अनेक दिवसांपासून कोकणवासी ज्या गोष्टीची वाट बघत होते त्याबद्दल अखेर कोकण रेल्वेकडून अधिकृत माहिती देण्यात आली आहे. कोकण रेल्वेकडून गणपतीमध्ये कोकणात जायला खास ‘रो-रो’ (Roll-on Roll-off) कार सेवा सुरू केली आहे. त्यामुळे आता तुम्ही आणि तुमची कार थेट ट्रेनमध्ये ठेवून आरामात ट्रेनमधून प्रवास करू शकणार आहात.
कोकण रेल्वेने 1999 सालापासून मोठ्या ट्रक्ससाठी ‘रो-रो’ सेवा सुरू केली होती. यामध्ये मोठे ट्रक थेट ट्रेनमध्ये चढवून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवले जायचे.आता हीच खास सेवा खासगी गाडीमालकांसाठी सुद्धा सुरू करण्यात आली आहे
या सेवेअंतर्गत तुमच्या कारला फ्लॅटबेड रेल्वे वॅगनवर ठेवलं जाईल आणि रेल्वेमार्गे ती कोलाडहून गोव्याच्या वेर्णा स्थानकापर्यंत पोहोचवली जाईल.कारमालक स्वतः प्रवास करत असताना आपली कारही सुरक्षितपणे नेली जाईल, असा विश्वास कोकण रेल्वेने दिला आहे.
सेवा कधी आणि कुठून सुरू होणार?
ही नवीन ‘रो-रो’ कार सेवा 23 ऑगस्ट 2025 पासून महाराष्ट्रातील कोलाड रेल्वे स्टेशनवरून सुरू होईल. आणि गोव्यातील वेर्णा रेल्वे स्टेशनवरून ही ट्रेन 24 ऑगस्ट 2025 पासून सुरू होईल. ही सेवा गणेशोत्सवामध्ये होणाऱ्या गर्दीच्या काळात उपयोगी ठरेल असं म्हटलं जातंय. कारण ही सेवा फक्त 11 सप्टेंबर 2025 पर्यंतच सुरू असणार आहे. रो-रो कर सेवा एक दिवसाआड दोन्ही दिशांना म्हणजे, कोलाडहून वेर्णा आणि वेर्णा येथून कोलाडला धावेल.
प्रवासाची वेळ आणि गाडी जमा कधी करायची?
प्रवासाला निघण्यापूर्वी तीन तास आधी म्हणजेच दुपारी 2:00 वाजता तुमची गाडी संबंधित स्टेशनवर जमा करावी लागेल. त्यानंतर सायंकाळी 5:00 वाजता ही ट्रेन कोलाड स्टेशनवरून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 5:00 वाजता वेर्णा स्टेशनला पोचेल. ही ट्रेन कोलाड आणि वेर्णा दरम्यान मध्ये कोणत्याच स्टेशनला थांबणार नाही.
किती गाड्या घेऊन जाऊ शकणार आणि खर्च किती असेल?
या सेवेसाठी एक विशेष रेल्वे तयार करण्यात आली आहे. या रेल्वेत एका डब्यात 2 गाड्या प्रमाणे एकूण 40 गाड्या घेऊन जाता येतील. एका गाडीसाठी GST सह 7,875 रुपये भाडं आहे. बुकिंग करताना सुरुवातीला तुम्हाला 4,000 रुपये आधी भरावे लागतील आणि उरलेली रक्कम प्रवासाच्या दिवशी भरता येईल.
हेही वाचा : कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर: आता कार घेऊन जा थेट रेल्वेतून!
प्रवाशांसाठीही खास सोय
या रेल्वेतून फक्त तुमची गाडी नाही तर तुम्ही देखील तुमच्या गाडी बरोबर प्रवास करू शकणार आहात. प्रत्येकी एका कारसोबत जास्तीत जास्त तीन प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. हे प्रवासी त्या रो-रो ट्रेनला जोडलेल्या कोचमधून प्रवास करू शकतील. 3AC कोचसाठी प्रति प्रवासी 935 रुपये, तर द्वितीय श्रेणी सिटिंगसाठी प्रति प्रवासी 190 रुपये इतकं शुल्क आकारलं जाईल. यामुळे कारचालक आणि त्यांच्या कुटुंबियांनाही आरामदायी प्रवास करता येणार आहे.
बुकिंग कधी आणि कुठे करायचं?
21 जुलै 2025 पासून यासाठी बुकिंग सुरू झाली असून 13 ऑगस्ट 2025 पर्यंत तुम्ही कधीही बुकिंग करू शकता. तुम्ही जर मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, बोरीवली या परिसरात रहात असाल तर तुम्हाला बुकिंग साठी ‘बेलापूर कार्यालय, मुख्य वाणिज्य व्यवस्थापक, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड, चौथा मजला, बेलापूर भवन, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई 400 614.’ या ठिकाणी जाऊन बुकिंग करू शकता. आणि वेर्णा, गोवा वरून येण्यासाठी तुम्हाला त्याच रेल्वे स्टेशनवर तिकीट बुक करता येईल. बुकिंगसाठी यूपीआय किंवा रोख पैसे देणं हे पर्याय उपलब्ध आहेत.
पण यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे, जर एका ट्रिपसाठी 16 पेक्षा कमी गाड्यांचं बुकिंग झालं, तर ती ट्रिप रद्द केली जाईल. आणि तुम्ही भरलेले नोंदणी शुल्क तुम्हाला पूर्णपणे परत केले जाईल. अधिक माहितीसाठी तुम्ही कोकण रेल्वेच्या https://konkanrailway.com/en वेबसाइटला भेट द्या. किंवा खालील नंबरवर संपर्क साधा, बेलापूर कार्यालय: 9004470973
वेर्णा रेल्वे स्टेशन: 9686656160
मुंबईपासून कोलाडपर्यंतचा प्रवास: सोयीचं की गैरसोयीचं?
मुंबईहून कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेची ‘रो-रो’ सेवा खरंच एक चांगली कल्पना आहे. पण या सेवेचा लाभ घेण्यासाठी असलेल्या अटी पाहिल्या की मनात एक प्रश्न उभा राहतो की ‘रो-रो’ सेवेसाठी फक्त कोलाड स्टेशनच का?
मुंबई, ठाणे, कल्याण किंवा बोरीवलीसारख्या शहरांतून कोकणात जाणारे लोक खूप मोठ्या संख्येने आहेत. या सर्वांना जर ‘रो-रो’ सेवेचा लाभ घ्यायचा असेल, तर त्यांना आपली कार घेऊन थेट कोलाड स्टेशनवर पोहोचावे लागेल. कोलाड स्टेशन हे रोहा आणि माणगाव या दोन गावांच्या मध्ये येतं. मुंबईपासून कोलाडपर्यंत पोहोचायलाच कमीतकमी 3 ते 3.30 तास लागतात.
यामागचा मूळ उद्देश हा प्रवासाचा ताण कमी करणे असेल तर मग, ‘रो-रो’ सेवेसाठी एवढा लांबचा प्रवास करून कोलाडला पोहोचावं लागणं, हे थोडं विचार करायला लावतं. ज्या लोकांना गाडी चालवण्याचा कंटाळा येतोय किंवा लांबचा प्रवास टाळायचा आहे, त्यांना या ‘रो-रो’ कार सेवेचा लाभ घेण्यासाठी मुंबई ते कोलाडपर्यंतचा प्रवास गाडीनेच करावा लागणार आहे.
हेही वाचा: मुंबई-रत्नागिरी व विजयदुर्ग रो-रो सेवेचा मुहूर्त अजूनही नक्की नाही!
प्रशासनाने इतर स्थानकांचा विचार का केला नाही?
कोकण रेल्वे प्रशासनाने सध्या मुंबई किंवा ठाण्यासारख्या मोठ्या शहरांमधून थेट ‘रो-रो’ सेवेसाठी कोणताही पर्याय उपलब्ध केलेला नाही. प्रशासनाने जर दादर, ठाणे, पनवेल किंवा अगदी दिवा अशा मोठ्या आणि मध्यवर्ती स्थानकांवरून ही सुविधा दिली असती, तर मुंबई महानगर क्षेत्रातील लोकांना या सेवेचा लाभ घेणं खूप सोयीचं झालं असतं. गणपतीच्या काळात होणारी वाहतूक कोंडी आणि लांबचा प्रवास टाळण्यासाठी ही ‘रो-रो’ सेवा सुरू केली आहे. पण सेवेचा लाभ घेण्यासाठी एवढा प्रवास करावा लागत असेल, तर या सेवेचा खरा उद्देश कितपत साध्य होत आहे, हा प्रश्न उपस्थित होतो.
कोकण रेल्वे प्रशासनाने यावर गांभीर्याने विचार करून, भविष्यात मुंबईजवळील इतर स्थानकांवरूनही ही सुविधा उपलब्ध करावी, अशी अपेक्षा आहे. यामुळे खऱ्या अर्थाने प्रवासाचा ताण कमी होईल आणि जास्त लोकांना या उपयुक्त सेवेचा लाभ घेता येईल.