तुम्ही तुमच्या पाल्यांना केवळ मोठं करु नका तर, त्यांचं संगोपन करुन त्यांना जपा.”
संशोधन नेमकं काय म्हणते?
माणसाच्या शेवटच्या घटकेपर्यंत मेंदूची विकास प्रक्रिया सुरूच असते. मात्र, वय वर्ष 0 ते 5 वर्षापर्यंत मेंदूचा विकास हा झपाट्याने होत असतो. त्यामुळे बाल्यावस्थेच्या या काळात जर काही घटना घडल्या तर, त्याचा थेट परिणाम मेंदूच्या रचनेवर आणि त्या बालकाच्या रोगप्रतिकार शक्तीवरही होतो.
हा जो काही परिणाम होतो, मग तो सकारात्मक असो वा नकारात्मक परिणाम असो, त्यात पुन्हा बदल करता येत नाही. थोडक्यात नादुरुस्त होणारा हा कायमस्वरुपी बदल असतो. बाल्यावस्थेत असलेल्या त्या मुलांचं संपूर्ण आरोग्य आणि आयुष्य अशा बदलांमुळे प्रभावीत होते. प्रत्येक प्रकारची प्रतिकूल परिस्थिती ही मेंदूची रचना आणि रोगप्रतिकारक शक्तीचं कार्य कायमस्वरुपी बदलू शकते.
डॉ. सारा पोलेट्टी यांनी नेतृत्व केलेलं हे संशोधन ब्रेन मेडिसिनने प्रकाशित केलं आहे.
हे ही वाचा : मेंदू तल्लख ठेवायचा आहे? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला!
बालपणातील दुर्लक्षपणाचा नेमका काय परिणाम होतो?
या संशोधनामध्ये असं आढळून आलं आहे की, बालपणात ज्या घटनांचा आघात होतो किंवा त्यासारखे अनुभव वारंवार येतात (जसं की, दुर्लक्ष, मानहानी, ओरडणं, चिडवणं) त्यामुळे दीर्घकालीन न्यूरोइंफ्लेमेशन होऊ शकते. न्यूरोइंफ्लेमेशन ही शरीराच्या रोगप्रतिकार शक्तीची एक प्रतिक्रिया आहे. जी मेंदूला हानी पोहोचवणाऱ्या घटकांविरुद्ध लढण्यासाठी सक्रिय होते. या प्रतिक्रियात्मक घटकावरच वर उल्लेख केलेल्या घटनांमुळे धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे नैराश्य, बायपोलर डिसऑर्डर आणि चिंता, तणाव यासारख्या मानसिक आजार होऊ शकतात. किंवा भविष्यात हे आजार होण्याची शक्यता वाढते.
या निष्कर्षांवरून असं दिसून येतं की, हे रोगप्रतिकारक बदल हे ‘बायोलॉजिकल मार्कर’ म्हणून काम करू शकतात. यामुळे ज्या बालकांना मानसिक आजार होण्याची शक्यता आहे. त्याचं निदान करुन लवकर त्याच्यावर उपचार करता येऊ शकतात.
या संशोधनाचा फायदा
डॉ. पोलेट्टी यांच्या टीमने न्यूरोइमेजिंग, अनुवांशिक विश्लेषण आणि इम्यूनोलॉजी एकत्र करून त्याचा शरीरावर कशाप्रकारे आघात होतो, हे शोधून काढलं. त्यांच्या या संशोधनामुळे सुरूवातीच्या प्रतिकूल परिस्थितीशी संबंधित विशिष्ट दाहक खूणा ओळखण्यात आल्या. याचा उपयोग मानसोपचार क्षेत्रात अचूक उपचार पद्धत शोधून काढताना झाला.
उपचार धोरणांपासून ते सार्वजनिक आरोग्य चौकटीपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी संभाव्य परिणामांसह, बालपणीचे आघात मेंदू आणि शरीराला किती खोलवर आकार देऊ शकतात हे समजून घेण्यासाठी हा अभ्यास एक महत्त्वाचा टप्पा दर्शवितो.
हे ही वाचा : खरंच ChatGPT मेंदूला आळशी करतं का?
केवळ वैद्यकीय उपचार पुरेसा नाही
वैद्यकीय उपचारा पलीकडे, मानसिक आजार होण्याची मूळ कारणं शोधून त्याविषयी जनजागृती करणे, मनावर, मेंदूवर आघात होतील असं वातावरण समाजात आणि कुटुंबात नसावं यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबवणे गरजेचं आहे. यासाठी वेळोवेळी कौटुंबिक मार्गदर्शन, पालक-पाल्यामधला संवाद अशा काही प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं आवश्यक असल्याचं या संशोधनात स्पष्ट केलं आहे.
अनेकदा आपण लहान मुलांचा संताप सहन न झाल्यामुळे मुलांवर चिडतो, ओरडतो, त्यांना मारतो, त्यांच्यावर अयोग्य शब्दांत राग व्यक्त करतो. मात्र, अशा घटना वारंवार घडू लागल्यावर त्याचा मुलांवर नकळत परिणाम होत जातो. कौटुंबिक वाद-विवादासारख्या घटनांचाही त्यांच्या मेंदूच्या विकासावर परिणाम होतो.
मुलांच्या मेंदूचा विकास आणि त्यांची जडण-घडण ही केवळ कौटुंबिक वातावरणापुरती मर्यादित वा अवलंबून नसते. तर आजूबाजूची सामाजिक परिस्थिती, मुलं ज्यांच्या संपर्कात येतात त्या प्रत्येक ठिकाणाचा आणि व्यक्तिंचा वागण्याचा परिणाम हा मुलांवर होत असतो. याची जाणीव ठेवून मुलांना योग्य प्रकारे वागणूक देणं नितांत गरजेचं असल्याचं या संशोधनातून स्पष्ट होतं.