रेल्वे मार्गावरील क्रॉसिंगवर एआयच्या मदतीने हत्तींना पुरवली जाते सुरक्षा !

World elephant day: गेल्या काही काळात रेल्वे मार्गांवर हत्तींचे अपघात होणाऱ्या घटनांत मोठी वाढ झाली होती. या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित प्रणालींचा वापर केला जात आहे
[gspeech type=button]

वाढते शहरीकरण, रस्ते आणि रेल्वे मार्गांमुळे मानवी वस्ती आणि वन्यजीवांच्या अधिवासांमधील अंतर कमी होत आहे. याचा सर्वाधिक फटका वन्यजीवांना बसत आहे. विशेषतः गेल्या काही काळात रेल्वे मार्गांवर हत्तींचे अपघात होणाऱ्या घटनांत मोठी वाढ झाली होती. या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित प्रणालींचा वापर केला जात आहे. या तंत्रज्ञानामुळे हत्तींचे प्राण वाचवणं आता शक्य होत आहे. जागतिक हत्ती दिनाच्या दिवशी जाणून घेऊयात हत्तींचा जीव वाचवण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा नेमका कसा उपयोग होतो.

पश्चिम घाटातील गंभीर परिस्थिती

पश्चिम घाटासारख्या घनदाट वनक्षेत्रांतून जाणाऱ्या रेल्वे मार्गांवर ही समस्या अधिक गंभीर आहे. केरळमधील पलक्कड जिल्ह्यातील कोट्टेक्काड आणि तामिळनाडूमधील कोईम्बतूर जिल्ह्यातील मदुक्करई ही गावे जंगलाच्या अगदी जवळ आहेत. यामुळे खाण्याच्या किंवा पाण्याच्या शोधात हत्ती अनेकदा मानवी वस्ती किंवा रेल्वे रुळांवर येतात. दुर्दैवाने, भरधाव वेगाने येणाऱ्या गाड्यांना धडकून अनेक हत्ती मृत्युमुखी पडतात.

यापूर्वी या समस्येवर उपाय म्हणून रेल्वे मार्गाखाली हत्तींसाठी भुयारी मार्ग बांधले गेले. पण हे उपाय फारसे यशस्वी ठरले नाहीत. हत्ती अजूनही रुळांवरूनच जातात, यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

या संघर्षाचा सर्वाधिक फटका मदुक्करई परिसरातील आदिवासी समुदायांना बसत आहे. ज्यांच्याकडे पैसे आहेत, ते सिमेंटच्या भिंती आणि विजेच्या कुंपणांनी आपली घरे सुरक्षित करतात. पण पुथुपथी गावातील आदिवासी जे झोपड्यांमध्ये राहतात त्यांची घरे हत्ती सहजपणे उध्वस्त करतात.

AI-आधारित सतर्कता प्रणाली

या समस्येवर उपाय म्हणून, तामिळनाडूच्या वनविभागाने मदुक्करई गावातील रेल्वे रुळांवर कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित हत्ती पाळत आणि सतर्कता प्रणाली सुरू केली आहे.

या प्रणालीद्वारे रेल्वे रुळांच्या बाजूला 12 ठिकाणी कॅमेरे बसवण्यात आले आहेत. हे कॅमेरे हत्तींची फोटो, व्हिडिओ नियंत्रण कक्षाला पाठवतात. नियंत्रण कक्ष यावर 24 तास लक्ष ठेवून असतात.

हे तंत्रज्ञान कसे काम करते?

जेव्हा एखादा हत्ती रेल्वे रुळाजवळ किंवा रुळांवर दिसतो, तेव्हा ही प्रणाली तात्काळ संबंधित रेल्वे अधिकाऱ्याला आणि त्यानंतर ट्रेन चालकाला अलर्ट पाठवते. यामुळे ट्रेन चालक गाडीचा वेग कमी करण्याची संधी मिळते आणि संभाव्य अपघात टाळला जातो.

काही ट्रेन चालकांना अजूनही या प्रणालीबद्दल शंका आहे. त्यांचे म्हणणे आहे की, ‘हत्ती रुळांवर असल्याची माहिती मिळाली तरी, एका मर्यादेपलीकडे गाडीला ब्रेक लावता येत नाही. त्यामुळे फक्त या तंत्रज्ञानावर पूर्णपणे अवलंबून राहणे योग्य नाही.’

तरीही, या प्रणालीने खूप चांगले परिणाम दिले आहेत. या यशस्वी प्रयोगामुळे आता सदर्न रेल्वेने केरळ आणि तामिळनाडू दरम्यानच्या कोट्टेक्काड-मदुक्करई मार्गावर ही अत्याधुनिक हत्ती शोध प्रणाली (elephant intrusion detection system) कार्यान्वित करण्याची परवानगी दिली आहे. यासाठी 15.42 कोटी रुपयांचे बजेटही मंजूर करण्यात आले आहे.

केरळमध्ये ‘एले-फेन्स’ नावाचा नवीन प्रयोग

केरळमध्येही असाच एक नवीन प्रयोग सुरू केला आहे. वायनाड जिल्ह्यातील चेलाकोल्ली गावात ‘एले-फेन्स’ (Ele-fence) नावाचा देशातील पहिला AI-आधारित स्मार्ट कुंपण प्रकल्प सुरू केला आहे.

‘व्हाइट एलिफंट टेक्नॉलॉजीज’ नावाच्या कंपनीने हे कुंपण तयार केलं आहे. या प्रणालीमध्ये हत्तींच्या हालचालींवर थेट लक्ष ठेवलं जाते. तसेच त्यांना मानवी वस्तीत येण्यापासून रोखण्यासाठी एक खास तंत्रज्ञान वापरलं जाते. या कुंपणाला ‘लेसर बेल्ट’ तंत्रज्ञान जोडलेलं आहे. यामुळे हत्तींना कुंपण तोडून आत येता येत नाही.

तंत्रज्ञान पुरेसे आहे का?

हे तंत्रज्ञान कितीही प्रगत असलं तरी, ते मानवी वस्ती आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष पूर्णपणे सोडवू शकात का? हा प्रश्न कायम आहे. वायनाड जिल्ह्यातील आदिवासी लोकांचं म्हणणं आहे की, वनक्षेत्र कमी झाल्यामुळे हत्ती मानवी वस्तीत येत आहेत. हाच मूळ प्रश्न आहे आणि तो ‘एले-फेन्स’ने कसा सोडवला जाईल, अशी त्यांची शंका आहे.

कॉम्ट्रोलर आणि ऑडिटर जनरलच्या अहवालानुसार, 1950 मध्ये वायनाडमध्ये 1,811.35 चौ.किमी असलेले वनक्षेत्र 2021 मध्ये 863.86 चौ.किमी इतके कमी झाले आहे. त्यामुळे, जोपर्यंत वनक्षेत्राची घट थांबवली जात नाही, तोपर्यंत ही AI-आधारित प्रणाली काही प्रमाणात दिलासा देऊ शकतील. पण हा कायमस्वरूपी उपाय नाही असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे.

कोईम्बतूरजवळ 2,800 हत्तींचे सुरक्षित क्रॉसिंग

फेब्रुवारी 2024 मध्ये कोईम्बतूर वनविभागातील मदुक्करई वनक्षेत्रात AI-आधारित प्रणाली सुरू झाल्यापासून सुमारे 2,800 हत्तींनी रेल्वे रुळ सुरक्षितपणे पार केले आहेत. वनविभागाच्या मते, या प्रणालीने 6,000 हून अधिक अलर्ट दिले. त्यामध्ये हत्ती रुळांजवळ असल्याचे किंवा ते रुळ ओलांडत असल्याचे दर्शविले होते. एकूण 10,000 हून अधिक अलर्ट दिले गेले, ज्यात इतर प्राण्यांच्या उदा. गवा, हरीण, बिबट्या हालचालींचाही समावेश होता.

जिल्हा वन अधिकारी एन. जयराज यांनी सांगितलं की, ही प्रणाली सुरू झाल्यापासून या भागात एकही हत्तीचा ट्रेनच्या थडकेने अपघात झालेला नाही. रुळांवर 24 तास पाळत ठेवण्यासाठी 20 लोकांचा एक विशेष गट तैनात आहे. तसेच 4 कर्मचारी नियंत्रण आणि कमांड सेंटरमध्ये काम करतात.

या प्रणालीमुळे होणाऱ्या अलर्टची माहिती जवळच्या स्टेशन मास्तरांना आणि ट्रेन चालकांना दिली जाते. ही माहिती मिळताच ते ट्रेनचा वेग कमी करू शकतात.

शेवटी, वन्यजीव आणि मानवाच्या सहअस्तित्वासाठी तंत्रज्ञान एक महत्त्वाचे साधन ठरत आहे. पण, जोपर्यंत आपण निसर्गाचे संरक्षण करत नाही, तोपर्यंत हा संघर्ष पूर्णपणे थांबवणे शक्य नाही. तंत्रज्ञान मदत करू शकते, पण मूळ समस्येचे निराकरण करणे आपल्याच हातात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Government new rules for two-wheelers : तुम्ही नवीन बाईक किंवा स्कूटर खरेदी केली, तर तिच्यामध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम (ABS) असणं
Women's employment rate : कामगार मंत्रालयाने नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सात वर्षांत भारतातील महिलांच्या रोजगार दरात मोठी वाढ झाली आहे.
CIBIL score : संसदेच्या 2025 पावसाळी अधिवेशनादरम्यान, अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्ट केलं आहे की, बँका फक्त CIBIL स्कोअर

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ