फुफ्फुसाचा कर्करोगाचं निदान हे लवकर होत नाही. अनेकदा हा कर्करोग पूर्ण पसरल्यावर या आजाराचं निदान होतं. त्यामुळे उपचारासाठी खूप कमी वेळ मिळतो. त्यातही उपचार यशस्वी होण्याची शक्यताही कमी असते. मात्र, अलीकडे एआय आणि अॅडॉप्टिव्ह थेरपी यासारख्या तंत्रज्ञानामुळे या उपचारपद्धतीमध्ये नावीन्यपूर्ण बदल घडत आहेत.
जागतिक आरोग्य संस्थेच्या माहितीनुसार, जगात दरवर्षी 2.5 दशलक्ष नवीन रुग्णांची नोंद केली जाते. तर 1.8 दशलक्ष रुग्णांचा या आजारामुळे मृत्यू होतो. मात्र, आताच्या नवीन, जलदगतीने आणि सुरक्षितपणे उपचार करणाऱ्या तंत्रज्ञानामुळे या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
गेल्या 10-15 वर्षापासून फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या उपचारांमध्ये विशेषत: रेडिएशन ऑन्कोलॉजीमध्ये, लक्षणीय बदल झाले आहेत अशी माहिती अमेरिकेतील मेमोरियल स्लोन केटरिंग कॅन्सर सेंटरमधील रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट डॉ. डॅनियल गोमेझ यांनी दिली. आताच्या उपचार पद्धतीमध्ये कमी वेळेत रेडिएशन थेरपीचे जास्त डोस रुग्णाला देता येतात. महत्त्वाचं म्हणजे याचे रुग्णावर साईड इफेक्टसही होत नाहीत. यामुळे आम्हाला इम्युनोथेरपी आणि योग्य त्या औषधांच्या मदतीने सिस्टेमिक थेरपीजसह रेडिएशन थेरपी अधिक चांगल्या प्रकारे करता येते, असं डॉ. गोमेझ यांनी सांगितलं.
रुग्णाची काळजी ते प्रभावी उपचारपद्धत
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, फुफ्फुसाचा कर्करोग हा जगभरात सर्वात जास्त निदान होणारा कर्करोग आहे. कर्करोगाशी संबंधित मृत्यूंच्या प्रमाणामध्येही फुफ्फुसाचा कर्करोग असलेल्या रुग्णांचं प्रमाण अधिक आहे. 2020 मध्ये जगभरात 1.8 दशलक्ष मृत्यू झाले. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने 2023 मध्ये एकट्या भारतात जवळपास 72,510 नवीन फुफ्फुसाच्या कर्करोगाचे रुग्ण आढळल्याचं स्पष्ट केलं आहे. धूम्रपान आणि वाढतं प्रदूषणही यामागची कारणं आहेत.
मेटास्टॅटिक फुफ्फुसांच्या कर्करोगात रेडिएशन थेरपीची भूमिका मर्यादित होती. ती 50 टक्के रुग्णांसाठीच वापरता येत असे. या उपचारामुळे रुग्णांना काही काळ बरं वाटायचं. पण आता या उपचार पद्धतीत बदल होत आहे.
स्टिरिओटॅक्टिक बॉडी रेडिएशन थेरपी (SBRT) सारख्या तंत्रामुळे आता काही निवडक मेटास्टॅटिक जखमांवर रेडिएशनचे अॅब्लेटिव्ह डोस दिले जातात. या तंत्रामुळे रुग्णांची स्थिती सुधारते.
हे ही वाचा : कॅन्सरवर ‘रिव्हर्सिबल कॅन्सर थेरपी’ उपचार पद्धत विकसीत
ही एसबीआरटी उपचार पद्धत काही सत्रांमध्ये पूर्ण होते. मिलिमेट्रिक अचूकतेने ट्यूमरला लक्ष्य करते. त्यामुळे आजूबाजूच्या निरोगी ऊतींना ती वाचवते. रुग्णाची प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी ट्यूमरच्या आजूबाजूला असणाऱ्या ऊंतीना वाचवणं गरजेचं असतं. जेव्हा इम्युनोथेरपीसह एकत्रित हा उपचार केला जातो तेव्हा कर्करोगाच्या पेशींवर हल्ला करण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवली जाते. द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन आणि द लॅन्सेट ऑन्कोलॉजीमध्ये नोंदवलेल्या अलीकडील क्लिनिकल चाचण्यांमधून हे सिद्ध होते की एसबीआरटी, ज्यामध्ये उच्च-डोस रेडिएशन कमी सत्रांमध्ये ट्यूमरपर्यंत अचूकपणे पोहोचवले जाते, ते जगण्याचा दर आणि जीवनाची गुणवत्ता दोन्ही वाढवू शकते.
जर का या कर्करोगाचं प्राथमिक टप्प्यावर निदान झालं तर उच्च प्रमाणातल्या रेडिएशन थेरपीच्या 3-5 डोस आणि औषधांच्या मदतीने रुग्ण बरा होतो. या तंत्रज्ञानात्मक उपचारामध्ये उपचार करतेवेळी एआय-चालित कॉउन्टरिंग आणि ट्यूमरच्या स्थितीनुसार उपचार पद्धत बदलता येते. रेडिएशन थेरपीचा परिणाम वाढवता येतो. आणि या रेडिएशन थेरपीमुळे होणारे संभाव्य नकारात्मक परिणामही कमी करता येतात, अशी माहिती अरेट हॉस्पिटल्समधील ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख आणि संचालक डॉ. विजय करण रेड्डी पालकोंडा यांनी दिली.
एआय आणि इमेजिंग तंत्रामुळे उपचार पद्धतीत परिवर्तन
भारतातही रेडिएशन ऑन्कोलॉजीचे वेगाने आधुनिकीकरण होत आहे. “फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या रेडिओथेरपीमध्ये ऑटोमेशन, प्रगत इमेजिंग आणि वाढीव डोस डिलिव्हरीद्वारेमध्ये प्रभावी उपचार करता येतात अशी माहिती दिल्ली येथील रेडिएशन ऑन्कोलॉजीच्या संचालक डॉ. कनिका सूद शर्मा यांनी दिली. या सगळ्या बदलांमध्ये एआयची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. एआयद्वारे संचलित उपचार पद्धतीचं नियोजन, ट्यूरमची अचूक प्रतिमा घेणे, त्यानुसार रुग्णाला थेरपीचे किती आणि काय प्रमाणात डोस द्यायचे याचं अचूक नियोजन करुन प्रभावीरित्या उपचार करता येतात.
एआयमुळे रेस्पिरेटरी गेटिंगसारख्या तंत्रांचा देखील फायदा होतो, जिथे ट्यूमर अचूक ठिकाणी असतानाच रेडिएशन सोडले जाते, त्यामुळे ही उपचार पद्धत सुरक्षित मानली जाते. रिअल-टाइम इमेजिंग आणि ऑटोमेटेड पोझिशनिंगसह सुसज्ज अशा रेषीय प्रवेगक उपचार पद्धतीला गती मिळत आहे. त्यामुळे आता काही मिनिटांऐवजी सेकंदाच्या फरकाने उच्च-डोस-रेट रेडिओथेरपी देता येते. यामुळे ट्यूमरच्या हालचालीचा प्रभाव कमी होतो आणि संभाव्य दुष्परिणाम कमी होतात.
एमआरआय-मार्गदर्शित रेडिओथेरपी (एमआरजीआरटी) ट्यूमरच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी रिअल-टाइम इमेजिंगचा वापर करते, विशेषतः श्वासोच्छवासामुळे, आणि त्यानुसार रेडिएशन बीमची गरज अधोरेखित करते. यामुळे निरोगी फुफ्फुसांच्या ऊतींचे नुकसान कमी होते आणि उपचारांची अचूकता सुधारते असं यशोदा मेडिसिटीचे उपाध्यक्ष आणि रेडिएशन ऑन्कोलॉजीचे प्रमुख डॉ. गगन सैनी यांनी सांगितलं.
हे ही वाचा : प्रोस्टेटशी संबंधित आजार: पुरुषांचे दुखणे
अनुकूल ते वैयक्तिक काळजी
आयसीएमआरच्या मते, भारतीय पुरुषांमध्ये कर्करोगाच्या मृत्यूचे प्रमुख कारण फुफ्फुसाचा कर्करोग आहे, वायू प्रदूषण आणि सतत तंबाखूच्या वापरामुळे या आजाराचे प्रमाण वाढत आहे. तरीही स्मार्ट रेडिओथेरपीच्या अंमलबजावणीमुळे या आजारातून बरे होणाऱ्यांचं प्रमाण वाढत आहे.
क्लिनिकल चाचण्यांमधील माहितीनुसार, काही रुग्णांसाठी, स्मार्ट रेडिओथेरपी आणि इम्युनोथेरपी एकत्रित केल्यावर पाच वर्षांचा जगण्याचा दर आता 40 टक्क्यांपेक्षा जास्त असू शकतो. 10 वर्षापूर्वी हा दर 10 ते 15 टक्के होतं.
उपचार सुरू केल्यावर रुग्णाच्या शरीररचनातील बदलांच्या आधारावर दररोज उपचाराचं योग्य पद्धतीने नियोजन केलं जातं. त्यानुसार रेडिओथेरपीचं प्रमाण ठरवलं जातं. आपल्याला श्वासोच्छवासामुळे ट्यूमरच्या आकुंचन स्थिती किंवा जागा बदलांनुसार रेडीएशन टाकले जातात. त्यामुळे अचूक ठिकाणी उपचार होतात आणि निरोगी ऊतींचं संरक्षण होते.
इमेज-गाइडेड रेडिओथेरपी (IGRT), स्टिरिओटॅक्टिक अॅब्लेटिव्ह रेडिओथेरपी आणि एआय-चालित नियोजन यासारख्या बदलांनी फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या उपचारामध्ये नावीन्यपूर्ण बदल घडवून आणला आहे. हे तंत्रज्ञान विकसित होत असताना भारतासमोर या उपचारांच्या साधनांची व्यापक उपलब्धता सुनिश्चित करणं हे एक आव्हान असेल. विशेषतः सार्वजनिक आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये जिथे जुनी उपकरणे आणि मर्यादित प्रशिक्षित कर्मचारी आहेत तिथे ही उपकरणं उपलब्ध करुन देणं आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करणं गरजेचं आहे.