बऱ्याचदा आपण पोलिसांवर टीका करतो. कारण आपल्याला त्यांच्या कामाची पद्धत माहीत नसते. तिथल्या कामाचं प्रेशर, त्यांना येणाऱ्या अडचणी यांची कल्पना नसते. महाविद्यालयीन वयात विद्यार्थी नागरिक म्हणूनही घडत असतात. अशा वेळी जर त्यांना पोलीस खातं नेमकं काम कसं करतं हे प्रत्यक्ष अनुभवता आलं तर..
अनेक विद्यार्थ्यांना पदवीचं शिक्षण पूर्ण झाल्यावर लष्करी सेवेत किंवा पोलिस सेवेत जायचं असतं, अनेक विद्यार्थी हे एनसीसी प्रशिक्षण घेतच असतात. अशा सगळ्या विद्यार्थ्यांना पोलिस हे कशापद्धतीने काम करतात हे प्रत्यक्षात जाणून घेण्यासाठी केंद्र सरकारने ‘विद्यार्थी-पोलिस अनुभवात्मक शिक्षण’ कार्यक्रम सुरू केला आहे. जाणून घेऊयात हा उपक्रम नेमका काय आहे, यासाठी अर्ज कसा करायचा आणि हे प्रशिक्षण नेमकं कसं दिलं जातं?
पोलिसांसोबत 120 तास काम करण्याची संधी
सरकारच्या या उपक्रमांतर्गत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या स्थानिक पोलिसांसोबत तब्बल 120 तास म्हणजे 1 महिना काम करण्याची संधी मिळते.
दर दिवशी चार तासांप्रमाणे हे काम करता येते. यामध्ये 15 दिवस पोलिस स्टेशनमधलं दैनंदिन कामकाज कसं चालतं, तसंच विविध कायद्यांनुसार व्यावहारिक प्रशिक्षण दिलं जातं. त्यानंतर पुढच्या 15 दिवसात सिटी क्राइम रेकॉर्ड ब्युरो, कंट्रोल आणि इतर कार्यालयीन कामांची माहिती दिली जाते.
यात विद्यार्थ्यांना फौजदारी कायदे आणि प्रक्रिया यांची मूलभूत माहिती, गुन्ह्यांचा तपास कसा केला जातो याचं प्राथमिक प्रशिक्षण, ट्राफिकचं व्यवस्थापन, कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम, रोजचं पेट्रोलिंग आणि ड्रग्ज व व्यसनमुक्तीविषयी जनजागृती कार्यक्रम अशा सगळ्या बाबींची माहिती दिली जाते.
क्रेडिट पॉईंटस्
प्रशिक्षणात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांकडून या प्रशिक्षणाविषयी अभिप्राय घेतले जातात. हे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर त्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्रेडिट्सही दिले जातात.
समाजसेवेतून शिक्षणाचा अनुभव
महाविद्यालयीन शिक्षणामध्ये अनुभवात्मक शिक्षणाला जास्त महत्व आहे. तुम्ही पुस्तकामध्ये काय शिकता यापेक्षा प्रत्यक्ष काम कसं करता, जे शिकलात ते कामामध्ये कसं वापरता याला महत्व आहे. त्यामुळे अनेक मुलं सुट्टीच्या काळात इंटर्नशीप करण्यावर भर देतात. या काळात जर तुम्ही एखादी स्वयंसेवी संस्था, सरकारच्या एखाद्या संस्थेसोबत काम केलं तर त्याचा जास्त फायदा होतो.
या सगळ्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या कामाचा अनुभव मिळावा, कायदा – सुव्यवस्थेतील विविध बाबी समजाव्यात, त्यांना कायदे आणि नियमांची माहिती मिळावी आणि त्यातून एक सुज्ञ नागरिक घडावा यासाठीच सरकारने हा ‘विद्यार्थी-पोलिस अनुभवात्मक शिक्षण कार्यक्रम’ सुरू केला आहे.
यासाठी नोंदणी कशी करायची?
केंद्र सरकारचा हा उपक्रम देशातल्या सगळ्या पोलिस स्टेशनमध्ये सुरू आहे. त्यामुळे तुम्ही हे प्रशिक्षण तुमच्या भागातील स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये करू शकता. याकरता केंद्र सरकारने दिलेल्या संकेतस्थळावरूनत अर्ज करता येतो.
केंद्रीय युवा आणि क्रीडा मंत्रालयाकडून ‘MYभारत’ https://mybharat.gov.in/ या संकेतस्थळावर यासाठी अर्ज करावा.
महाविद्यालयात असताना विद्यार्थ्यांकडं हातचा वेळ बऱ्यापैकी असतो. यावेळेचा सदुपयोग करण्यासाठी आणि शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शिक्षणाचे धडे घेण्यासाठी हा काळ उपयुक्त असतो. त्यामुळं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सरकारच्या या उपक्रमात सामील होऊन चांगले नागरिक होण्याचा प्रवास सुरू करावा.