दिल्लीमध्ये फिरताना ‘कर्तव्य पथ’ पाहण्याचा अनुभव खूपच खास असतो. आणि आता याच कर्तव्य पथावर एक नवीन, सुंदर सरकारी इमारत तयार झाली आहे. या इमारतीचं नाव ‘कर्तव्य भवन’ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच या इमारतीचं उद्घाटन केलं. ही इमारत म्हणजे, सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘सेंट्रल व्हिस्टा रीडेव्हलपमेंट प्रोजेक्ट’चा एक भाग आहे.
‘CCS-3’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कर्तव्य भवन इमारतीमध्ये सर्व केंद्रीय मंत्रालयाची कार्यालये एकत्र सुरू केली जाणार आहेत. सध्या अनेक सरकारी मंत्रालये ही जुन्या इमारतींमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेली आहेत. या कारणामुळे लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावं लागते. ज्यामुळे त्यांचा वेळ वाया जातो आणि कामातही गोंधळ होतो. ही समस्या दूर करून काम अधिक सोपे आणि जलद व्हावे यासाठी ही नवीन इमारत बांधण्यात आली आहे.
कर्तव्य भवन इमारतीची काही खास वैशिष्ट्ये
कर्तव्य भवन ही एक भव्य इमारत असून, ती सुमारे दीड लाख चौरस मीटर जागेत पसरलेली आहे. या इमारतीला सात मजले आणि दोन बेसमेंट आहेत. ‘शास्त्री भवन’, ‘उद्योग भवन’, ‘निर्माण भवन’, ‘कृषी भवन’ अशा अनेक ठिकाणी विखुरलेली सरकारी मंत्रालये आता या एकाच इमारतीत कार्यरत राहतील.
मात्र, काही महत्त्वाची मंत्रालये त्यांच्या जुन्या इमारतींमध्येच सुरू राहणार आहेत. उदाहरणार्थ, वाणिज्य मंत्रालय ‘वाणिज्य भवन’मध्ये आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालय ‘जवाहरलाल नेहरू भवन’मध्येच असेल. तसंच ‘नॅशनल म्युझियम’ आणि ‘आंबेडकर ऑडिटोरियम’ यासारख्या ऐतिहासिक आणि महत्त्वाच्या इमारतींना कोणताही धक्का लागणार नाही. त्या त्यांच्या मूळ जागेवरच कायम राहतील.
कर्तव्य पथ पर कर्तव्य भवन जन-जन की सेवा के प्रति हमारे अटूट संकल्प और निरंतर प्रयासों का प्रतीक है। यह ना केवल हमारी नीतियों और योजनाओं को लोगों तक तेजी से पहुंचाने में मददगार बनने वाला है, बल्कि इससे देश के विकास को भी एक नई गति मिलेगी। अत्याधुनिक इंफ्रास्ट्रक्चर की मिसाल बने इस… pic.twitter.com/0NUVUSOiZd
— Narendra Modi (@narendramodi) August 6, 2025
पर्यावरणाची काळजी घेणारं ‘कर्तव्य भवन’
‘कर्तव्य भवन’ ही केवळ एक मोठी इमारत नसून, ते पर्यावरणाची काळजी घेणारं एक आधुनिक आणि स्मार्ट कार्यालय आहे. या इमारतीमध्ये ऊर्जा वाचवण्यासाठी अनेक खास सोयी-सुविधा उपलब्ध केल्या आहेत, ज्यामुळे वीज आणि पाण्याचा योग्य वापर करता येणार आहे. एलईडी लाइट्स, स्मार्ट एसी सिस्टीम आणि सेन्सरमुळे इथे विजेचा वापर 30 टक्क्यांनी कमी होईल. इमारतीच्या छतावर मोठे सौर पॅनल बसवले आहेत. ज्यामुळे वर्षाला 5.34 लाख युनिटपेक्षा जास्त वीज तयार होईल.
तसंच इथे रोज जे पाणी वापरलं जाईल ते वाया जाणार नाही. तर, दररोज 11 लाख लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पुन्हा वापरलं जाणार आहे. यामुळे इमारतीची 60 टक्के पाण्याची गरज पूर्ण होईल. पावसाचं पाणी साठवण्यासाठीही विशेष व्यवस्था केली आहे.
कचरा व्यवस्थापनासाठी दररोज तिथेच सुमारे 1 हजार किलो कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून खत तयार केले जाईल, ज्यामुळे कचरा बाहेर जाणार नाही.
आधुनिक सुविधा आणि सुरक्षा
‘कर्तव्य भवन’मध्ये प्रवेश करण्यासाठी खास स्मार्ट आयडी कार्ड सिस्टीम आहे. हे कार्ड फक्त ओळखपत्र नाही, तर या कार्डने कर्मचाऱ्यांचा आणि पाहुण्यांचा प्रवेश नियंत्रित केला जाईल. यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याला त्यांचा फोटो आणि बायोमेट्रिक माहिती द्यावी लागली आहे.
संपूर्ण इमारतीमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था आहे. प्रत्येक मजल्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. संपूर्ण इमारतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक खास ‘इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर’ तयार केले आहे. या केंद्रातून इमारतीच्या प्रत्येक भागावर नजर ठेवली जाईल, ज्यामुळे कोणत्याही अनुचित घटनेला लगेच आळा घालता येईल.
कामाची जागा आणि मीटिंग रूम्स
कर्तव्य भवनमध्ये कामासाठी आणि मीटिंगसाठी भरपूर जागा आहे. मीटिंग घेण्यासाठी 24 मोठ्या कॉन्फरन्स रूम्स आहेत, ज्यात एका वेळी 45 लोक बसू शकतात. याशिवाय, 26 लहान मीटिंग रूम्स आणि 9 लोकांच्या टीमसाठी 67 आणखी छोट्या रूम्स उपलब्ध आहेत.
या इमारतीत ‘ओपन ऑफिस स्पेस’ची संकल्पना वापरली आहे. जिथे सर्व कर्मचारी एका मोठ्या हॉलमध्ये एकत्र बसून काम करतील. मात्र, काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गोपनीय कामासाठी आणि खासगी चर्चेसाठी वेगळ्या केबिनची मागणी केली आहे.
‘कर्तव्य भवन’ हे एकूण 10 नियोजित इमारतींपैकी पहिले आहे. काही मंत्रालये या नवीन इमारतीत स्थलांतरित झाली आहेत, तर बाकीच्या इमारतींचे काम 2027 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.