मुंबई, ठाणे आणि राज्याच्या काही भागाला रविवार रात्रीपासून पावसानं चांगलंच झोडपलं आहे. मुंबई, ठाणे आणि कोकणाला रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. मुंबई आणि ठाण्याच्या सखल भागात पाणी साचत आहे. मुंबईसह राज्यातल्या अनेक भागात जनजीवन विस्कळीत होत आहे.
ठाण्यात चार तासात 31.22 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सकाळी 11 ते 12.30 दरम्यान सर्वाधिक म्हणजे 16.26 मिमी पाऊस पडला आहे. ठाण्यात वंदना डेपोसह अनेक सखल भागामध्ये पाणी साचलं आहे.
शाळांना सुट्ट्या नाहीत
गेल्या तीन दिवसापासून राज्यातल्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. तरिही जिल्हा प्रशासनाकडून यावेळेस शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली नव्हती. त्यामुळं सगळ्या शैक्षणिक संस्था आज सुरू होत्या. पावसाचा जोर वाढत गेल्यावर काही शाळा – महाविद्यालयांना अर्ध्या दिवसाची सुट्टी देण्यात आली.
मुंबईसह उपनगरात सकाळच्या वेळेत भरल्या जाणाऱ्या शाळा सुटल्या आहेत. दुपारच्या वेळेत भरणाऱ्या काही शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. पण ठाण्यातील काही शाळा जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना न आल्याने सुरूच ठेवल्या आहेत.
रेल्वे वाहतूकीवर परिणाम
पावसाची संततधार सुरूच असली तरी सकाळपर्यंत मुंबईतल्या तिन्ही रेल्वेलाईन या कार्यरत होत्या. हार्बर आणि मध्य रेल्वे ही काही पाच – दहा मिनीटाने उशीरा होती. तर पश्चिम रेल्वे ही सुरळीत होती. मात्र, पावसाचा वेग वाढतच असल्यामुळे तिन्ही मार्गावरील रेल्वे ट्रॅक आता पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे तिन्ही मार्गावर लोकल गाड्या संथगतीने धावत आहेत. पावसाचा वेग असाच कायम राहिला तर उपनगरीय सेवा ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत.
सध्या मध्य रेल्वेमार्गावरील ट्रेन 25 ते 30 मिनिटांच्या उशीराने धावत आहेत. मध्य रेल्वेच्या कुर्ला, माटुंगा आणि दादर रेल्वे स्थानकात रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे. त्यामुळे अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावरील लोकल ट्रेन उशिराने धावत आहेत. तर चुनाभट्टी, चेंबूर आणि टिळकनगर या स्थानकांच्या परिसरात पाणी साचल्याने हार्बर रेल्वेची वाहतूकही मंदावली आहे. हार्बर रेल्वेमार्गावरील ट्रेन 12 ते 15 मिनिटांच्या विलंबाने धावत आहेत. तर ट्रान्स हार्बर मार्गावरील ट्रेन 10 मिनिटे उशीरा धावत आहेत.
पश्चिम रेल्वेमार्गावरील बऱ्यापैकी सुरळीत सुरु आहे. मात्र, पावसाचा जोर कायम राहिल्यास आणि रेल्वे स्थानकांमध्ये पाणी साचल्यास मुंबईची लाईफलाईन ठप्प होऊ शकते.
मुंबईतले सखल भाग पाण्याखाली
दक्षिण मुंबईतील सायन, हिंदमाता, परळ, किंग्ज सर्कल या सखल भागांमध्ये रस्त्यावर पाणी साचले आहे. तर पश्चिम उपनगरात अंधेरी परिसरात रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी होताना दिसत आहे. रस्त्यावरील वाहतूक ही मोठ्या प्रमाणावर विस्कळीत होत आहे.
प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
हवामान खात्याने मुंबई, ठाणे आणि कोकणाला पुढील 48 तासांसाठी रेड अलर्ट दिला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनाकडून, गरज असल्यास घराबाहेर पडा, अशा सूचना नागरिकांना दिल्या आहेत.
कोकणात पावसाची स्थिती
रत्नागिरीतील जगबुडी आणि नारंगी या दोन्ही नद्यांना पूर आला आहे. सकाळी 9.30 वाजता जगबुडी नदीवरील भराणे नाका पुलाजवळ पाणीपातळी 7.40 मीटरपर्यंत पोहोचली, जी धोक्याच्या 7 मीटर रेषेपेक्षा अधिक आहे. पाण्याची पातळी अजूनही वाढतच आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली. खेड नगरपरिषदेने नागरिक आणि व्यापाऱ्यांना तातडीचा इशारा देत सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे आवाहन केले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 17 ते 21 ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीचा इशारा असून, पुढील 24 तास कोकणासह घाटमाथ्यावर धोका कायम आहे. या काळात समुद्र खवळलेला राहील तसेच ताशी 50-60 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मराठवाडा पावसाची स्थिती
मराठवाड्यातही गेल्या तीन दिवसापासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. लातूर, नांदेड आणि बीड इथे सर्वाधिक पाऊस झाला आहे. नांदेडमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळत आहे. यामध्ये एका दिवसात पाच लोकांचा मृत्यू झाला आहे.एक जण जखमी झाला आहे. अनेक लोकांनी या परिस्थितीमुळे स्थलांतर केलं आहे.
नांदेड लेह धरणाच्या पाण्याच्या पातळीत इगफुटी आणि मळ लालर, उदगीर आणि कर्नाटक भागातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. परिणामी, लेंडी नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. काही गावांमध्ये नदीचं पाणी शिरलं आहे. पुनर्वसित रावनगाव, भासवाडी, मिगेली आणि हासना या गावांतील काही नागरिक मूळ ठिकाणी वास्तव्याला राहत असल्यामुळे, पुराच्या पाण्यात अडकण्याच्या घटना घडल्या आहेत. बचावकार्य सुरू आहे.