मुंबई अंडरवर्ल्डमध्ये प्रत्येक गँगस्टरची वेगळी ओळख होती, त्यांची काम करण्याची पद्धत, क्रूरता, या सगळ्यावर त्यांची नावं ठरली होती. पण या सगळ्यात एक असा गँगस्टर होता, ज्यानं स्वत:लाच नाव दिलं होतं, ‘रावण’. पोलिसांनी पकडू नये म्हणून अनेक गँगस्टर्सनं मुंबई सोडली होती. पण त्यासाठी अमर नाईकनं मात्र वेगळीच शक्कल लढवली होती. त्याकाळात कुणाला सुचणार नाही अशी उपाययोजना त्यानं केली होती. खरंतर अमर हा त्याच्या तारुण्यात भाजी विकायचा, पण या भाजीवाल्याचा प्रवास ‘मुंबईचा रावण’ बनेपर्यंत कसा झाला हे बघुयात.
बालपण आणि सुरुवातीचे दिवस
मारुती नाईक यांचं कुटुंब मुंबईतल्या लोअर परळ भागात राहत होतं. व्यवसाय होता, भाजी विक्री. घरात तीन मुलं. अजीत, अमर आणि अश्विन. अमर नाईकचा जन्म साधारण 1961-62 मध्ये झाला होता. नाईक कुटुंबाला रोज भाजी विकून जे पैसे मिळायचे, त्यातच कुटुंबाची गुजराण सुरु होती. अजीत मोठा असल्यानं तो कळत्या वयात आल्यावर त्यानं भाजी विकण्यात वडीलांची मदत करायला सुरुवात केली. अमर आणि अश्विन हे तेव्हा शिकत होते. अमर नाईक थोडा रागीट स्वभावाचा होता. अमर आणि अश्विन दोघांनाही शिकवणं मारुती नाईक यांना अवघड होत होतं. त्यामुळं त्यांनी अमरला शाळेतून काढून मोठ्या भावासोबत भाजीच्या गाड्यावर जायला सांगितलं. अमर नाईकही त्याच्या भावाला म्हणजे अजितला मदत करू लागला. इथुनचं त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळायला सुरुवात झाली.
गुन्हेगारी क्षेत्रात प्रवेश
1970 च्या दशकात दादर भागात पोत्या गँगचा दबदबा होता. भाजी मार्केटमध्ये येऊन पोत्या गँगचे गुंड भाजीवल्यांकडून हफ्ता वसुली करायचे. अमरनं भाजी विकायला सुरुवात केली, तेव्हा त्याचं वय अंदाजे 14-15 वर्ष होतं. त्यानं हफ्ता वसुली करणाऱ्या गुंडांना हफ्ता द्यायला नकार दिला. सुरुवातीला त्याला गुंडांचा मार खावा लागला, पण एकदा असंच हफ्तावसुलीसाठी आलेल्या गुंडांनी अजीतला मारहाण करायला सुरुवात केली. तेव्हा अमर तिथं आला आणि त्यानं भाजी कापण्याच्या सुरीनं त्या गुंडांवर हल्ला केला.
वसुलीविरोधात लढताना स्वतःच वसुली करू लागला
हफ्ता द्यायला विरोध होऊ लागल्यानं पोत्याचा म्हणजे संतोष सावंतचा राग अनावर झाला. त्यातच अमरला पोलिसांनीही त्रास द्यायला सुरुवात केली. चौकशीच्या नावानं त्याला पोलिस स्टेशनमध्ये बोलावून त्याला मारहाण करणं, तासनतास बसवून ठेवणं असे प्रकार घडू लागले. अमर नाईकला या सगळ्याचं आश्चर्य वाटलं, कारण त्यानं त्याच्या भावावर होणारा अत्याचार रोखण्यासाठी गुंडांवर प्रतिहल्ला केला होता आणि पोलिस मात्र तोच गुन्हेगार असल्यासारखं त्याला वागवत होते. त्यानंतर मात्र अमर नाईकनं पोत्याला धडा शिकवायचं ठरवलं. त्याच्या काही मित्रांना घेऊन त्यांनं त्याची गँग तयार केली आणि पोत्याच्या विरोधात उभे राहिले. हळूहळू पोत्याला दादरच्या भाजी मार्केटमधून हफ्ता मिळणं बंद झालं. हळूहळू त्यानं तिथल्या मार्केटवर त्याचा दबदबा निर्माण केला. ज्या गोष्टीसाठी तो पोत्या गँगशी भांडला, मारामारी केली, त्यांचंच काम त्यानं सुरु केलं. त्यानं गुन्हेगारीत कधी प्रवेश केला त्याला कळलंही नाही. इकडं पोत्याचा मात्र अमरवर राग दिवसेंदिवस वाढत होता. म्हणून त्यानं अमरचा लहान भाऊ अश्विन जो कॉलेजमध्ये शिकत होता, त्याला किडनॅप केलं. आणि अमर नाईकला शरण यायला सागितलं. अश्विन नाईकचा खरं तर यात काहीही संबंध नव्हता. तो ना दोन्ही भावांसोबत भाजी विकायचा ना त्याचा अमरच्या कामाशी काही संबंध होता. पण तरीही पोत्या गँगनं त्याला किडनॅप केलं. पण अश्विन नाईक हा अत्यंत हुशार आणि चलाख होता. त्याला माहीत होतं, की तो जर तिथं बंदिस्त राहिला तर त्याच्या भावाला या गुंडांसमोर शरण यावं लागेल. त्यामुळं तो तिथून पळून जाण्यात यशस्वी झाला. आणि घरी आला. पण अमर नाईक शांत बसणारा नव्हता. अमर नाईकनं बेसावध असलेल्या पोत्या गँगच्या गुंडांवर हल्ला केला. पोत्या गँगला हा हल्ला अनपेक्षित होता. ‘मटका’ हा पोत्या गँगचा आर्थिक स्रोत होता, अमरनं त्याच्या मित्रांसोबत पोत्या गँगच्या मटक्याच्या अड्यांवर हल्ले करून ते उद्ध्वस्त करायला सुरुवात केली. त्यामुळं पोत्या गँगचं आर्थिक गणित बिघडलं.
मुंबईचा रावण
1880 चं दशक सुरू झालं तोपर्यंत अमर नाईकनं गुन्हेगारीत चांगलाच जम बसवला होता. दादरपासून चिंचपोकळीपर्यंत त्यानं त्याची दहशत पसरवली होती. त्याच्या परवानगीशिवाय, त्याला विचारल्याशिवाय तिथं कोणतीही सार्वजनिक कामं होत नव्हती. 1985 मध्ये झालेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये दादर-चिंचपोकळी भागातून शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात एक पारसी उमेदवार निवडणूक लढवत होता. ज्याला अमर नाईकनं पाठिंबा दिला होता, त्या वेळी त्या भागात शिवसेना उमेदवाराची एकही सभा झाली नाही. किंवा कोणताही प्रचार झाला नाही. पण पारसी उमेदवाराचा मात्र जोरदार प्रचार सुरु होता. त्यानं अमर नाईकला मोठी रक्कम दिली होती. पण तरीही त्या निवडणुकीत शिवसेना उमेदवार निवडून आला. तेव्हा अमर नाईकला सुचलं की, आपण शिवसेनेत सहभागी होऊनच मोठं व्हायला हवं. त्यानं तिथं शिवसेनेचं काम करायला सुरुवात केली. दाऊद आणि अरुण गवळी यांच्या गँगसोबत त्याची दुष्मनी होतीच. या गँगवॉरमध्ये एकमेकांच्या गँगचे अनेक गुंडांना त्यांनी यमसदनी पोहोचवलं होतं. पण सगळ्यात मजबूत बाजूवर हल्ला करुन तीच कमकुवत करण्यात अमर नाईक पटाईत होता. त्यानं गवळीचा मुख्य आधार असेलला खटाव मिलचा मालक सुनिल खटाव याला संपवला. कारण सुनिल खटावला मिल बंद झाल्यानंतर ती जागा विकायची होती, पण त्यासाठी कामगार संघटनाची परवानगी मिळत नव्हती. त्यानं ही जबाबदारी अरुण गवळीवर सोपवली. ही जागा विकली गेली असती, तर अरुण गवळीला त्यातले कोट्यावधी रुपये मिळणार होते. त्यामुळं तो अमर नाईकच्या तुलनेत जास्त शक्तिशाली बनला असता. जे अमर नाईकला नको होतं. त्यानं सुनिल खटावला मारण्याचा प्लान केला. त्याच्यावर पाळत ठेवून एक दिवस महालक्ष्मी रेसकोर्स परिसरात अमर नाईक गँगनं सुनिल खटावला गोळ्या घातल्या.
श्रीलंका ते अफगाणिस्तान कनेक्शन
अमर नाईकनं हळूहळू त्याचे पाय पसरायला सुरुवात केली. त्यानं पठाणांशी संबंध वाढवून ड्रगच्या व्यवसायात पाय रोवायला सुरुवात केली. पण त्याच बरोबर त्यानं श्रीलंकेच्या एलटीटीशी संपर्क वाढवून तिथं त्याचं नेटवर्क तयार करुन त्यांच्यासोबत हत्यारांच्या तस्करीला सुरुवात केली. म्हणजे मुंबईत राहून अमर नाईक हा एकाच वेळी अफगाणिस्तानातल्या पठाणांसोबत आणि श्रीलंकेतल्या एलटीटी सोबत काम करत होता.
सर्वात आधुनिक हत्यारं वापरणारी टोळी
अमर नाईक हा एलटीटीसोबत हत्यारांची तस्करी, व्यापार अशी कामं करत होता. तमिळ दहशतवाद्यांसाठी काम करत होता, त्यामुळं त्याच्याकडं आणि त्याच्या गँगकडं त्यावेळची सगळ्यात आधुनिक हत्यारं असायची. तोपर्यंत नुकतीच दाऊदच्या गुंडांकडं एके47 दिसायला लागली होती, पण अमर नाईककडे त्यापेक्षाही आधुनिक इस्राईस आणि जर्मनमेड रिव्हॉल्वर्स आणि हत्यारं असायची. त्यामुळं 1980 च्या दशकात अमर नाईक आणि त्याची गँग ही सर्वात अत्याधुनिक हत्यारं वापरणारी गँग म्हणून ओळखली जाऊ लागली.
प्लास्टिक सर्जरी करणारा पहिला डॉन
90 चं दशक सुरु होईपर्यंत अमर नाईककडे मोठ्या प्रमाणात पैसे आले होते. त्यानं अत्याधुनिक हत्यारं वापरायला सुरुवात केली. त्यानं त्याच्या गँगपासून वेगळं रहायला सुरुवात केली. त्यानं एकट्यानं काम करायला सुरुवात केली. गँगचा एक सदस्य पकडला गेला तरीही, तो पकडला जाऊ शकतो. त्यावर त्यानं एक उपाय शोधला, त्यानं त्याची प्लास्टिक सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तो लंडनला गेला. तिथून तो नविन चेहरा आणि नविन नाव घेऊन मुंबईत परतला. आता पोलिसांना त्याला पकडणं कठिण झालं. कारण त्याचा बदललेला चेहरा कुणालाही माहीत नव्हता. त्यानं त्याचं नावही बदललं होतं. त्यानं त्याचं टोपण नाव ठेवलं होतं, रावण. त्यावेळी पेजर वापरायला सुरुवात झाली होती, पेजरवर त्याचं रावण हेच नाव लिहून यायचं. प्लास्टिक सर्जरीनंतर अमर नाईकची दहशत प्रचंड वाढली. त्याला कंट्रोल करणं पोलिसांना कठीण होत होतं, तसंच शिवसेनेलाही त्याला आवरणं शक्य होत नव्हतं.
एन्काऊंटर की राजकीय हत्या?
10 ऑगस्ट 1996 पोलिस अधिकारी एन्काऊंटर स्पेशलिस्ट विजय साळसकर यांनी मुंबई सेंट्रल इथं अमर नाईकचं एन्काऊंटर केलं. पण त्यानंतर मात्र अनेकांनी हे एन्काऊंटर होतं, की राजकीय हत्या असा प्रश्न उपस्थित केला होता. अपेक्षेप्रमाणेंच त्याचं उत्तर कधीही बाहेर आलं नाही. एका भाजी विक्रेता ते मुंबईचा रावण हा अमर नाईकचा प्रवास अनेक वळणं घेऊन संपला.