भारतातील कर्ण आणि मुक बधिर मुलांसाठी विशेष सांकेतिक भाषा आहे. या भाषेमध्ये शैक्षणिक साहित्याशिवाय ललित साहित्याचीही निर्मिती केली जाते. मात्र, भारतात भारतिय सांकेतिक भाषेऐवजी अमेरिकन सांकेतिक भाषा वापरण्यास सुरू करुन तीच भाषा शिकवली जावी, अशी याचिका मुंबईतील एका कार्यकर्त्याने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.
मात्र, कर्णबधिर समुदायातील विविध संस्थांनी या याचिकेला विरोध केला आहे. भारतीय सांकेतिक भाषा ही आपल्या संस्कृती आणि शिक्षणाशी सुसंगत आणि जोडलेली आहे. जर अमेरिकन सांकेतिक भाषेची सक्ती केली तर त्यामुळे भारतीय सांकेतिक भाषा नष्ट होईल, अशी भिती व्यक्त करत या समुदायाने विरोध दर्शवला आहे. जाणुन घेऊयात हे प्रकरणं नेमकं काय आहे.
अमेरिकन सांकेतिक भाषेच्या वापरासाठी याचिका
कर्णबधिर लोकांसाठी न्यूज पोर्टल चालवणारे अमन आझाद यांनी सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली आहे. यामध्ये केंद्र सरकार आणि सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सक्षम अधिकाऱ्यांना भारतातील सर्व विशेषत: दिव्यांग शाळांच्या अभ्यासक्रमात अमेरिकन सांकेतिक भाषा (ASL) हा विषय अनिवार्य करण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी केली आहे. ASL सोबतच भारतीय सांकेतिक भाषा (ISL) देखील शिकवली जावी, अशी मागणी या याचिकेत केली आहे.
या विशेष विद्यार्थ्यांनी अमेरिकन सांकेतिक भाषा शिकले तर त्यांना आंतरराष्ट्रीय शिक्षणाच्या आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. तसेच सांस्कृतिक देवाणघेवाणीचे मार्ग खुले होतील. अमेरिकन सांकेतिक भाषा ही ही अमेरिकेत चौथी सर्वात सामान्य भाषा आहे आणि इतर देशांमध्ये ती मोठ्या प्रमाणावर वापरली जाते आणि ती शिकल्याने त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक समावेशनात लक्षणीय वाढ होईल, असा दावा त्यांनी या याचिकेत केला आहे.
या भाषेमध्ये विविध ऑनलाइन अभ्यासक्रम, वेबिनार आणि तांत्रिक ट्यूटोरियलसह बहुतेक शैक्षणिक संसाधने उपलब्ध आहेत. या संसाधनांमुळे श्रवणदोष असलेल्या विद्यार्थ्यांना आधुनिक ज्ञान आणि कौशल्ये मिळतात. या भाषेमुळे कर्णबधिर मुलांना द्विभाषिक पर्याय उपलब्ध होईल. तसेच रोजगाराच्याही मोठ्या संधी निर्माण होतील. भारतात 63 लाख लोक श्रवणदोषाने ग्रस्त आहेत. जर आपण कर्णबधिर लोकसंख्येसाठी ASL सुरू केले तर देशभरात 25 हजार अमेरिकन सांकेतिक भाषेच्या शिक्षकांच्या रिक्त जागा उपलब्ध होतील. यामुळे बेरोजगार असलेल्या विशेष दिव्यांग तरुणांना फायदा होईल. यामुळे अपंग लोकांचे जीवन बदलण्याची क्षमता आहे.
कर्णबधिर समुदायाचा विरोध
अमेरिकन सांकेतिक भाषेला कर्णबधिर समुदायांनी स्पष्ट विरोध दर्शविला आहे. जर अमेरिकन सांकेतिक भाषा भारतात सक्तीने लागू केली तर भारतीय सांकेतिक भाषा लोप पावेल. त्यामुळे भारतिय सांकेतिक भाषेचं जतन करण्यासाठी त्याला प्रोत्सहन देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने पाठिंबा द्यावा अशी विनंती संस्थांनी केली आहे.
भारतातल्या सुमारे 18 लाख कर्णबधिर लोकांसाठी ही सांकेतिक भाषा अतिशय महत्त्वाची आहे. ASL अनिवार्य करण्याची मागणी भारतीय कर्णबधिर समुदायाविरुद्ध अत्यंत हानिकारक, असंवैधानिक आणि भेदभावपूर्ण आहे. जगात प्रत्येक देशांमध्ये कर्णबधिर समुदाय त्यांच्या स्वतःच्या सांकेतिक भाषा वापरतात, त्यामुळे अमेरिकन सांकेतिक भाषा शिकल्याने जागतिक नोकरीच्या संधी उघडत असल्याचा युक्तिवाद दिशाभूल करणारा आहे, असा दावा ऑल इंडिया फेडरेशन ऑफ द डेफ या संस्थेने केला आहे.
भारतीय सांकेतिक भाषेचं अवमूल्यन होईल
जर देशात अमेरिकन सांकेतिक भाषा सक्तीची केली तर दशकांपासून चालत आलेले प्रयत्न कमकुवत होतील आणि आयएसएलचे अवमूल्यन होईल. तसेच भारतीय कर्णबधिर मुलांवर परदेशी भाषा लादणे हे त्यांच्या सांस्कृतिक आणि भाषिक ओळखीचे तसेच त्यांच्या स्वतःच्या भाषेत शिक्षण घेण्याच्या अधिकाराचे उल्लंघन आहे.
भारताने आयएसएल-आधारित शिक्षण, दुभाषी प्रशिक्षण आणि संशोधनात आधीच लक्षणीय गुंतवणूक केली आहे असा प्रचार करुन एएसएल लागू केली तर विद्यार्थी गोंधळात पडतील. या संपूर्ण समुदायात फूट पडेल आणि राष्ट्रीय संसाधनांचा अपव्यय होईल.
ज्याप्रमाणे अन्य भारतीय भाषा सांस्कृतिक अभिमानाचे प्रतिनिधित्व करतात. त्याचप्रमाणे भारतीय सांकेतिक भाषा ही कर्णबधिर भारतीयांच्या भाषिक प्रतिष्ठेचं प्रतिनिधित्व करते. त्यामुळे ती डावलून अमेरिकन भाषेला महत्त्व देणं हे गैर आहे.



