गणेशोत्सव म्हटलं की कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना गावी जाण्याचे वेध लागतात. पण मुंबई-गोवा महामार्गावर होणारे ट्राफिक जाम आठवलं की ,थोडं टेन्शन येतंच. त्याचबरोबर एसटी-रेल्वेच्या आरक्षणासाठी होणारी तारेवरची कसरतही असतेच. पण आता मात्र ही काळजी मिटणार आहे. कोकण रेल्वे कडून सगळ्यांनाच सोयीची होईल अशी सेवा सुरू करण्यात येणार आहे. ती म्हणजे ‘रो-रो’ सेवा.
रो-रो सेवा म्हणजे काय?
रो-रो’ (Roll-on Roll-off) सेवा म्हणजे, तुम्ही तुमची कार थेट रेल्वेच्या डब्यात चढवू शकता आणि आरामात कोकणात जाऊ शकता. यामुळे ट्राफिकमध्ये अडकण्याची कटकट नाही, गाडी चालवून थकण्याची चिंता नाही, आणि प्रवासाचा आनंदही घेता येईल. जसं आपल्याकडे मोठे ट्रक रेल्वेतून जातात, त्याचप्रमाणे आता आपल्या चारचाकी गाड्याही रेल्वेतून प्रवास करणार आहेत. मात्र मालवाहतूक व प्रवासी वाहतूक यात फरक असल्याने या कार रेल्वेमध्ये चढवल्यावर प्रवाशांना या कारमधून प्रवास करता येईल की त्यांच्यासाठी अन्य सुविधा उपलब्ध करून देणार, हे अजून स्पष्ट झालेले नाही.
प्रवाशांसाठी मोठा दिलासा
गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्यांची संख्या खूप असते. एसटी बस असोत किंवा खाजगी बस सगळ्याच गाड्यांमध्ये गर्दी होते. रेल्वेचं तिकीट वेळेवर मिळत नाही आणि मुंबई-गोवा हायवेवर तर गाड्यांची अक्षरशः रांग लागते. शिवाय कोकणातली गावे रेल्वे स्टेशन आणि मुख्य बसस्थानकांहून खूप आत डोंगर दऱ्यांमध्ये आहेत. त्यामुळं स्टेशनवर उतरल्यावर घरापर्यंत पोहचायलाही समस्या येतेच. या सगळ्या अडचणींवर आता ‘रो-रो’ सेवा हा उत्तम उपाय ठरणार आहे. कोकणात जाण्यासाठी हा एक नवीन आणि खूप सोयीचा पर्याय उपलब्ध होईल. यामुळे कोकणातील लोकांना मोठा फायदा होईल.
हेही वाचा : रेल्वेच्या तत्काळ तिकीट बुकिंगसाठी टिप्स आणि ट्रिक्स
ही सेवा कधी सुरू होणार?
कोकण रेल्वेचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांनी याबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, एका फेरीत कमीतकमी 40 गाड्यांचं बुकिंग झालं, तरच गणेशोत्सवामध्ये ही सेवा सुरू केली जाऊ शकते.
कोकण रेल्वे प्रशासन गणेशोत्सवापूर्वीच ही सेवा सुरू करण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या ही सेवा मुंबई ते गोवा दरम्यान प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याचा विचार आहे. जर हा प्रयोग यशस्वी झाला, तर प्रवाशांची खूप सोय होईल आणि मुंबई-गोवा हायवेवरील वाहतूक कोंडीची समस्याही बऱ्याच अंशी सुटेल.
सध्या काय स्थिती आहे?
सध्या ट्रकसाठी खास डबे आहेत, पण कार घेऊन जाण्यासाठी थोडे वेगळे डबे लागतील, त्यावर सध्या काम सुरू आहे. कोलाड ते मंगळूरु दरम्यान अशी सेवा आधीपासूनच आहे, जिथे गाड्या रेल्वेत चढवता येतात. पण कोकण मार्गावर ही सेवा सुरू झाल्यावर ती कशी काम करेल, प्रवासी गाडीतून प्रवास करू शकतील का, आणि कोणत्या स्टेशनवर गाड्या चढवता-उतरवता येतील यावर अजून काम सुरू आहे. कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की, काही तांत्रिक गोष्टींवर काम करण्याची गरज आहे, पण गणपतीपर्यंत ही सेवा सुरू करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
कोकण रेल्वेच्या उत्पन्नातही वाढ होईल
कोकण रेल्वेची ही ‘रो-रो’ सेवा केवळ प्रवाशांसाठीच नाही, तर रेल्वेसाठीही खूप फायदेशीर ठरणार आहे. हलक्या वाहनांसाठी ही सेवा सुरू झाल्यास, कोकण रेल्वेला प्रवासी सेवेतून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षाही जास्त कमाई होण्याची शक्यता आहे. यामुळे प्रवाशांना त्यांच्या प्रवासात अधिक आराम मिळेलच, पण यासोबतच कोकण रेल्वेला व्यवसायिकदृष्ट्या मोठा फायदा होईल.



