एक देश, एक निवडणूक (one nation – one election ) ही संकल्पना सध्या देशातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे. सततच्या निवडणुकांमुळे देशाच्या प्रशासनावर येणारा ताण कमी करण्यासाठी आणि विकास कामांना गती देण्यासाठी ही संकल्पना महत्त्वाची मानली जात आहे.
केंद्रातील एनडीए सरकार ‘वन नेशन-वन इलेक्शन’ लागू करण्याच्या तयारीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याविषयी यंदाच्या स्वातंत्रदिनी लाल किल्यावर केलेल्या भाषणातही तसं सांगितलं होतं. “वारंवार होणाऱ्या निवडणुकांमुळे देशाच्या विकासात अडथळे येतात” असं ते म्हणाले होते.
राष्ट्रपतींकडे अहवाल सादर.
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं वन नेशन-वन इलेक्शनवर विस्तृत अहवाल तयार केला आहे. 18,626 पानांच्या या अहवालात निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी विविध शिफारसी करण्यात आल्या आहेत. या वर्षी मार्च महिन्यात या समितीनं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना हा अहवाल सादर केला.
लोकसभा आणि राज्यांतील विधानसभा निवडणुका एकत्रित करण्याच्या हेतूनं ‘one nation-one election’ हे नाव देण्यात आलं आहे. भाजपनं 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये आपल्या जाहिरनाम्यातही याचा उल्लेख केला होता.
2029 ला ‘एक देश, एक निवडणूक’!
सरळ शब्दात सांगायचे तर, ‘एक देश, एक निवडणूक’ म्हणजे देशातील लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेणं. सध्या, देशात विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका वेगवेगळ्या वेळी दर पाच वर्षांनी घेतल्या जातात. परंतु, ‘एक देश, एक निवडणूक’ ही संकल्पना राबविल्यास सर्व निवडणुका एकाच वेळी घेतल्या जातील. जर सर्व राजकीय पक्षांनी सहमती दिली, तर 2029 पासून वन नेशन-वन इलेक्शन लागू होऊ शकते.
1967 मध्ये शेवटची ‘एक देश एक निवडणूक’
भारतात पहिली सार्वत्रिक निवडणूक 1951-1952 साली झाली होती. या निवडणुकीत लोकसभे सोबत सर्वच राज्यांच्या विधानसभांसाठीही मतदान घेण्यात आलं होतं. या निवडणुकीत काँग्रेस पक्षानं एकतर्फी विजय मिळवला. पंडित जवाहरलाल नेहरू यांना देशाचे पंतप्रधान म्हणून निवडण्यात आलं. ‘एक देश एक निवडणूक’ यावर आधारीत शेवटची निवडणूक 1967 साली घेण्यात आली. त्यावेळी इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या.
भारतात एकत्रित निवडणुका घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेकदा लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्यात आल्या आहेत. आणि या संकल्पनेचे फायदे आणि तोटे याबाबत सर्वांचीच विविध मतं आहेत.