गेल्या आठवड्याभरापासून मराठवाडा, विदर्भ भागात कोसळणाऱ्या संततधारेमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई, ठाणे, मराठवाडा, विदर्भ, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात शनिवारी रात्रीपासूनच पावसाला सुरूवात झाली होती. या मुसळधार पावसामुळे वित्तहानी आणि जीवितहानीच्या घटना घडल्या आहेत. बुलढाण्यात दोन घटनांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. अहिल्यानगरमध्येही दोन जण पूराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. तर नाशिकमध्ये भिंत कोसळून तिघांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, संपूर्ण राज्यात मंगळवारपासून पावसाचा जोर कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारने तातडीने 2 हजार कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. तसेच प्रभावित कुटुंबांना तात्काळ 10 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवार दि. 28 सप्टेंबर रोजी दिली.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यभरात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. मराठवाड्यासह विदर्भातही मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईत मात्र गेले काही दिवस तुरळक सरी कोसळत होत्या. शनिवारी सायंकाळपासून मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि पालघर परिसरात ही अतिमुसळधार पावसाला सुरुवात झाली.
रायगड जिल्ह्यातील काही भागात पावसाची संततधार होती. ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर, शहापूर आदी भागांना सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपून काढले.
पूरग्रस्तांना मदत
🕛 12.09pm | 28-9-2025📍Chandrapur.
LIVE | Media Interaction#Maharashtra #Chandrapur https://t.co/vDyLlIweMC
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 28, 2025
राज्यातील आठ ते दहा जिल्ह्यांना अतिवृष्टी व पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे पूरग्रस्तांसाठी तातडीने 2 हजार कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. तसेच प्रभावित कुटुंबांना तात्काळ 10 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवार दि. 28 सप्टेंबर रोजी दिली. जिल्हाधिकारी आणि प्रशासनातील अधिकारी प्रत्यक्ष फिल्डवर उतरून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. पुढचे दोन ते तीन दिवस “अलर्ट मोड” वर राहून काम करावं, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत.
राज्यातील संपूर्ण परिस्थितीची पाहणी आणि पंचनामे झाल्यानंतर अधिकची मदत शेतकरी व नागरिकांना दिली जाईल. सरकार राज्यातील पूर परिस्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून आहे. राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. प्रशासनाकडून विविध ठिकाणी मदत व बचावकार्य सुरू आहे. प्रत्येक नागरिकांची काळजी सरकारकडून घेतली जात आहे. पूरग्रस्तांसाठी कॅम्पमध्ये जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून जनावरांसाठी चारा व छावणीची सोय करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना दिली आहे.
मराठवाड्यामध्ये पुन्हा एनडीआरएफची टीम दाखल
मराठवाड्यामध्ये पूराने रौद्ररूप धारण केल्यामुळे अनेक लोकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर केलं होतं. या पूरामध्ये शेतजमिनी आणि घरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. अनेक दुर्गम भागात अडकलेल्या लोकांच्या बचावासाठी एनडीआरएफची टीम गेल्या आठवड्यात बीडमध्ये दाखल झाली होती. पूर ओसरण्याआधीच पुन्हा पावसाला सुरूवात झाल्यामुळे पुन्हा एकदा एनडीआरएफची टीम बचावकार्यासाठी बीडमध्ये दाखल झाली आहे.
बीडमध्ये रविवारी सकाळी 48 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. जायकवाडी धरणातून दीड लाख क्युसेकपर्यंत पाण्याचा विसर्ग वाढवला. त्यामुळे आजुबाजूलच्या गेवराई, माजलगाव सह 61 गावातील लोकांनां पुन्हा सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.
खबरदारी म्हणून मदतकार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक (एनडीआरएफ) व लष्कराचे पथकही जिल्ह्यात दाखल झाले आहे.
उल्हास, भातसा नद्या धोकादायक पातळीवर
ठाणे जिल्ह्यातही रविवारी संततधार होती. त्यामुळे उल्हास आणि भातसा या प्रमुख नद्यांनी अनुक्रमे मोहने (कल्याण) आणि सापगाव (शहापूर) इथे धोकादायक पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नदीकाठच्या अनेक गावांमध्ये पाणी शिरलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी दुपारी कोकणातील मुंबईसह चार जिल्ह्यांत झालेल्या अतिवृष्टीच्या परिस्थितीचा आढावा घेतला.
विशेष अधिवेशन बोलवा : जयंत पाटील
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सरकारने ठोस निर्णय घ्यावा यासाठी विशेष अधिवेशनाची घोषणा करावी!
राज्यभरात पावसाने कहर केला आहे. शेतकरी, जनावरे, घरे, जनजीवन सर्व उद्ध्वस्त झाले आहे. परंतु, सरकारकडून आवश्यक मदत होताना दिसत नाही.
शेतकरी व नागरिकांचे प्रश्न ऐकले जावेत, नुकसान भरपाई व… pic.twitter.com/0PAA8nUHK8
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) September 28, 2025
मराठवाडा, सोलापूरसह अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक गेले आहे. नद्यांना आलेल्या महापुरामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून या पार्श्वभूमीवर विधिमंडळाचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावं, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते आमदार जयंत पाटील यांनी राज्यपालांना पत्र लिहून केली आहे.