ब्रिटनमधील भारताचे उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांनी नुकतंच रशियाकडून भारताच्या तेल खरेदीच्या निर्णयाचं जोरदार समर्थन केलं. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, भारताने आपली अर्थव्यवस्था पूर्णपणे थांबवावी अशी अपेक्षा करणं योग्य नाही.
रेडिओवरील संवादात स्पष्टीकरण
विक्रम दोराईस्वामी यांनी ब्रिटनमधील ‘टाइम्स रेडिओ’ नावाच्या एका रेडिओ स्टेशनशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना भारत आणि रशियाच्या जवळच्या संबंधांबद्दल, तसेच रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी भारताच्या जवळीकतेबद्दल आणि पश्चिमी देशांच्या टीकेबद्दल प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्यांनी अत्यंत मुद्देसूदपणे भारताची बाजू मांडली. दोराईस्वामी यांनी सांगितलं की, केवळ आंतरराष्ट्रीय राजकारणातील समस्यांमुळे भारताला आपली अर्थव्यवस्था पूर्णपणे थांबवता येणार नाही.
पश्चिमी देशांच्या दुहेरी भूमिकेवर बोट
दोराईस्वामी यांनी यावेळी पश्चिमी देशांच्या दुहेरी भूमिकेवरही लक्ष वेधलं. ते म्हणाले की, पश्चिमी देश ढोंगीपणा करत आहेत. ते भारताला काही देशांकडून वस्तू विकत घेण्यास मनाई करतात, पण स्वतः मात्र त्याच देशांकडून महागडी खनिजे आणि ऊर्जा उत्पादने खरेदी करतात.
भारताच्या रशियासोबतच्या संबंधांचे तीन महत्त्वाचे पैलू
दोराईस्वामी यांनी भारताच्या रशियासोबतच्या जुन्या आणि दीर्घकाळापासूनच्या सुरक्षा संबंधांवर भर दिला. त्यांनी आठवण करून दिली की, एक काळ असा होता, जेव्हा भारताचे काही पश्चिमी भागीदार देश आम्हाला शस्त्रं विकत नव्हते. उलट, ते आमच्या शेजारच्या देशांना ती शस्त्रं विकत होते आणि ते देश ती शस्त्रं फक्त भारतावर हल्ला करण्यासाठी वापरत होते. अशा परिस्थितीत, भारताला आपल्या सुरक्षेसाठी रशियाकडून शस्त्रं खरेदी करावी लागली, कारण त्यावेळी इतर पर्याय उपलब्ध नव्हते.
दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भारताचं रशियासोबतचं ऊर्जा नात. दोराईस्वामी म्हणाले की, रशिया-युक्रेन युद्धानंतर पश्चिमी देशांनी रशियाकडून तेल खरेदी करणं कमी केल्यावर, ते इतर ठिकाणाहून तेल घेऊ लागले जिथून भारत पूर्वी तेल घेत असे. याचा परिणाम असा झाला की, भारताला मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय ऊर्जा बाजारातून बाजूला सारलं गेलं. आणि तेलाच्या जागतिक किमती खूप वाढल्या. भारतासारखा देश, जो जगातील तिसऱ्या क्रमांकाचा ऊर्जा ग्राहक आहे आणि आपल्या गरजेच्या 80 टक्क्यांहून अधिक ऊर्जा उत्पादने आयात करतो, त्यांच्यासमोर मोठा प्रश्न उभा राहिला.
“तुम्ही आमच्याकडून काय अपेक्षा करता? आम्ही आमची अर्थव्यवस्था बंद करावी का?” असा परखड प्रश्न दोराईस्वामी यांनी विचारला. त्यांनी सांगितलं की, रशियासोबतचं सध्याचं ऊर्जा नातं हे तेलाच्या वाढलेल्या किमती आणि इतर देशांनी तेल खरेदीचे बदललेले मार्ग यामुळे निर्माण झालं आहे.
तिसरा मुद्दा मांडताना ते म्हणाले की, इतर देश त्यांच्या फायद्याप्रमाणे संबंध ठेवतात आणि जे भारतासाठी अडचणीचे ठरतात. पण तरीही आम्ही त्यांना कधी विचारत नाही की, तुम्ही आमच्याशी प्रामाणिक आहात की नाही? असं म्हणत त्यांनी पश्चिमी देशांच्या दुहेरी नैतिकतेला आव्हान दिलं.
भारतातील तेल आयात आणि आंतरराष्ट्रीय दबाव
भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा तेल आयात करणारा आणि वापरणारा देश आहे. 2025 वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत भारताने रशियाकडून सुमारे 17.5 लाख बॅरल प्रतिदिन (bpd) तेल आयात केलं. जे मागील वर्षाच्या याच कालावधीपेक्षा 1 टक्का जास्त आहे.
2022 मध्ये रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर, पश्चिमी देशांनी रशियावर कठोर निर्बंध लादले आणि त्यांच्याकडून तेल खरेदी करणं थांबवलं. याचा परिणाम म्हणून, रशियाला आपलं तेल सवलतीच्या दरात विकावं लागलं, आणि भारताने या संधीचा फायदा घेत रशियाकडून तेल खरेदी मोठ्या प्रमाणात वाढवली. भारताच्या या भूमिकेवर पश्चिमी देशांकडून अनेकदा टीका झाली असली तरी, भारताने नेहमीच आपल्या राष्ट्रीय हिताला प्राधान्य दिलं.
जुलै महिन्याच्या सुरुवातीला, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी धमकी दिली होती की, जर रशियाने 50 दिवसांच्या आत शांतता करार मान्य केला नाही, तर रशियाकडून निर्यात होणाऱ्या सामानाचे खरेदीदार देश आहेत यांच्यावर निर्बंध लादले जातील. मात्र, भारताने स्पष्ट केलं की, भारताच्या अर्थव्यवस्थेच्या गरजा पूर्ण करणं हे त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे, आणि ते कोणत्याही दबावाखाली आपल्या धोरणांमध्ये बदल करणार नाहीत.
हेही वाचा: भारताकडे इंधनाचा पुरेसा साठा आहे; केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पूरी यांची माहिती