हिंसाचारात रुपांतर झालेले ‘लडाख आंदोलन’ काय आहे आणि त्याचे नेते सोनम वांगचूक कोण आहेत?

बुधवारी लेहमध्ये झालेल्या संघर्षात 4 जणांचा मृत्यू आणि 70 जण जखमी झाल्यानंतर लडाखमध्ये अस्वस्थ शांतता आहे. सरकारने निदर्शकांना चिथावणी देण्याच्या आरोपावरून या आंदोलनाचे प्रणेते सोनम वांगचुक यांच्या भाषणांना जबाबदार धरले आहे.
[gspeech type=button]

निसर्गरम्य आणि शांत प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लडाखमध्ये बुधवारी आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणानंतर अस्वस्थता पसरली आहे. या हिंसाचारात 4 जणांचा मृत्यू आणि 70 जण जखमी झाले आहेत. बुधवारी संध्याकाळी  4 वाजल्यापासून कोणतीही हिंसक घटना घडली नसून परिस्थिती सामान्य होत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

हिंसाचारानंतर, केंद्र सरकारने या संघर्षांसाठी एक्टिव्हिस्ट सोनम वांगचुक यांच्यावर दोषारोप केला आहे. वांगचुक यांच्या चिथावणीखोर भाषणांमुळे हे आंदोलन हिंसक झाल्याचं केंद्र सरकारचं म्हणणं आहे.

सोनम वांगचुक नेमके कोण आहेत? त्यांनी लडाखमध्ये उसळलेल्या हिंसाचाराला कशी चिथावणी दिली?

‘वांगचुक यांच्या प्रक्षोभक विधानांमुळे जमावाला भडकावण्यात आले’

गृह मंत्रालयाने (एमएचए) बुधवारी झालेल्या हिंसाचारासाठी हवामान कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना जबाबदार धरले आहे. सरकारच्या मते वांगचुक हे ‘अरब स्प्रिंग’ पद्धतीने सरकारविरुद्ध मत तयार करून  ‘नेपाळमधील जेन झी निषेधांचा संदर्भ’ देऊन लोकांची दिशाभूल करत होते.

सरकारने नमूद केले की, वांगचुक यांच्या ज्वलंत भाषणामुळे जमाव चिडला. त्यानंतर जमावाने भाजप आणि सरकारी कार्यालयांची तोडफोड केली. गृह मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे की, “24 सप्टेंबर रोजी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास, वांगचुक यांच्या प्रक्षोभक भाषणांमुळे भडकलेल्या जमावाने उपोषणस्थळ सोडले. हा जमाव तिथून एका राजकीय पक्षाच्या कार्यालय आणि सीईसी लेहच्या सरकारी कार्यालयाकडे गेला व तिथं हल्ला केला.”

सरकारने सोनम वांगचुक यांच्यावर ‘परिस्थिती शांत करण्यासाठी प्रयत्न न करता’ उपवास सोडून त्यांच्या गावी निघून गेल्याचा आरोपही केला. गृहमंत्रालयानं आपल्या पत्रकात म्हटलंय की, “हे स्पष्ट आहे की श्री. सोनम वांगचुक यांनी त्यांच्या प्रक्षोभक विधानांद्वारे जमावाला चिथावणी दिली होती. योगायोगाने, या हिंसक घडामोडींमध्ये, त्यांनी उपवास सोडला आणि परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी गंभीर प्रयत्न न करता रुग्णवाहिकेतून ते त्यांच्या गावी निघून गेले”.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, तरुणांच्या गटांनी जाळपोळ आणि तोडफोड केली. लेहमधील भाजपच्या मुख्यालयाला आणि हिल कौन्सिलला लक्ष्य केले आणि वाहनांना आग लावली. यामुळे संपूर्ण शहरात पोलिस आणि निमलष्करी दलांना मोठ्या प्रमाणात तैनात करावे लागले. यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. सध्या, लडाखमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. पाचपेक्षा जास्त लोक एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

या निदर्शनांवर भाष्य करताना, गृह मंत्रालयाने नमूद केले की हे सोनम वांगचुक यांनी 10 दिवसांपूर्वी उपोषणाला सुरुवात केली. लेहला राज्याचा दर्जा आणि लडाखला संविधानाच्या सहाव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करणे या त्यांच्या प्रमुख मागण्या होत्या. सहाव्या अनुसूचीद्वारे आदिवासी भागांना विशेष स्वायत्तता मिळते.

गृहमंत्रालयाच्या पत्रकात असेही म्हटले आहे की, केंद्र सरकार आधीच यावर चर्चा करत आहे. “पण, काही राजकीयदृष्ट्या प्रेरित व्यक्ती जे एचपीसी अंतर्गत झालेल्या प्रगतीवर खूश नव्हते ते संवाद प्रक्रियेला अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहेत”.

वांगचुक यांचं म्हणणं काय?

वांगचुक यांनी सरकारच्या या आरोपाला प्रतिसाद दिला नाही. पण, त्यांनी हिंसाचाराचा निषेध केला आहे आणि म्हटले आहे की, त्यांचा “शांततेच्या मार्गाचा संदेश अयशस्वी झाला. आमच्या आंदोलनाच्या 15व्या दिवशी, मला हे सांगताना दुःख होत आहे की, आज लेहमध्ये हिंसाचार, जाळपोळ आणि तोडफोडीच्या अनेक घटना घडल्या. काल आंदोलनात असलेल्या दोन व्यक्तींना रुग्णालयात दाखल करावे लागले. यामुळे लोकांमध्ये संताप निर्माण झाला. आज बंदची घोषणा करण्यात आली आणि हजारो तरुण रस्त्यावर उतरले.”

वांगचुक पुढं म्हणतात की, हा उद्रेक ‘एक प्रकारची जेन-झी क्रांती’ होती. हे लोक पाच वर्षांपासून बेरोजगार आहेत. ही सामाजिक अशांततेची एक कृती आहे. इथं कोणतेही लोकशाही व्यासपीठ नाही,” तो म्हणाला.

वांगचुक आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये लिहितात की- लेहमध्ये घडलेली घटना अतिशय दुःखद आहे.

शांततेच्या मार्गाचा माझा संदेश आज अपयशी ठरला. मी तरुणांना आवाहन करतो की कृपया हा मूर्खपणा थांबवा. यामुळे केवळ आपल्या ध्येयाचे नुकसान होते.

“मी तरुणांना हिंसाचाराचा मार्ग सोडून देण्याचे आवाहन केले. या घटनेमुळे माझा पाच वर्षांचा संघर्ष निष्फळ ठरला. आम्ही संप, मोर्चे काढत आहोत पण हिंसाचार हा आमचा मार्ग नाही. मी तरुणांना हात जोडून आवाहन करतो की, आपण सरकारशी शांततेने बोलले पाहिजे. आणि सरकारने आमचे म्हणणे ऐकले पाहिजे. आम्ही एकामागून एक संप करत आहोत, आम्ही लेह ते दिल्ली चालत गेलो, पण आमचे काहीही ऐकले गेले नाही.”

सोनम वांगचुक कोण आहेत?

या आंदोलनाच्या केंद्रस्थानी असलेले सोनम वांगचुक कोण आहेत?

वांगचुक यांचा जन्म 1966 मध्ये झाला. ते शिक्षणाने अभियंता असून शिक्षण सुधारक आणि हवामानासंबंधी काम करतात. 2009 मध्ये आलेल्या हिंदी चित्रपट ‘3 इडियट्स’ मध्ये सोनम वांगचुक यांच्यावर आधारित एक भूमिका होती. आमिर खान यांनी ही भूमिका केली आणि सोनम वांगचुक व त्यांचं काम हे नाव लेहच्या बाहेर सर्वांना माहीत झालं.

लडाखला सांस्कृतिक आणि पर्यावरणदृष्ट्या अधिक योग्य बनवण्यासाठी शालेय शिक्षणात सुधारणा करण्याच्या उद्देशाने त्यांनी लडाखमध्ये विद्यार्थी शैक्षणिक आणि सांस्कृतिक चळवळीची स्थापना केली. SECMOL ने शाळेत शिकण्याच्या माध्यमातून कृती आणि विद्यार्थ्यांनी कृतीतून शिकण्याच्या व्यावहारिक क्रियाकलापांचा समावेश असलेल्या शिक्षण पद्धतीचा वापर केला.

जून 1993 ते 2005 पर्यंत, वांगचुक यांनी लडाखमधील एकमेव छापील मासिक लाडाग्स मेलॉन्गची स्थापना केली आणि त्याचे संपादक म्हणून काम केले.

त्यांच्या काही उत्तम संशोधनामधील एक म्हणजे कमी किंमतीचे मातीचे घर. या घराचं वैशिष्ट म्हणजे उणे 15 अंश सेल्सिअस तापमानातही या घराचं तापमान 15 सेल्सिअस राखते. तसेच बर्फाच्या स्तूपाच्या आकारात एक कृत्रिम झरा केला आहे. हा झरा वसंत ऋतूच्या शेवटी म्हणजेच मार्चअखेरिस जेव्हा शेतकऱ्यांना पाण्याची आवश्यकता असते तेव्हा वापरण्यासाठी प्रवाहात पाणी साठवतो.

2020 मध्ये, गलवान खोऱ्यात भारत-चीन संघर्षाला प्रतिसाद म्हणून, वांगचुक यांनी भारतीयांना “वॉलेट पॉवर” वापरण्याचे आणि चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले. त्यांनी ‘चीन को जवाब… सेना देगी गोली से, नागरिक देंगे वॉलेट से’ असा नाराही दिला.

नंतर, मार्च 2024 मध्ये, त्यांनी “सरकारला लडाखचे पर्यावरण आणि आदिवासी संस्कृतीचे रक्षण करण्याच्या त्यांच्या वचनांची आठवण करून देण्यासाठी” कडाक्याच्या थंडीत 21 दिवसांचे उपोषण केले. त्यांच्यासोबत त्यावेळी हजारो लोक उपवास करून आंदोलने केली.

#SAVELADAKH #SAVEHIMALAYAS या दोन आंदोलनांद्वारे सोनम वांगचुक जगाला साधेपणाने जगण्याचे आवाहन करतात. सप्टेंबर 2024 मध्ये, वांगचुक यांनी लेह ते दिल्ली पर्यंत “दिल्ली चलो पदयात्रा” नावाची पदयात्रा सुरू केली. केंद्र सरकारला लडाखच्या भविष्याबाबत चर्चा पुन्हा सुरू करण्यास उद्युक्त करणे या उद्देशाने त्यांनी ही पदयात्रा सुरू केली होती.

कलम 370 रद्द केल्यानंतर, लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आले. परंतु वांगचुक सारख्या स्थानिक नेत्यांचा असा युक्तिवाद आहे की या दर्जामध्ये पुरेशी स्वायत्तता नाही. ते लडाखच्या सांस्कृतिक आणि पर्यावरणीय ओळखीसाठी मजबूत संरक्षणाची मागणी करतात. ज्यात कायदेमंडळ आणि स्थानिक निर्णय घेण्याचे अधिकार समाविष्ट आहेत.

वांगचुकसारखे अॅक्टिव्हिस्ट लडाखमध्ये सहाव्या अनुसूचीची मागणी करत आहेत. यामुळे आदिवासींना नैसर्गिक संसाधने आणि पायाभूत सुविधांसह त्यांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी विशेष अधिकार मिळतात. “सहावी अनुसूची स्थानिकांना केवळ अधिकारच नाही तर त्यांचे हवामान, जंगले, नद्या आणि हिमनद्या यांचे संवर्धन करण्याची जबाबदारी देते,” असं वांगचुक यांनी पत्रकारांना सांगितले. वांगचुक यांचा असा युक्तिवाद आहे की संवैधानिक संरक्षणाच्या अभावी हिमालयाचं नाजूक पर्यावरण धोक्यात आहे.

वांगचुक यांना दिल्लीकडे जाताना थांबवण्यात आले होते. परंतु 2 ऑक्टोबर 2024 रोजी त्यांची सुटका करण्यात आली.

लडाखमध्ये परतल्यापासून, वांगचुक संवैधानिक हमी, अधिक स्वायत्तता, राज्याचा दर्जा आणि सहाव्या अनुसूचीचा दर्जा मिळविण्यासाठी त्यांची निदर्शने आणि आवाहने सुरूच ठेवत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Internationalisation of Rupee : आंतरराष्ट्रीय पातळीवर रुपयाचं स्थान मजबूत व्हावं यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने भारताच्या शेजारील राष्ट्रांसोबत रुपयामधून व्यवहार
आज दिनांक 1 ऑक्टोबरपासून युपीआय, रेल्वे प्रवास आणि आधार अपडेटशी संबंधित काही नव्या नियमांच्या अंमलबजावणीला सुरूवात होणार आहे. हे बदल
NASA Women lead : अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था NASA ने नुकतीच त्यांच्या नव्या अंतराळवीर तुकडीची म्हणजेच 'एस्ट्रोनॉट क्लास' ची घोषणा

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ