चीनने अलिकडेच खोल समुद्रातील केबल कापण्यासाठी विशेष असं शस्त्र विकसीत केलं आहे. या शस्त्राने खोल समुद्रातून गेलेल्या संरक्षण आवरण असलेल्या संवादाच्या आणि वीजेच्या केबल्स (तारा) कापता येऊ शकतात.
चीनच्या या नवीन शस्त्रामुळे जागतिक पातळीवर मात्र तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. कारण अनेक देशांनी समुद्र तळातून इंटरनेट आणि वीजेच्या ताराचं जाळं तयार केलं आहे. या केबल्सच्या माध्यमातून 95 टक्के जागतिक माहितीचं हस्तांतरण केलं जातं. लष्करी आणि नागरी गरजांच्या पूर्ततेसाठी सुद्धा या केबल्सचा उपयोग होतो. याशिवाय सागरी पायाभूत सुविधांनाही या शस्त्रापासून धोका निर्माण होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
चीनच्या चायना शीप सायंटिफिक रिसर्च सेंटर (CSSRC) आणि स्टेट की लेबोरेटरी ऑफ डीपसी मेन्ड व्हेहिकल्स या कंपनीने हे उपकरण तयार केलं आहे. हे उपकरण चीनच्या अत्याधुनिक अशा फेंदोझे आणि हायडू सिरीज या मानवचलित सबमर्सिबलमध्ये बसवण्यात आलं आहे.
अशा प्रकारचे तंत्रज्ञान विकसीत केल्यावर त्यांची पूर्ण जबाबदारी घेत ही माहिती उघड करण्याची ही पहिलीच घटना आहे. यामुळे चीनने सामुद्री सुरक्षा क्षेत्रात केलेल्या प्रगतीची माहिती मिळतेय. पण अशा प्रकारे चीनची विध्वंसक मनोवृत्तीही समोर येतेय.
या नवीन उपकरणाचे वैशिष्ट्य
चीनच्या या नवीन उपकरणाने समुद्रतळाच्या 13,123 फूट म्हणजे जवळपास 4 किलोमीटर खाली असलेल्या केबल्स कापता येऊ शकतात. सामान्यत: समुद्रतळाखाली 4 किलोमीटरच्या आत पायाभूत सुविधांकरता आवश्यक व्यवस्था किंवा साधनं उभारली जातात. मात्र चीनच्या या उपकरणाने या पायाभूत सुविधांच्या दुप्पट खोलीत असलेल्या केबल्स सुद्धा कापू शकतो, इतकं धारदार सक्षम उपकरण निर्माण केलं आहे.
समुद्राच्या खालून ज्या केबल्स टाकल्या जातात त्या केबल्सवर सुरक्षा आच्छादनांचे खूप सारे थर असतात. पारंपारिक पद्धतीने या केबल्स कापण्यासाठी खूप वेळ लागतो, ही प्रक्रिया सुद्धा कठीण असते. आणि या प्रक्रियेवेळी सामुद्री जीवांमध्ये अस्थैर्य निर्माण होते. मात्र, या उपकरणाच्या वापरामुळे ही प्रक्रिया सुलभ होते.
चीनच्या 24 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या मॅकेनिकल इंजिनियर जर्नल मध्ये या उपकरणाविषयी माहिती आली आहे. या माहितीनुसार, चीनचे इंजिनियर हू हॉलाँग यांनी या उपकरणाचं प्रात्याक्षिक करुन दाखवलं. समुद्राखालील सामुद्री जीवांना कोणतीही हानी न पोहोचवता किंवा अडथळे निर्माण न करता, त्यांनी 1600 आरपीएम असलेलं (रेव्हॉल्यूशन पर मिनिट – हे वेग मोजण्याचं एकक आहे) 150 एमएम (6 इंच) डायमंडचं आवरण असलेलं स्टील नवीन शस्त्राच्या ग्राइंडिंग व्हीलने कापून दाखवलं.
हे ही वाचा : पुढचे दलाई लामा कोण निवडणार: तिबेट की चीन?
उपकरणाचे आवरण
या उपकरणामध्ये एक किलोवॅटची मोटर असून 8:1 गियर रिड्यूसर आहे. तसंच या उपकरणाला विशिष्ट गतीत कार्यक्षमतेने फिरता येईल अशा पद्धतीने तयार केलं आहे. शिवाय समुद्राखालच्या वातावरणात जास्त काळ कार्यशील राहिल्याने हे उपकरण गरम होऊ शकते, आणि पाण्याच्या दाबाने स्फोट होऊ शकतो. हे टाळण्यासाठी या उपकरणाला टायटॅनियम मिश्र धातू आणि तेलाचा थर असलेले आवरण असते.
समुद्राखाली जिथे पाण्यातील हवेचा दाब हा 400 पास्कल (पाण्याचा दाब मोजण्याचे एकक) हून अधिक असेल अशा ठिकाणी या उपकरणाचा वापर करण्याची परवानगी आहे. पाण्याखाली जिथे शून्य दृश्यमानता असते, अशा ठिकाणी रोबोटच्या मदतीने आधुनिक तंत्र वापरत अचूक मोजमाप करत केबल्स कापता येतात.
चीनचे हे उपकरण सुरक्षेसाठी आहे का?
अनेकदा समुद्रामध्ये घडणाऱ्या आपत्तीतून (मोठ्या जहाजांशी संबंधित), समुद्रातल्या खाण कामासंबंधित आपत्ती प्रसंगावेळी बचावकार्यावेळी वापरण्यासाठी या उपकरणाची निर्मिती केली आहे असं चीनने स्पष्ट केलं आहे. मात्र, या उपकरणाच्या सक्षमतेचा विचार करता याचा उपयोग युद्ध शस्त्र म्हणून सुद्धा केला जाऊ शकतो. त्यामुळे जागतिक पातळीवर तणावाचं वातावरण आहे. कारण या उपकरणाने समुद्र मार्गाने ज्या इंटरनेट आणि वीजेच्या तारा गेल्या आहेत, त्याही कापता येऊ शकतात. यामुळे संबंधित देशांचं मोठं नुकसान होईल. त्यामुळे याचा वापर अन्य देशांना त्रास देण्यासाठी केला तर भूराजकीय वाद निर्माण होऊ शकतो.
चीनच्या या उपकरणाचा अमेरिकेला जास्त धोका आहे. कारण अमेरिकेच्या इंडो-पॅसिफिक धोरणानुसार गुआम जवळच्या समुद्राखालून गुगलसह लष्करी आणि नागरिकांना सेवा देणाऱ्या डझनभराहून अधिक फायबर-ऑप्टिक केबल्स आहेत. या केबल्सवर चीन हल्ला करु शकतो. चीनच्या मानवविरहीत पाणबुडीच्या साहाय्याने या उपकरणाने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या केबल्सवर हल्ला करण्याची शक्यता टाळता येत नाही.
हे ही वाचा : कर्मचाऱ्यांच्या थकव्यामुळे कंपनीचं कोट्यावधीचं नुकसान
या संपूर्ण विषयावर स्टॅनफोर्ड विद्यापीठातील सागरी पारदर्शकता प्रकल्प सीलाईटचे संस्थापक आणि निवृत्त अमेरिकन हवाई दलाचे कर्नल रेमंड पॉवेल यांनी द डिप्लोमेट या माध्यमाशी संवाद साधला. ते म्हणतात की, आंतरराष्ट्रीय पातळीवर गेल्या काही वर्षापासून चीन अप्रत्यक्षरीत्या अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. जागतिक अशांतता आणि शत्रूत्व यामधली रेषा चीन त्यांच्या विविध कारवायांतून धुसर करत आहे. समुद्र मार्गातून गेलेल्या केबल्स आणि पाईपलाईनची तोडफोड करणे हे छळवणूकीपेक्षा ही क्रूर कृत्य आहे. पण बिजिंगने जर ठरवलं तर ते आपल्या शत्रूचं नुकसान करण्यासाठी याहून घातक कृत्य करु शकतात, तितकी त्याची क्षमता आहे, असा दावा पॉवेल यांनी केला आहे.
दरम्यान, चीनच्या या उपकरण निर्मितीमध्ये रशियाचाही सहभाग असल्याचा दाव केला जात आहे. 2003 सालापासून बाल्टिक समुद्रामध्ये अशा केबल कापणाऱ्या एकूण 11 घटना घडल्याची नोंद आहे. या घटनांमुळे चीन आणि रशिया हे दोन्ही देश एकत्रपणे आंतरराष्ट्रीय पातळीवर अशांतता निर्मिती करण्यासाठी त्या अनुषगांने कृत्य करत असल्याचा आरोप केला जात आहे.
तैवानला या उपकरणाचा बसला फटका
चीनच्या या उपकरणाचा फटका तैवानला बसला आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये तैवानच्या टेलिकॉम कॅबेल्स तोडल्या गेल्या यावेळी तैवान अधिकाऱ्यांनी याच क्षेत्रातून वाहतूक करणाऱ्या 58 चिनी कामगारांसह टोगो-ध्वजांकित मालवाहू जहाज हाँग ताई ताब्यात घेतलं.
तैवान सरकारने यासंदर्भातल्या एकूण 5 तक्रारी नोंदवल्या आहेत. तर 2023 आणि 2024 साली प्रत्येकी 3 तक्रारी नोंदवल्या होत्या. या तक्रारीवरुन तैवानच्या समुद्री कक्षेत असलेल्या पायाभूत सुविधांवरील हल्ल्यांचे प्रमाण वाढत असल्याचं लक्षात येते.
सामुद्री शक्तीत चीनचे स्थान
चीन आज जगातील सर्वात मोठ्या मानव चलित आणि मानव विरहीत सबमर्सिबलचा वापर करतो. चीनच्या या पाणबुड्यांमुळे समुद्राखालील ऑपरेशन्समध्ये चीनला एक प्रमुख स्थान मिळालं आहे. तर गेल्या महिन्याभरापासून चीनने दक्षिण चीन समुद्रामध्ये 2 किलोमीटर खोल पाण्याखाली स्पेस स्टेशन उभारायला सुरुवात केली आहे. या स्पेस स्टेशनमध्ये 6 लोक महिन्याभरासाठी राहून काम करु शकतात अशा पद्धतीने हे स्टेशन विकसीत करण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे समुद्र सुरक्षा क्षेत्रामध्ये चीनचं स्थान बळकट होणार आहे.
हे ही वाचा : ब्राझीलमध्ये हवामान परिषदेसाठी ॲमेझॉन जंगलाची कत्तल!
दरम्यान, चीनच्या तुलनेत अमेरिकेची खोल समुद्रात कार्यरत असलेली साधनं आणि मोठी जहाज कमकुवत ठरत आहेत. जपानमधील एकमेव मानवचलित सबमर्सिबल, शिंकाई 6500 सुद्धा येत्या काही काळात निवृत्त होणार आहे. या सबमर्सिबलची जागा घेणारी दुसरी सबमर्सिबल कोणती असणार आहे हे अजून अस्पष्ट आहे.
चीनने विकसीत केलेलं हे केबल-कटिंग उपकरण कोणत्याही लष्करी कामासाठी नाही तर केवळ सागरी संसाधन म्हणून वापरलं जाणार आहे, असं स्पष्ट वक्तव्य संशोधक हू यांनी केलं आहे. त्यांच्या जर्नलमध्ये ते म्हणतात की, जागतिक पातळीवरील सर्वच देशांना आता त्यांची समुद्र क्षेत्रातली शक्ती वाढवण्याची गरज आहे. कारण, पुढचं शतक हे जल महासत्तेचं आणि अर्थव्यवस्थेचं असणार आहे. त्यामुळे येत्या काळात सागरी सामुग्रीमध्ये, लढाऊ शस्त्रामध्ये आणि संशोधनामध्ये चीन अग्रेसर रहावा यासाठी चीन प्रयत्नशील आहे.